पर्यावरणीय ‘ध्यासा’ची ‘कीर्ती’

    20-Jul-2023   
Total Views |
article on Kirti Shende

रस्त्यांवर असलेल्या कचर्‍याच्या ढिगांमुळे आणि अस्वच्छतेमुळे व्यथित होऊन पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या मोहिमेत खारीचा वाटा उचलणार्‍या वसईकन्या कीर्ती शेंडे यांचा हा प्रवास...

अस्वच्छ रस्ते, कचर्‍याचे ढीगच्या ढीग आणि त्याही परिस्थितीत तिथेच राहणारा मानवी समाज... हे चित्र पाहून हृदय पिळवटून पर्यावरण संवर्धनाच्या कामाचा ध्यास घेतलेल्या कीर्ती शेंडे यांचा जन्म नाशिकचा. मूळच्या नाशिकच्या असलेल्या कीर्ती यांनी आपले बालपण तसेच शिक्षण तिथेच पूर्ण केले. शालेय वयात कीर्ती यांना गायन, नृत्य, अभिनय या कलाप्रकारांमध्ये, तर खो-खो आणि टेनिस या खेळांमध्ये गती होती. त्यात त्या उत्स्फूर्त सहभागही घेत. पुढे त्यांनी ‘बीएससी झुऑलॉजी‘ आणि ’बॅचलर ऑफ लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्स‘ या पदव्या पूर्ण केल्या. याच उत्तम शिक्षणाच्या जोरावर त्या ग्रंथपाल म्हणून आणि नालासोपार्‍यातील लोधा हायस्कूलमध्ये प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या. अखिल भारतीय संगीत महाविद्यालयातून त्या संगीतविशारद झाल्या असून, त्या खासगी पातळीवर गेली २५ वर्षे विद्यार्थ्यांना शास्त्रीय शिक्षणाचे धडे देत आहेत. अभिनयाची आवड म्हणून त्यांनी प्रसिद्ध ’संगीत संशयकल्लोळ’ या नाटकामध्ये रेवतीची भूमिका साकारली. एवढे कमी म्हणून की काय, कीर्ती यांनी योगाभ्यासाचे शिक्षणही घेतले व त्या जोरावर त्या योग प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.
 
कॉलेज सुटल्यानंतर नाशिकच्या स्वामी विवेकानंद केंद्रामध्ये त्यांचं जाणं व्हायचं. तिथे त्यांनी स्वयंसेवक म्हणून कार्य करायला सुरुवात केली. घरोघरी जाऊन जुने कपडे गोळा करण्याचे व इतरही कामे सुरू होती. त्याचबरोबर यामार्फत लहान मुलांसाठी संस्कार वर्ग घेतले जायचे. पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा पूर्वीपासूनच होती. परंतु, कामाच्या आणि संसाराच्या व्यापात त्यांना ते शक्य झालं नाही. मात्र, कन्याकुमारीला असलेल्या स्वामी विवेकानंद केंद्रामध्ये जाऊन २१ दिवसांचा कॅम्प करण्याची संधी चालून आली आणि तिथूनच खर्‍या अर्थाने पर्यावरणासाठी काहीतरी करावं, असं डोक्यात पक्क झालं. दि. ९ डिसेंबर २०१७ या दिवशी आजूबाजूचे लोक आणि काही नातेवाईक यांना त्यांनी भेटण्यासाठी घरी बोलवले. त्या दिवशी पर्यावरणासाठी काम करण्याची आपली इच्छा त्यांनी सर्वांसमोर मांडली आणि तेव्हाच ’ध्यास संस्थे’चा जन्म झाला. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काही उपक्रम सुरू करण्याचे ठरले व आजतागायत ’ध्यास संस्थे’चे साधारण २०० कार्यरत सभासद आहेत.

