ठाणे : मुंबई, ठाण्यात पावसाने ठाण मांडले असुन नदी, नाले भरले आहेत. मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असताना पावसाचा फटका केवळ मनुष्यालाच नव्हे तर नैसर्गिक जैवविविधतेलाही बसल्याचे दिसत आहे. गुरुवारी मुंलुंड येथील नाल्यात चक्क मगरीचे पिल्लु आढळले. सर्पमित्रांनी या मगरीच्या पिलाची नाल्यातुन सुटका करून जीवदान दिले.दरम्यान यापूर्वीही ठाण्यातील नाल्यात मगरीची पिल्ले आढळली होती.
दरम्यान, दि.२० जुलै सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील योगी हिल, घाटी पाडा भागातील एका नाल्यात मगरीचे पिल्लू अडकल्याची माहिती जिवाहोम संस्थेचे सर्पमित्र किशोर साळवी आणि चंद्रकांत कंग्राळकर यांना मिळाली. तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी मोठ्या शिताफीने या मगरीच्या पिल्लाची सुरक्षितपणे सुटका केली. हे मगरीचे पिल्लु जेमतेम पंधरा दिवसांचे असुन त्याची प्रकृती ठीक आहे. तरीही वैद्यकिय तपासणी करूनच त्याला वनविभागाच्या स्वाधीन करणार असल्याचे सर्पमित्र किशोर साळवी यांनी सांगितले.