मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय!

    17-Jul-2023   
Total Views |
Mumbai Suburban District Legal Authority Secretary Satish Hiwale

कायद्याच्या न्याय शक्तीसोबतच सामाजिक न्यायासाठी तन-मन-धन अर्पण करुन सर्वश्रेष्ठ काम करणारे सतीश हिवाळे यांच्या कार्यविचारांचा घेतलेला मागोवा....

मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वचन माझ्या आयुष्याचे मार्गदर्शक तत्त्व आहे. माझे बाबा म्हणायचे की,“कुणी मान नाही दिला तरी चालेल; पण काम सोडायचं नाही.” हा विचार माझ्या आयुष्यासाठी प्रेरणादायी आहे.” ’मुंबई उपनगर जिल्हा विधी प्राधिकरण’चे सचिव सतीश हिवाळे. सतीश यांचे विचार, कार्य समाजासाठी कायमच प्रेरणादायी आहे. कारण, सतीश यांच्या विचारकार्याला त्यांच्या आधीच्या दोन पिढ्यांची कार्यतपस्या आहे. हिवाळे कुटुंब मूळचे जाफराबाद जालनाचे. सतीश यांचे आजोबा संतूजी, हे गावाचा विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध. गावातले कुणीही गोरगरीब उपाशी राहू नये किंवा कामासाठी गाव सोडून वणवण भटकू नये. म्हणून गावातल्या प्रत्येक गोरगरिबाला, त्यांनी स्वतःच्या २०० एकरपैकी १५० एकर जमीन दान दिली. त्यातही संतू आजोबांनी आणि पुढे सतीश यांचे वडील बाबुराव यांनी होतकरू विद्यार्थ्यांसाठी निशुल्क वसतिगृह बांधले.

संतूजी आजोबांचे सेवाकार्य पाहून त्यांना भेटायला त्यावेळी ‘पत्री सरकार‘ भेटायला आले होते. पुढे देश स्वातंत्र्य झाल्यावर काही सामाजिक मागणी घेऊन संतूजी यांनी लोकआंदोलन केले. त्यांना अटक झाली. त्यावेळी त्यांना तुरुंगातून सोडवायला प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. ते संतुजींना म्हणाले की, ”स्वतंत्र भारतात मागणी हक्क मिळवण्यासाठी आंदोलन नाही, तर कायदेशीर तरतुदींचा आधार घ्यायचा. कारण आपला देश आणि आपला कायदा आहे.” संतूजी आणि त्यांच्या पुढील सर्व पिढ्यांसाठी हा सुवर्णक्षण होता. महामानवाने संदेश दिला होता. पुढे संतूजी गावामध्ये सलग दहा वर्षे बिनविरोध सरपंच पदावर कार्यरत राहिले. त्यांचा कित्ता बाबुराव यांनीही गिरवला.

गावातल्या सर्व समाजाचे हक्काचे आशास्थान बाबुराव होते. सतीश यांची आई सिंधुबाई हीसुद्धा अत्यंत संस्कारक्षम गृहिणी. जातपात विसरून हिवाळे कुटुंब गावात समाजकार्याचा वारसा चालवत होते, तर अशा संस्कारक्षम, समाजशील कुटुंबाचे सुपुत्र सतीश. बाबुराव यांच्या घरी दररोज २०-२५ लोक न्यायनिवाड्यासाठी, मदत मागण्यासाठी येत. बाबुराव सतीश यांना सोबत घेत सगळ्यांचे म्हणणे ऐकत. कुणीही न्याय आणि मदतीविना विन्मुख जाणार नाही, हे पाहत. इतकेच काय आलेल्या प्रत्येकाला जेवल्याशिवाय परत पाठवत नसत. ग्रामीण भागातल्या सर्व जातीधर्माचे लोक त्यांचे प्रश्न त्यांची जीवनपद्धती याची सांगोपांग माहिती यातून सतीश यांना झाली. अशा प्रकारे सतीश यांचे शालेय शिक्षणासोबतच सामाजिक शिक्षणही सुरू होते.

दहावी झाल्यानंतर सतीश वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष समाजसेवा करू लागले. सामाजिक कार्य करताना त्यांना एक ज्वलंत वास्तव कळले की, अनेक युवकांवर केवळ अज्ञानामुळे गुन्हेगारीचा शिक्का लागतो. वेळीच कायदेशीर मदत मिळाली असती, तर त्यांच्या आयुष्याची वाताहत झाली नसती. समाजातल्या पीडितांना शोषितांना कायदेशीर मदत करण्यासाठी त्यांनी ‘एल.एल.बी‘ला प्रवेश घेतला. महाविद्यालयात ते ‘एल.एल.बी‘ला गुणवत्ता यादीमध्ये आले. सतीश आता औरंगाबाद उच्च न्यायालयात वकिली करू लागले. एकदा सतीश यांनी एका व्यक्तीला सल्ला दिला की “ न्यायालयात केस टाकूया.“ यावर बाबुराव म्हणाले, ” एका वेळीच्या जेवणाची भ्रांत आहे., त्यांना तू न्यायालयात दावा ठेाकायला सांगतोस? कोर्टकचेरी करायला पैसे नाहीत. कागदपत्राचे ज्ञान नाही.

कोर्टकचेरी करायला सांगू नकोस, तर ते करण्यासाठी काय मदत लागेल, ती मदत कर.” संविधानाने दिलेल्या न्याय-हक्काचे सामाजिक न्यायात रुपांतर करण्याचे कसब बाबुरावांकडे होते आणि तोच वारसा आज सतीश चालवत आहेत. पुढे आईच्या इच्छेखातर सतीश यांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची परीक्षाही दिली. या परिक्षेत त्यांनी ९३वा क्रमांक पटकावला. आईवडिलांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द. दिलेला शब्द पाळण्यासाठी सतीश दिवस-रात्र एक करत. पुढे सतीश यांची नियुक्ती न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरावर झाली. तिथून पुढे मुख्य न्याय दंडाधिकारी झाले. त्याचकाळात कोरोना आला. सतीश यांनी कायद्याच्या हद्दीत मानवतेची अपार सेवा केली. त्यांचे तत्कालीन साहेब दीपक ढोलकिया, सहकारी राजेश रोटे आणि इतर सहकर्मी यांच्या सहकार्‍यांनी सतीश नांदेडमधील तीन हजार गोरगरिबांपर्यंत मदतीचा हात घेऊन पोहोचले.

न्यायदान आणि प्रत्यक्ष सेवाकार्य यामध्ये सतीश यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांचे सेवाकार्य आणि सामाजिक न्यायाची दृष्टी लाभेलेले उदार व्यक्तिमत्त्व यांची छाप प्रशासनामध्ये नाही पडली, तर नवलच. पुढे त्यांची बदली मुंबई येथे झाली. कौटुंबिक, कामगार आणि औद्योगिक न्यायालय, लघुवाद न्यायालय यांसदर्भातले काम, गरजू महिला, बालक, दिव्यांग यांना न्यायालयीन मदतीचा हात, कायद्याबद्दल समाजात जागृती, विविध योजनांचा लाभ समाजाच्या अत्यंज घटकांपर्यंत कसा पोहोचेल, यासंदर्भातली सगळी जबाबदारी सतीश हिवाळे पाहतात. ‘विद्या विनयेन शोभते‘ हा सुविचार सत्यात जगणारे सतीश म्हणतात की, ”मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग मला शक्य होईल, तितकी सेवा, मी माझ्या बांधवांची केलीच पाहिजे. यात काही विशेष नाही.” असे हे सतीश सामाजिक न्यायाचे दूत आहेत, हे नक्कीच!

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.