पिझ्झा, बर्गर आणि बिर्याणी!

    20-Jul-2023
Total Views |
 World's Cheapest Domino's Pizza Is In Inflation-Hit India At Rs 49

गेली तीन दशके बहुराष्ट्रीय कंपन्या पिझ्झा-बर्गर विकण्यासाठी भारतात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तथापि, भारतीय खाद्यसंस्कृतीतील विविधतेने त्यांना यशस्वी होऊ दिलेले नाही. म्हणूनच ४९ रुपयांत पिझ्झा देणार्‍या ‘डोमिनोज’ने भारतात महागाईचा भडका उडाल्याने, देशातील ग्राहकांच्या खिशात पैसे नाहीत म्हणून स्वस्तातला पिझ्झा देत असल्याचा धादांत खोटा दावा केला आहे. त्याचा समाचार घेणारा हा लेख...

भारतात महागाईचा भडका उडाल्याने १४० कोटी लोकसंख्येच्या या देशातील ग्राहकांच्या खिशात पैसे नसल्याने, त्यांना पिझ्झा खाणे परवडत नाही, म्हणून ‘डोमिनोज’ने ४९ रुपयांत (०.६० डॉलर) जगातील सर्वांत स्वस्त पिझ्झा आणला आहे, असा दावा करणारे एक वृत्त ‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. हा सात इंची पिझ्झा भारतीय ग्राहकांसाठी खास आणला आहे, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. पैसे नसल्याने ग्राहक पिझ्झा खात नाहीत, म्हणूनच त्यांच्यासाठी ही विशेष योजना असल्याचे म्हणत अन्यत्र पिझ्झाच्या किमती किती आहेत, तेही यात दिले गेले आहे. शांघायमध्ये सर्वांत स्वस्त सॅव्हरी पिझ्झा ३.८ डॉलर, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये १२ डॉलर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी ‘डोमिनोज’ तसेच ‘पिझ्झा हट’, ‘बर्गर किंग’ यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतात कमी दरात त्यांची उत्पादने विकण्यास भाग पडले आहे, असे हे वृत्त म्हणते. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती काय आहे, हे समजून घेणे क्रमप्राप्त ठरावे.

गेली तीन दशके या बहुराराष्ट्रीय कंपन्या भारतात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेसारखीच भारतात महागाई आहे, असेदेखील म्हटलेले आहे. प्रत्यक्षात मार्च महिन्यात भारतातील महागाई दर ६.९१ टक्के होता, तर अमेरिकेत तो ८.५ टक्के इतका होता. संपूर्ण जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा वाढीचा वेग एक टक्क्यांच्या आसपास असताना भारतीय अर्थव्यवस्था सहा टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने वाढणारी जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे.

बहुराराष्ट्रीय कंपन्या ज्या ‘फास्ट फूड’ बाजारपेठेत आपला जम बसवण्यासाठी तीन दशके प्रयत्नांत आहेत, त्या ‘फास्ट फूड’ बाजारपेठेची वाढ भारतात ७.५ टक्के दराने होत आहे. २०२३ मध्ये ती ३०.५ अब्ज डॉलर इतकी होती. २०२८ पर्यंत ती ४५.५ अब्ज डॉलर होईल, असा अंदाज आहे. भारतातील मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असून, ते या ‘फास्ट फूड’चे ग्राहक आहेत. शहरीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असून, शहरांमधील नागरिक बदलत्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून ‘फास्ट फूड’कडे वळतात. ऑनलाईन ऑर्डर करणे तुलनेने सोपे झाल्याने, याला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या कंपन्या आक्रमक जाहिराती तसेच प्रचारासाठी ओळखल्या जातात. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करतात.
 
‘फास्ट फूड’चे सेवन करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. म्हणूनच १४० कोटी भारतीयांच्या बाजारपेठेवर बहुराराष्ट्रीय कंपन्यांनी संपूर्ण लक्ष दिलेले आहे.अर्थातच पिझ्झा आणि बर्गर भारतीय बाजारपेठेत नवीन राहिलेले नाहीत. तथापि, भारतीयांमध्ये ते म्हणावे तितके लोकप्रिय झालेले नाहीत, त्याचीही कारणे आहेत. भारतीयांची पारंपरिक आहारसंस्कृती विविधतेने समृद्ध आहे. तांदूळ, डाळी, भाज्या खाण्यावर येथे भर दिला जातो. पिझ्झा तसेच बर्गर हे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ असल्याने, त्याचे फारसे आकर्षण नाही. त्यांच्या किमतीही तुलनेने अधिक आहेत. पिझ्झाऐवजी भारतीय थाळी खाण्याला प्राधान्य दिले जाते. थाळीतून चौरस आहार-भात-आमटी (डाळ), भाजी-पोळी, चटणी, कोशिंबीर, एखादे पक्वान्न असे सारे एकत्रित मिळते. त्याचवेळी ‘पिझ्झा संस्कृती’ ही शहरांपुरती मर्यादित असून, ग्रामीण भागात ते तुलनेनेउपलब्ध होत नाहीत. मनोरंजनाच्या माध्यमांतून पिझ्झा संस्कृती वाढीस कशी लागेल, यावर भर दिला जात असला, तरी त्यांची उपलब्धता हाच प्रमुख विषय आहे. शहरातही प्रत्येक गल्लीच्या कोपर्‍याला असलेले उडुपी उपहारगृह कमी दरात चांगले अन्न उपलब्ध करून देतो. त्याशिवाय गल्लोगल्ली मिळणारे चटपटीत अन्नपदार्थही यात वडापाव, शेवपुरी, भेळपुरी, सामोसे यांचे मोठे आव्हान पिझ्झा-बर्गरसमोर आहे.


