अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या म्हणून त्यांना भेटलो : उद्धव ठाकरे
19-Jul-2023
Total Views |
मुंबई : उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित दादांच्या बंडानंतर ही पहिलीच भेट होती. यानंतर ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या म्हणून त्यांना भेटलो, असं ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, आपण अजित पवारांना राज्यातील नागरिक, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, "अजित पवारांना राज्यासाठी चांगलं काम करा सांगितलं. सध्या सत्तेसाठी साठमारी चालली आहे, त्यामुळे इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये. पुराचं पाणी भरत आहे. शेतकरी मध्ये पाऊस नव्हता म्हणून हवालदिल होता आता कदाचित अतिवृष्टीने हवालदिल होईल तर या सगळ्या सातमारीमध्ये जो मूळ आपला शेतकरी आहे राज्याचा नागरिक आहे त्यांच्या विषयाकडेदुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंती अजित पवारांना केली."
"अजित पवारांनी अडीच वर्ष माझ्यासह काम केलं आहे. यामुळे मला त्यांच्या स्वभावाची कल्पना आहे. इतरांचे सत्तेसाठी डावपेच सुरु असले तरी त्यांच्याकडून राज्याला मदत मिळेल याची मला खात्री आहे. कारण त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा देण्यात आल्या आहेत. शिवसेनेत बंडखोरी करणारे आता अजित पवारांसहच सत्तेत आहेत असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले "खरं कोण, खोटं कोण हे कळण्याइतकं महाराष्ट्रातील जनता खुळी नाही. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे मी आधीही सांगितलं. सरकार स्थापन झालं तेव्हा मी शुभेच्छा दिल्या आहेत."
उद्धव ठाकरे बंगळुरुत झालेल्या बैठकीबद्दल बोलताना म्हणाले, "काल आणि परवा दोन दिवस बंगळुरुत देशप्रेमी पक्षांची एक बैठक झाली. देशप्रेमी आणि लोकशाही पक्षांची आघाडी झाली आहे. ही लढाई एखादी व्यक्ती किंवा पक्ष नाही तर हुकूमशाही विरोधात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री येत जात असतात पण जो पायंडा पडत आहे तो घातक आहे. त्यामुळे देशप्रेमी, लोकशाही पक्ष एकत्र येऊन त्याविरोधात लढत आहेत." असंही ठाकरे म्हणाले.