पहिल्या शतकाची सांगता

    19-Jul-2023   
Total Views |
Article On RamNam

स्वतः नाम घेता, नामाच्या विरोधी भूमिका घेऊन इतरांचा बुद्धिभ्रमकरणार्‍या पापी माणसाला यम दंड देतो. नामाविषयी वाटेल ते तर्कवितर्क करणे म्हणजे आपणहून नरकाचे दरवाजे उघडण्यासारखे आहे. अशा सदाचारी लोकात ’ची ची’ म्हणजे ’छी:थू’ होणारच. यासाठी अत्यंत आदरपूर्वक रामनाम घेत जावे.

भगवंताच्या नामाने अनेकजण उद्धरून गेले, हे माहीत असूनही जी माणसे रामनामाबद्दल संशय घेत राहातात आणि नामस्मरण करीत नाहीत, त्यांना स्वामींनी मागील श्लोक क्र. ९८ मध्ये ’पापरूपी जीव’ म्हटले आहे. ही माणसे संशयी, दुर्बल व आळशी असतात. शास्त्रात सांगितलेली व्रते, अनुष्ठान, तीर्थयात्रा, यज्ञ, योगयाग करून पुण्य संपादन करण्याची सबलता त्यांच्या ठिकाणी नसते. फुकाचे रामनाम घ्यावे, तर तेही त्यांना संशयामुळे व आळसामुळे जमत नाही. अशा माणसांचे पुढे काय होते, हे सांगण्यासाठी स्वामींनी मनाच्या श्लोकांतील पहिल्या शतकाचा अखेरीचा श्लोक लिहिला आहे-

जया नावडे नाम त्या येम जाची।
विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची।
म्हणोनी अति आदरें नाम घ्यावें।
मुखे बोलतां दोष जाती स्वभावे ॥१०१॥
काही लोकांना रामनाम आवडत नाही. भगवंताचे नाम न आवडण्याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे नामाविषयी सतत संशय घेत राहिल्याने नामावर, भगवंतावर विश्वास राहात नाही. जिथे विश्वास नसेल तिथे प्रेम कसे उत्पन्न होईल? संशय आणि विश्वास याबाबत विवेकाने विचार केला पाहिजे. व्यवहारात वागताना आपण पटकन विश्वास ठेवत नाही. काही बाबतीत सत्यस्थितीची कल्पना येईपर्यंत व्यवहारात शंका उपस्थित होणे स्वाभाविक असते. त्यामुळे चाणाक्षपणाने वागून व्यवहारात फसवणूक टाळता येते. तथापि व्यवहारातील हा नियम परमार्थात जसाच्या तसा लावता येत नाही. नाम घेण्याची क्रिया मीच करीत असल्याने ना मी कुणाला फसवत असतो, ना फसवला जात असतो.

मी भगवंताचे नाम घेतले तर त्यात कुणाचे फायदा-नुकसान नसते. झालाच तर माझे अंत:करण शुद्ध होण्याचा फायदा, कुणाचेही नुकसान न करता मला होईल. पण, तरीही भगवंताच्या नामाबद्दल सतत उगीच शंका घेत राहिल्याने रामनामासारखे परमार्थातील फुकटचे साधन हातातून निसटून जाते. रामनाम न आवडण्याचे दुसरे कारण म्हणजे मीपणा, गर्व, ताठा, अहंभाव आणि देहबुद्धी. ‘मी म्हणजे देह’ अशी पक्की भावना झाल्याने देहाचे सुख ते माझे सुख. कुठल्याही भल्याबुर्‍या मार्गांनी, स्वार्थबुद्धीने केवळ सुखी ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलो, तर मीच सुख मिळवले असे वाटू लागते, मग या सुखप्राप्तीत मला अज्ञात असलेल्या भगवंताचा संबंध आला कोठे? त्यासाठी मी रामनाम कशाला घेऊ? मला त्याची गरज नाही असा तो तर्क चालवतो. परमेश्वराला न मानणार्‍या अशा माणसाला पाखंडी म्हणतात. त्याचा देव, भक्ती, मुक्तिकल्पना सारे देहाशी निगडित असते. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात पाखंडी माणसाचे सुरेख वर्णन केले आहे, ते म्हणतात-

