मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक जोड्यांपैकी सगळ्यांची आवडती जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. नवा गडी नवं राज्य या नाटकानंतर ही जोडी पुन्हा रंगमंचावर कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहात होते. आता ती प्रतिक्षा संपली असून प्रिया आणि उमेशचं 'जर तर ची गोष्ट' हे नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे.
उमेश आणि प्रिया या दोन्ही कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयातून प्रेक्षकांची दाद आणि अपार यश मिळवले. प्रिया तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधीत्व उत्तमरित्या करत आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत असतानाच प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला. तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची हिट जोडी ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रिया बापट सादर करत असलेल्या, सोनल प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे नाव 'जर तर ची गोष्ट' असे आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. तर नंदू कदम ‘जर तर ची गोष्ट’चे निर्माते आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय प्रमुख भूमिकेत दिसतील.
रंगमंचावर एकत्र काम करण्याबाबत प्रिया बापट म्हणते, ''हे माझं दुसरं व्यावसायिक नाटक आहे. आपलंच प्रॉडक्शन असलेल्या नाटकात अभिनय करायला मिळणं आणि तेही आपल्या आवडत्या सहकलाकारासोबत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हा माझा हट्ट आणि इच्छा होती की माझं पुढील नाटकही उमेशसोबतच असावे. यासाठी आम्ही फार वाट पाहिली. अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे.'' तर उमेश प्रियासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल म्हणतो, ''नाटक हे माझं पहिलं प्रेम आणि माझ्या खऱ्या आयुष्यातील माझं प्रेम असं एकत्र मी माझ्या नवीन नाटकात जगणार आहे. 'नवा गडी नवं राज्य' या नाटकानंतर आम्ही एकत्र एक चित्रपट केला, वेबसीरिज केली. परंतु त्यानंतर असं वाटत होतं की एकत्र नाटक कधी करणार? आणि आता हा योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे.''