कचरा हाच मोठा प्रश्न असल्याने प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेला सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली. रस्तोरस्ती दिसणारे कचर्‍याचे असंख्य ढीग आणि त्यामुळे गलिच्छ होणारा परिसर स्वच्छ राहण्याच्या आणि कचर्‍याचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीनेच कामाला सुरुवात केली गेली होती. यासाठी कचरा संकलन मोहीम ’ध्यास संस्थे’ने राबवायला सुरुवात केली. प्लास्टिक कचर्‍याचे संकलन करून ते पुनर्वापरासाठी पाठवले जाते. संकलन मोहीम राबविली जात असली, तरी मुळात प्लास्टिकचा वापर करण्याच्या हेतूने त्यांनी पावले उचलली. बाजारातून भाजी आणताना सर्वात जास्त प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. हे लक्षात घेता, तेथील विक्रेत्यांचे आणि गिर्‍हाईकांचे प्रबोधन केले गेले. प्लास्टिक पिशव्या वापरण्याऐवजी कापडी पिशव्यांच्या वापरास प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले.
 
प्लास्टिक कचरा संकलनाबरोबरच ‘ई-वेस्ट‘ आणि इतर घनकचर्‍याचेही संकलन करुन तो संस्थेकडून पुनर्वापरासाठी पाठवला जाऊ लागला. दोन केंद्रापासून सुरू झालेले हे संकलनाचे काम आज वसईतील २४ आणि नालासोपारा-विरारमधील २२ अशा एकूण ४६ केंद्रांवर सुरु आहे. जुने बेडशीट, वापरलेले कपडे आणि साड्या यांचेही संकलन करून त्यापासून कापडी पिशव्यांची निर्मिती सुरू केली. या पिशव्या अत्यल्प दरात विकल्या जात असल्यामुळे आणि पुन्हा-पुन्हा वापरता येण्याजोग्या असल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. गेल्या पाच वर्षांपासून हे काम सुरू असून, त्यामुळे पुनर्वापरासाठी प्लास्टिकचा वापर काही प्रमाणात का, होईना कमी झाला. त्याचबरोबर, छोट्या-मोठ्या स्वरुपात आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, थर्मोकॉलच्या पत्रावळी, कागदी कप आणि ग्लासेसचा वापर सर्रास पाहायला मिळतो. हे पर्यावरणासाठी हानिकारक असून, त्याबाबत जनजागृती करतानाच त्यांनी ’स्टील बँक’ हा उपक्रम सुरु केला.

यामध्ये स्टीलच्या भांड्यांचा संच अल्प भाड्याने वापरासाठी दिला जातो आणि ठरावीक रक्कम अनामत म्हणून ठेवली असता, भांडी परत केल्यावर ती रक्कम परत केली जाते. अशाप्रकारे व्यवसायवृद्धी म्हणून नाही, तर पर्यावरण रक्षणासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.याला जोड म्हणूनच दिवसेंदिवस वाढणार्‍या पाण्याच्या समस्या लक्षात घेत नैसर्गिक जलस्रोत टिकवण्यासाठी आणखीन एक उपक्रम हाती घेतला आहे. वसईमध्ये असलेली पारंपरिक शेततळी बुजवून त्यावर अतिक्रमण करण्याचे प्रमाण वाढले आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी (बावखल) म्हणजेच तळे वाचविण्याची मोहीम ही ’ध्यास‘ राबवत आहे. पालघर जिल्ह्यातील वाढत्या कुपोषित मुलांच्या मृत्यूंची संख्या लक्षात घेता, त्यांनी तेथील दहा मुले दत्तक घेतली असून, त्यांना आहार पुरविण्याचे काम ही त्या करतात.सुरुवातीच्या काळात संसार आणि इतर कामांच्या व्यापातून उसंत न मिळाल्यामुळे इच्छा असूनही, पर्यावरणाचे मागे पडलेले काम कीर्ती सध्या जोमाने करत आहेत. वयाच्या ५०व्या वर्षी कीर्ती यांनी घेतलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेचा ध्यास आणि त्यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.