मराठी चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर डंका!

    19-Jul-2023
Total Views |

marathi movie

 


रसिका शिंदे-पॉल
 
मनोरंजनाचा पाया घातला गेला तो मराठी माणसाकडूनच. दादासाहेब फाळके यांनी चित्रपटांची ओळख समाजाला करुन दिली. आणि त्यानंतर मराठीसह इतर भाषांमधील चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित होऊ लागले. गेल्या काही वर्षांपासूनही मराठी चित्रपटसृष्टीला चांगला काळ आला आहे असेच दिसून येत आहे. मराठी चित्रपटांची आशय निर्मिती ही खरचं पार वाखाण्याजोगी असते यात वादच नाही. विनोदी, सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर परखडपणे भाष्य करणारे अनेक मराठी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. अशातच २०१६ पासून तिकीट बारीवर आणि चित्रपटगृहांमध्येही हाऊसफुल्लच्या पाट्या दिसत आल्या. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसमध्ये यशस्वी खाते उघडले आणि आजपर्यंत तो सिलसिला मराठी चित्रपटांनी सुरु ठेवला आहे.
 
सुरुवातीच्या काळात महिन्याभरात २ किंवा ३ मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांसोबत प्रदर्शित होत होते. मात्र, आता तो काळ बदलला असून प्रत्येक महिन्याच्या दर शुक्रवारी हिंदी, इंग्रजी आणि अन्य भाषेच्या चित्रपटांसोबत मराठी चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. एकवेळ एखाद्या शुक्रवारी हिंदी चित्रपट प्रदर्शित नाही झाला तरी मराठी चित्रपट मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन अविरतरित्या करताना दिसत आहेत. तर म्हटल्याप्रमाणे 'सैराट' चित्रपटापासून जरी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई मराठी चित्रपटांची सुरु झाली असली तरी २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' चित्रपटांनेही भरघोस कमाई केली होती.
 
सध्या हिंदी चित्रपटांचा प्रेक्षक हा इतर भाषांमधील आशयांकडे अर्थात कंटेटकडे वळला असल्याचे दिसून येते. हा प्रेक्षकवर्ग प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांना अधिक पसंती देत आहे. मात्र, मराठी प्रेक्षकांनी मराटी चित्रपटांकडे पाठ फिरवली अशी तक्रार करणाऱ्यांसाठी २०१३ ते २०२३ या काळात मराठी चित्रपटांनी केलेली कमाई सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे देते. दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे मराठी चित्रपटांच्या तुलनेने हिंदी चित्रपटांना कायमच प्रदर्शनापुर्वी अडचणींचा सामना करावा लागतो. अर्थात त्याची कारणे फार निराळी असतात. त्यामुळेच हिंदी चित्रपटांवर ओढल्या जाणाऱ्या ताशेऱ्यांवरुन मराठी निर्माते अथवा दिग्दर्शक धडा घेत असतात आणि आपले सादरीकरण चोख पार पाडत असतात असे भासते.
 
बॉक्स ऑफिसवर यशस्वरित्या कमावलेली कमाई
 
दुनियादारी (२०१३) – ३० कोटी
टाईमपास (२०१४) – ३३ कोटी
टाईमपास २ (२०१५) – ३१ कोटी
सैराट (२०१६) – ११० कोटी
नटसम्राट (२०१६) – ४० कोटी
वेड (२०२२) – ७५ कोटी
पावनखिंड (२०२२) – ६० कोटी
धर्मवीर (२०२२) – २९ कोटी
चंद्रमुखी (२०२२) – १८ कोटी
महाराष्ट्र शाहीर (२०२३) – ७.३५ कोटी
वाळवी (२०२३) – ७.२५ कोटी
बाईपण भारी देवा (२०२३) – ५० कोटी