देह तोचि देव, भोजन ते भक्ती।
मरण ते मुक्ती पाखंड्याची॥
पाखंडी मनुष्य देव मानीत नाही, तर अती अहंकारी मनुष्य स्वतःलाचश्रेष्ठ, देव समजतो. त्याला वाटते मला भगवंताच्या नामाची गरज नाही. पूर्वपुण्याईने काही काळ प्रपंच अनुकूल झाल्याने अहंकारी माणसाला, असे वाटू लागते की मी मिळवले ते माझ्या हुशारीने व मेहनतीने. त्याला आपल्या पैशाचा, हुशारीचा ताकदीचा गर्व होतो, पुढे पुढे तो भगवंताचे नाम घेणार्‍यांची, भक्तांंची टिंगलटवाळी करू लागतो. असा माणूस स्वार्थी बनतो. रामनामाचा द्वेष करू लागतो. त्याच्या अंतःकरणातदेहबुद्धी पलीकडील परोपकार, भूतदया, सहानुभूती असल्या गुणांचा लवलेशही नसतो, स्वार्थापुढे त्याला गुणांची किंमत समजत नाही. त्याने पैसा हेच सर्वस्व मानल्याने व पैशाने काहीही विकत घेता येते अशी त्याची भावना असल्याने तो वाटेल त्या मार्गाने पैसा जमा करू लागतो.

न्याय-अन्यायाची चाड न बाळगता तो आपला स्वार्थ साधत असतो. पाप-पुण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. भ्रष्टाचाराचे त्याला काही वाटत नाही. द्रव्य आणि दारा हेच त्याचे सर्वस्व होऊन जाते. भगवंताचा व त्याच्या नामाचा त्याला पूर्णपणे विसर पडतो. रामनाम न आवडणार्‍या या दुरात्म्याला मृत्यूसमयी सारे काही इथेच सोडून जाणे जीवावर येते. त्या भौतिक गोष्टीत त्याचा जीव गुंतून पडल्याने मृत्यूसमयी त्या गोष्टी सोडताना त्याला अनेक यातना सहन कराव्या लागतात. अती अहंकारामुळे त्याने अनेक पापसदृश भ्रष्टाचार, अन्याय केलेले असतात. देहबुद्धी घट्ट असल्याने देहापलीकडे विचार करून परोपकार, भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य इत्यादी गुणांचे पुण्य त्याने जमा केलेले नसते.

साहजिकच आपल्या पापकर्माचा हिशेब त्याला चुकता करावा लागतो, त्यासाठी यमयातना भोगाव्या लागतात. यमयातनेचे नाना प्रकार, स्वामींनी दासबोधात दशक तीन समास आठमध्ये सांगितले आहेत. स्वामी या श्लोकात सांगतात की, ’जयां नावडे नाम त्या येम जाची.’ या पापरूपी जीवाने भगवंत नामाच्या विरोधात अनेक तर्कवितर्क करून इतरांना संभ्रमात टाकलेले असते. स्वतः नाम घेता, नामाच्या विरोधी भूमिका घेऊन इतरांचा बुद्धिभ्रम करणार्‍या पापी माणसाला यम दंड देतो. नामाविषयी वाटेल ते तर्कवितर्क करणे म्हणजे आपणहून नरकाचे दरवाजे उघडण्यासारखे आहे. अशा सदाचारी लोकात ’ची ची’ म्हणजे ’छी:थू’ होणारच. यासाठी अत्यंत आदरपूर्वक रामनाम घेत जावे. त्याने आपल्या ठिकाणी असलेले स्वार्थ, अहंभाव, द्वेष, मत्सर यासारखे दोष आपोआप नाहीसे होतात. रामनामाने अंतःकरण शुद्ध झाल्यावर वरील दोष आपल्या मनात शिल्लक राहात नाहीत, असा स्वामींचा अभिप्राय आहे.

मनाच्या श्लोकांतील श्लोक क्र. ८१ पासून समर्थ रामनामाचे माहात्म्य सलगपणे सांगत आलेले आहेत. त्याची पूर्तता या श्लोक क्र. १०१ मध्ये होते. मनाच्या श्लोकांना समर्थ ’मनाची शते’ असे म्हणतात. दोन शतकांपैकी पहिले शतक येथे संपले आहे. राघवाच्या पंथाचा पूर्वार्ध येथे संपला, येथून पुढील दुसर्‍या शतकात समर्थ भक्ती कशी करावी, त्यासाठी सदाचरणाची आवश्यकता, त्याचा अभ्यास कसा करावा, सद्विचार, सदाचार, सत्संगती, वादापेक्षा संवाद श्रेयस्कर, परब्रह्म रामाची प्रचिती इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य करणार आहेत. तत्पूर्वी पहिल्या शतकात स्वामींनी काय सांगितले याचा संक्षिप्त आढावा पुढील लेखात घेऊन नंतर दुसर्‍या शतकात प्रवेश करता येईल. (क्रमश:)

७७३८७७८३२२

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..