फुलपाखरांच्या संख्येत घट

    17-Jul-2023   
Total Views |
Butterfly census in the United Kingdom

दरवर्षी जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात युनायटेड किंगडममध्ये(युके) फुलपाखरू गणना करण्यात येते. हे देशव्यापी नागरिक-विज्ञान सर्वेक्षण आहे. २०१० साली सुरू झालेले सर्वेक्षण फुलपाखरांचे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण मानले जाते. २०२२ मध्ये ६४ हजार नागरिकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता आणि संपूर्ण युकेमधून ९६ हजार फुलपाखरे आणि काही दिवसा उडणार्‍या पतंगांची संख्या नोंदवण्यात आली होती. या गणनेतून पर्यावरणाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यात येते.

यावर्षी दि. १४ जुलै रोजी या गणनेला सुरुवात झाली. परंतु, काही शास्त्रज्ञांच्या मते, २०२२च्या दुष्काळानंतर युकेच्या फुलपाखरांच्या संख्येत घट दिसून येऊ शकते. मागील उन्हाळ्यातील दुष्काळामुळे यावर्षी फुलपाखरांची संख्या कमी झाली असण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेत, फुले व पाने सुकून गेल्यामुळे अळ्यांना पुरेसे अन्न मिळाले नाही आणि त्या मरण पावल्या, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी तेथील नागरिकांनादेखील आवाहन केले आहे. यातून पर्यावरणावर झालेला हवामानाचा प्रभाव अधिक समजून घेण्यास शास्त्रज्ञांना मदत होणार आहे.

हा ‘बिग बटरफ्लाय काऊंट’ शुक्रवार, दि. १४ जुलैपासून सुरू झाला. हे सर्वेक्षण पुढील तीन आठवडे चालेल. स्थानिक नागरिकांना आपल्या परिसरातील बागेत १५ मिनिटे वेळ घालवून फुलपाखरांच्या प्रजाती आणि आकडेवारी गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातून मागील उन्हाळ्यातील दुष्काळामुळे फुलपाखरांच्या प्रजातींवर कसा परिणाम झाला, याचा अभ्यास करता येणार आहे.

यावर्षी आतापर्यंत, ‘टॉरटॉइजशेल’ आणि ‘पीकॉक’ या साधारणपणे सापडणार्‍या फुलपाखरांची संख्या सामान्यपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे. उष्णतेच्या लाटेमुळे गवत खाणार्‍या प्रजातींना विशेषतः गंभीर फटका बसला आहे. ‘रिंगलेट’ फुलपाखरांची संख्या नेहमीपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. परंतु, वरवर पाहता ‘मिडो ब्राऊन’ आणि ‘मार्बलड व्हाईट’ या फुलपाखरांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त दिसून आल्याचे समोर आले आहे. युकेमध्ये झालेल्या १९७६च्या दुष्काळानंतर या फुलपाखरांच्या अनेक प्रजातींना त्यांची संख्या पूर्वी इतकी करण्यासाठी एक दशक लागले.

ब्रिटनमधील फुलपाखरांच्या अनेक प्रजाती उत्तरेकडील किनार्‍यावर आहेत. या प्रजातींचा अधिवास लक्षात घेता तापमानवाढ आणि हवामानामुळे त्यांची संख्या वाढली पाहिजे. परंतु, डेटा दर्शवितो की, ब्रिटनच्या ५९ प्रजातींपैकी ८० टक्के प्रजातींची संख्या कमी होत आहे. ही फुलपाखरे काही प्रदेशांतून नाहीशी होत आहेत. मागील वर्षीच्या ’बिग बटरफ्लाय काऊंट’मध्ये मागील १३ वर्षांतील सर्वात कमी प्रमाणात फुलपाखरांची नोंद करण्यात आली. या घटत्या संख्येमागे अधिवासाचे नुकसान, औद्योगिक शेती आणि हवामानातील बदल असल्याचे मत स्थानिक फुलपाखरू संवर्धन कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. परंतु, गेल्या वर्षीच्या तापमानवाढ आणि दुष्काळाचा परिणाम सर्वत्र सारखा नाही. एकेकाळी सर्वव्यापी असणारे ‘टॉरटॉइजशेल’ दक्षिण ब्रिटनमध्ये तुलनेने दुर्मीळ झाले आहेत. परंतु, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडमध्ये फुलपाखरांची अधिक प्रमाणात नोंद झाली आहे.

‘बटरफ्लाय कन्झर्वेशन’चे शास्त्रज्ञ सूचित करतात की, युकेच्या फुलपाखरांसाठी येणारा काळ कठीण आहे. कारण, दीर्घकालीन ट्रेंड असे दर्शविते की, गत पाच दशकांमध्ये बहुतेक फुलपाखरांच्या प्रजाती एकतर विपुलतेच्या प्रमाणात नि वितरणात किंवा दोन्हींमध्ये कमी झाल्या आहेत. गेल्या मे महिन्यात ब्रिटिश फुलपाखरांची नवीन ‘रेड लिस्ट’ प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये सर्व धोकाग्रस्त प्रजातींची नोंद केली जाते. या यादीनुसार ब्रिटनमधील उर्वरित सर्व प्रजातींपैकी निम्म्या प्रजाती आता धोक्यात किंवा जवळपास धोक्यात आल्या आहेत. अलीकडील काळात इंग्लंडमध्ये ‘चेकर्ड स्किपर’चा यशस्वी पुनर्परिचय झाला. सोबतच वेस्ट मिडलॅण्डसमध्ये ‘वुड व्हाईट’ची संख्यादेखील वाढलेली दिसून आली. युकेच्या फुलपाखरांची सतत होणारी घट रोखण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली संसाधने अत्यंत अपुरी आहेत. परंतु, मागील वर्षीचा अहवाल पाहिला, तर अशी अनेक उदाहरणे दिसून येतील की, लक्ष्यित संवर्धन कृती अवलंबली, तर राष्ट्रीयस्तरावर धोक्यात आलेल्या फुलपाखरांचे भविष्य बदलू शकते.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.