तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोन्मुडी यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

    17-Jul-2023
Total Views |
TamilNadu Higher Education Minister K Ponmudi ED Raid

चेन्नई
: तामिळनाडू सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री पोन्मुडी यांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली असून ईडीच्या रडारवर असणारे हे दुसरे मंत्री आहेत. दरम्यान, याआधी दि. १४ जुलै रोजी तामिळनाडू सरकारचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने मंत्री पोन्मुडी यांच्या निवासस्थानी छापेमारी केली.

दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने चेन्नई आणि विल्लूपुरमधील द्रविड़ मुन्नेत्र कड़गम (डीएमके) पार्टीच्या मंत्र्यावर केलेल्या छापेमारीनंतर तामिळनाडू सरकारमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा बाहेर येण्याची शक्यता आहे. तसेच, चेन्नईतील ईडीचे अधिकारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र कर्मचाऱ्यांसह दि. १७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता पोन्मुडी यांच्या सैंदापेट येथील घरी दाखल झाले होते. यावेळी मंत्री पोन्मुडी यांच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली असून मंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून घराच्या चाव्या गोळा केल्या आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तासह परिसराची घडती घेतली.
 
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, विक्रवंडी येथील सूर्या एज्युकेशनल ट्रस्टच्या आवारात आणि विल्लुपुरममधील त्यांचा मुलगा आणि कल्लाकुरिची खासदार गौतम सिगामनी यांच्या निवासस्थानावरही झडती घेण्यात आली. एकूण नऊ ठिकाणांचा शोध सुरू आहे. सध्याच्या तपासाचा संबंध पोन्मुडी यांच्याविरुद्ध दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने २०१२ मध्ये दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्याशी जोडला आहे. हे प्रकरण अद्याप विशेष न्यायालयात प्रलंबित आहे. २००७ ते २०११ दरम्यान पोन्मुडी खाण आणि खनिज संसाधन मंत्री असताना आणि त्यांचा मुलगा, मित्र आणि नातेवाईक यांच्या नावे उत्खनन परवाने मिळवले तेव्हाच्या कथित अनियमिततेशी संबंधित हे प्रकरण आहे. सिगामणी हे या प्रकरणातील दुसरे आरोपी आहे.