मुंबई : देश सध्या मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे हादरला आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. तसंच नंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची अमानुष घटना देखील घडली. इतकेच नाही तर त्यांना घेऊन जातानाचा व्हिडिओही समाज माध्यमावर व्हायरल केला गेला. यावर देशभरातून पडसाद उमटत असताना आता चित्रपटसृष्टीतील कलाकारही राग व्यक्त करत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे,अभिनेते आशुतोष राणा, अभिनेता अक्षय कुमार यांनीही आपली संतापाची भावना व्यक्त केली आहे.
काय आहे रेणूका शहाणेंचे ट्विट?
रेणुका शहाणे ट्वीट करत म्हणाल्या,'मणिपूरमधील अत्याचाराला आळा घालणारं कोणीच नाहीए का? जर तुम्ही त्या दोन महिलांचा व्हिडिओ पाहून हळहळला नसाल तर स्वत:ला माणूस म्हणणं तरी योग्य आहे का, भारतीय तर पुढची गोष्ट आहे.'
आशुतोष राणांचे ट्विट
'इतिहास साक्ष आहे जेव्हा कोण्या एका स्त्रीचं हरण केलं जातं तेव्हा त्याची किंमत समस्त मनुष्यजातीला भरावी लागते. जसे सत्य, तप, पवित्रता आणि दान हे धर्माचे चार चरण आहेत तसंच लोकशाहीचेही विधायक, कार्यपालिका, न्यायपालिका आणि पत्रकारिता हे चार स्तंभ आहेत. लोकशाहीच्या या चारही स्तंभांनी लयबद्धतेने चालणं गरजेचं आहे. तेव्हाच अमानुष व्यक्तींपासून समाजाचा बचाव होईल.'
काय म्हणाला अक्षय कुमार?
20 जुलै रोजी सकाळी अधिकृत ट्विटर हँडलवर घडलेल्या घटनेचा संदर्भ देत अक्षय कुमार म्हणाला, "मणिपूरमधील महिलांवरील हिंसाचाराचा व्हिडिओ पाहून धक्का बसला, तिरस्कार वाटला. मला आशा आहे की दोषींना इतकी कठोर शिक्षा होईल की कोणीही पुन्हा असे घृणास्पद कृत्य करण्याचा विचार करणार नाही." असं अक्षय म्हणाला.
उर्मिला मार्तोंडकरचे ट्विट
तर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला, उर्मिला मातोंडकर म्हणतात, “मणिपूरमधला तो थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून धक्का बसलाय. मी घाबरलेय, हादरलेय, भयभयीत झालेय. हे प्रकरण मे महिन्यातील आहे, अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. सत्तेच्या नशेत बसलेले आणि अशा घटनांवरही गप्प बसणारे सेलिब्रिटींना पाहून लाज वाटते. प्रिय भारतीयांनो आम्ही इथे कधी पोहोचलो?”
टीव्ही मनोरंजन विश्वातील अभिनेत्री उर्फीची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात तिनं तिच्या आक्रमक स्वभावाला साजेशी अशी पोस्ट इंस्टावर लिहिली आहे. ती म्हणते, आपल्याला जो प्रकार होतो आहे याची लाज वाटायला हवी. जे काही होते आहे ते केवळ मणिपूरसाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा शब्दांत उर्फीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
मणिपूरमधला जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो ४ मेचा असून त्या महिला कुकी समुदायातील आहेत. त्यांच्यासोबत मैतेई समुदायातील लोकांनी छेडछाड करत त्यांची निर्वस्त्र रस्त्यावरून धिंड काढल्याचा आरोप आहे. घटनेच्या २१ दिवसांनंतर या प्रकरणाचा पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला. पोलीस तक्रारीत म्हटले की, जमावाने एका माणसाला मारून टाकले तर ३ महिलांना विविस्त्र केले. त्यातील १९ वर्षीय युवतीसोबत सामूहिक बलात्कार करण्यात आला. जेव्हा तिचा भाऊ तिला सोडवण्यासाठी गेला तेव्हा त्यालाही ठार मारण्यात आले. त्यानंतर ३ महिला अज्ञात व्यक्तींच्या मदतीने तिथून पळाल्या. ४ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास १ हजार लोक एके रायफल्स आणि हत्यारासह फेनोम गावात घुसले. हिंसक जमावाने अनेक संपत्ती लुटत घरांचीही जाळपोळ केली.





