मुंबई : अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी हिंडेनबर्गवर गंभीर आरोप केले आहेत. हिंडेनबर्गने जो अहवाल सादर केला होता तो कंपनीला बदनाम करण्याचे षड्यंत्र होते, असा आरोप गौतम अदानी यांनी केला आहे. ते म्हणाले की, कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी खोटी माहिती देऊन हा अहवाल तयार करण्यात आला होता जेव्हा समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस देशातील सर्वात मोठी फॉलो ऑन पब्लिक इश्यू घेऊन येणार होती, त्यावेळीच हा अहवाल कंपनीची बदनामी करण्यासाठी सादर करण्यात आला.
अदानी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गौतम अदानी म्हणाले की, हा अहवाल चुकीची माहिती आणि आरोपांचे मिश्रण आहे. यातील बहुतांश आरोप हे २००४ ते २०१५ या कालावधीतील आहेत. त्या वेळी या आरोपांची चौकशी करण्यात आली होती. जेव्हा आम्ही आमचा फॉलो ऑन पब्लिक इश्यू लॉन्च करणार होतो तेव्हा कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी अहवाल दुर्भावनापूर्ण भावनेने आणला गेला.
अदानी पुढे बोलतांना म्हणाले की, अदानी समूहाचा ताळेबंद, मालमत्ता, रोख प्रवाह सतत मजबूत होत आहे. नवीन व्यवसाय संपादन आणि नवीन व्यवसाय लॉन्च करण्याची कंपनीची गती सर्वात वेगवान आहे. आमची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी आमच्या शासनाचे मापदंड प्रतिबिंबित करते. ऑस्ट्रेलिया, इस्रायल, बांगलादेश आणि श्रीलंका येथे आमचा आंतरराष्ट्रीय विस्तार याची साक्ष देतो.