कलावंतांना लघुउद्योग करु द्यावा, मुख्यमंत्र्यांकडे शिव चित्रपट सेनेची मागणी

    17-Jul-2023
Total Views |

sushant shelar



मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिव चित्रपट सेनेची नुकतीच स्थापना झाली. दरम्यान, या शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार आणि सिने आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टी व कलाकारांच्या अनेक अडचणींबद्दल चर्चा केली. अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली असून केवळ टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलावंतांना ९० दिवसांनी मानधन मिळते ते ३० दिवसांच्या आत दिले गेले पाहिजे अशी प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.सुशांत शेलार आणि मनोज जोशी यांनी यावेळी इतर महत्वाच्या अडचणी देखील मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या असून त्या पुढीलप्रमाणे आहेत.
 
१.फेब्रुवारी २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे मनोरंजन क्षेत्रासाठी आखून दिलेल्या कार्यप्रणालीचं (SOP) कठोर पालन केले जावे.
२. टेलिव्हिजन वर काम करणाऱ्या कलावंतांना ९० दिवसांनी मानधन मिळतं ते ३० दिवसांच्या आत दिले जावे.
३. उपजीविकेसाठी केवळ कलाक्षेत्रावरच अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना लघुउद्योगाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.
४. महिला आणि बालकलाकार यांच्या चित्रीकरणाच्या वेळेचे कटाक्षाने पालन करण्यात यावे.
५. एखादी मालिका कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेल्या वेळेच्या आधी बंद झाल्यास निर्मात्याला संबंधित वाहिनींकडून नुकसान भरपाई देण्यात यावी.
६. कलावंत, तंत्रज्ञ यांना विमा कंपन्यांकडून विमा कवच उपलब्ध करून देण्यात यावे.
७. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांच्या तालमीसाठी महानगरपालिकेकडून माफक दरात जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
 
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व अडचणी सोडवण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले असून लवकरच सिने सृष्टीतील सबंधित व्यक्तींसोबत यासंदर्भातल्या बैठकीचे आयोजन केले जाईल असेही सांगितले.