‘डॉमिनोज’च्या भारतात सुमारे २० हजार शाखा आहेत. तथापि, भारतीय खवय्यांच्या आवडींचा फारसा विचार न करता, त्यांनी शाखा उघडल्या, असे म्हणायला वाव आहे. पिझ्झाचे प्रकार, त्यांच्या किमती आणि ग्राहकांना दिली जाणारी सेवा यांचा विचार करावा लागेल. तसेच अन्य पिझ्झा विक्रेते यांच्याशी त्यांची स्पर्धा आहे. म्हणूनच त्यांना अपेक्षित यश मिळालेले नाही. म्हणूनच आता तोटा कमी करण्यासाठी कंपनीने पिझ्झाच्या सर्व बॉक्समधून आतील झाकण काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. ०.६ सेंट इतकी बचत प्रत्येक पिझ्झामागे केली जात आहे. अर्थात ‘डोमिनोज’समोर ‘पिझ्झा हट’चे प्रमुख आव्हान आहे. त्यांनी ७९ रुपयांत पिझ्झा देण्यास सुरुवात केली आहे. ‘मॅकडोनाल्ड्स’नेही वाढत्या स्पर्धेतटिकण्यासाठी त्यांच्या पदार्थांच्या दरात कपात केली आहे.

‘युरोमॉनिटर’च्या अंदाजानुसार भारतातीलफास्ट फूड बाजारपेठ ही अमेरिकेच्या ३४१ अब्ज डॉलरच्या तुलनेत केवळ एक टक्का इतकी आहे. सध्या ती पाच अब्ज डॉलर इतकी असून, २०२७ मध्ये ती १५ टक्के इतकी वाढलेली असेल, असाही अंदाज आहे.विदेशातील पिझ्झा-बर्गर भारतात हातपायरोवण्यासाठी तीन दशके प्रयत्न करत असताना, पंजाबी खाद्यसंस्कृतीने देशभरात चांगलेच बस्तान बसवलेले दिसून येते. देशभरात २०२३ मध्ये पंजाबी डिशेसची झालेली उलाढाल ही तब्बल १०.५ अब्ज डॉलर इतकी होती, २०२८ पर्यंत ती १५.५ अब्ज डॉलर इतकी होईल. देशभरात या डिशेस लोकप्रिय होत असून, भविष्यातही त्यांना चांगली मागणी राहील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी बिर्याणी हे भारतीयांचे ‘फर्स्ट लव्ह’ असल्याचे समोर आले आहे. एका ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीच्या मते,गेल्या १२ महिन्यांत भारतीय खवैय्यांनी तब्बल ७.६ कोटी बिर्याणींची ऑर्डर दिली.
 यात कोलकाता, मलबार, हैदराबाद दम बिर्याणी यांचा समावेश होता.


२०२२च्या तुलनेत त्यात आठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंद झाली. देशातील २.६ लाख रेस्टॉरंट्स ‘स्विगी’च्या माध्यमातून ती पुरवतात, तर २८ हजार रेस्टॉरंट्स केवळ बिर्याणीचीच विक्री करतात. सर्वाधिक बिर्याणी देणार्‍या शहरांमध्ये बंगळुरु २४ हजार रेस्टॉरंट्ससह प्रथम क्रमांकावर आहे, तर मुंबई २२ हजार रेस्टॉरंट्सने दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीत विविधता आहे, असे नेहमीच म्हटले जाते. भारतीय खवैय्यांनीही ती जपली आहे. म्हणूनच विदेशी पिझ्झा-बर्गरला येथे फारसा वाव मिळालेला नाही, असे असताना केवळ स्वतःचे दुकान चालावे, म्हणून स्वस्त दरात पिझ्झा देणार्‍यांनी भारतीय महागाईच्या नावे बोटे मोडावीत, हे म्हणूनच योग्य नाही. ‘प्रथितयश’ वृत्तसंस्थेने त्याचे वृत्त करून त्याला जगभरात प्रसिद्धी द्यावी, हे तर अजिबातच शिष्टसंमत नाही!

 
-संजीव ओक