मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेचा प्राण म्हणजे दयाबेन टप्पूके पापा गडा अर्थात अभिनेत्री दिशा वकानी. दयाबेन अहमदाबादला गेल्याचे मालिकेत दाखवले आणि सहा वर्षांपूर्वी तिने शोला रामराम केला होता. इतक्या वर्षांपासून दयाबेन शोमध्ये परतणार कमबॅक कधी करणार अशी चर्चा आहे. दयाबेन नसल्याने शोचे अनेक चाहते नाराज असून दयाबेनच्या कमबॅकची अनेकांना प्रतिक्षा आहे. आता ही प्रतिक्षा संपणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दयाबेनच्या आवाजत गोकुळधाम सोसायटीमध्ये गरब्याचे बोल ऐकू येणार अशी चर्चा रंगली आहे.
दयाबेनचा भाऊ सुंदर गोकुळधाममध्ये आला की जेठालालची झोप कायमच उडते. गेल्या काही भागांमध्ये सुंदरला जेठालाल दया अहमदाबादवरुन परत कधी येणार असा प्रश्न विचारत असल्याचे दाखवण्यात आले होते. यावेळी सुंदर म्हणाला, 'मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की बेहना या दिवाळीत तुमच्या दारात दिवा लावायला येणार.' तसेच तो पुढे म्हणतो की, 'कदाचित बेहना दिवाळीच्या आधी देखील येईल.' त्यामुळे या वर्षाची दिवाळी गोकुळधाम वासियांसाठी आणि दयाबेनच्या चाहत्यांसाठी खास असणार असे दिसून येत आहे.
गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहता शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. २०१७ पर्यंत दिशा वकानी दयाबेनची भूमिका साकारत होती. दिशा वकानीने ९ वर्ष दयाबेन हे पात्र यशस्वीरित्या साकारलं. आपल्या भूमिकेने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर ती प्रसूती रजेवर गेली. शो सोडून सहा वर्ष झाली तरी अद्याप दिशा शोमध्ये दिसली नाही. आता दयाबेन पुन्हा शोमध्ये येणार असल्याची चर्चा असून अनेक प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.