विषारी सकारात्मकतेचे विरुद्ध परिणाम...

    17-Jul-2023
Total Views | 94
Article On Toxic positivity Negative Approach

‘विषारी सकारात्मकता’ म्हणजे आनंदी राहण्याचा किंवा आनंदाचा पाठलाग करण्याचा मनावर आलेला अथक दबाव. परिस्थिती कोणतीही असो, ‘विषारी सकारात्मकता’ अनेकदा वेदनादायक संवेदनांच्या प्रतिसादात प्रकट होते व अवास्तवआशावादी निर्णय घेण्यास प्रोत्साहन देते.

निराशावादी व्यक्ती वार्‍याबद्दल तक्रार करतो, पण आशावादी व्यक्ती ते बदलण्याची अपेक्षा करतो. मात्र, वास्तववादी व्यक्ती शीड समायोजित करतो. आयुष्यातील विपरित परिस्थिती असली तरीही हसतमुख, आनंदी आणि सकारात्मक राहणार्‍या व्यक्तींना आपण सगळ्यांनी पाहिले आहे. महापूर आले, महामारी आली, भूकंप झाले, जीवन विस्कळीत होऊ झाले तरी आपल्या मनात तिच्या ‘नॉर्मल’ असण्याबद्दल शंका यावी-इतकी ही व्यक्ती विचित्रपणे शांत आणि सकारात्मक राहते. आपण निवडकपणे व जाणीपूर्वक आपल्या भावना सुन्न करू शकत नाही, जेव्हा जेव्हा आपण वेदनादायक भावना सुन्न करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा आपण आपल्या सकारात्मक भावनादेखील सुन्न करतो. आपल्या क्लेशदायक भावना नाकारल्याने आपण अधिक सक्षम आणि अधिक लवचीक बनतो, हा लोकप्रिय समज असला तरी संशोधन असे दर्शविते की, ते प्रत्यक्षात आपले मन कमी लवचीक बनवते. भाव किंवा भावना ही सर्वसामान्य भाषा आहे आणि तिचा सन्मान आपण केला पाहिजे. तुम्ही या जगात जे कोण आहात याची ते अस्सल अभिव्यक्ती आहेत. दलाई लामा म्हणतात, त्यानुसार आशावादाचा अर्थ असा नाही की, तुम्ही परिस्थितीच्या वस्तुस्थितीबद्दल आंधळे आहात. याचा अर्थ असा आहे की, ज्या काही कठीण समस्या उद्भवतील त्यावर उपाय शोधण्यासाठी तुम्ही सदैव प्रवृत्त राहाल.

अर्थात, सकारात्मकता, आशावाद आणि कृतज्ञता दाखवण्यात काहीही चूक नाही. ती गुणवैशिष्ट्ये माणसाच्या भरभराटीसच मदत करतात. सकारात्मकता केवळ तेव्हाच समस्याप्रधान बनते, जेव्हा ती नकारात्मक भावनांना नाकारण्याचे कार्य करते - जर एखाद्याने आपल्या दुःखाला व्यक्त करण्यास प्रतिसाद दिला असेल, उदाहरणार्थ, हे सर्व चांगल्यासाठी आहे, यातून फक्त सकारात्मक होण्याचा प्रयत्न करा किंवा केवळ चांगली स्पंदने मिळतील. ही सगळी खोटी आश्वासने आहेत. जसे की, तुमच्या आईच्या अकाली मृत्यूनंतर कोणी म्हणत असेल की, सर्व काही कारणास्तव घडते किंवा तुम्ही तुमची नोकरी गमावल्यानंतर सर्व काही चांगले होईल असे कोणी म्हटले, तर ते पचायला जड जाते. अशा वेळी समोर आव्हान हे आहे की, आपल्या अंतर्गत (किंवा वैयक्तिक) जीवनाला दडपून काहीही होणार नाही. कामावर किंवा अन्यथा हसरा चेहरा ठेवण्यासाठी आपल्या भावनांना नाकारून काहीही साध्य होणार नाही. असे केल्याने लोकांना कमी सुरक्षित, कमी सकारात्मक आणि कमी लवचीक वाटते.

जेव्हा जीवनात क्लेशदायक गोष्टी घडतात, तेव्हा तुमच्या आणि इतरांच्या मनी आलेल्या भावना जशा आहेत तशा मान्य करा. वर सांगितल्याप्रमाणे अशा बळजबरीने निर्माण झालेल्या या वरकरणी भावनांपासून दूर राहा आणि गरज पडेल तेव्हा मदत घ्या. स्वतःची काळजी घ्या, आवश्यक असेल तेव्हा समर्थनासाठी विचारा आणि या दडपून टाकणार्‍या सकारात्मक भावनांना मनात नसताना अजिबात उजाळा देऊ नका. आजकाल, आपण सारे ‘सकारात्मक राहा’ या संदेशाच्या जवळजवळ अमर्याद हल्ल्याच्या अधीन झालो आहोत. काही बाबतीत, याचा अर्थ बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावरील महामारीच्या काळात दिसलेल्या नकारात्मकतेचा तितक्याच आक्रमक हल्ल्यापासून सकारात्मकतेने संरक्षण करणे आहे. पण, जेव्हा आपण सकारात्मक सूचनांना पुढे करत, आयुष्य पुढे घेऊन जाण्याची घाई करतो, तेव्हा आपण ज्याच्याशी बोलत आहोत, त्या व्यक्तीच्या खर्‍या वेदनादायक अनुभवावर अन्याय करतो. ही सकारात्मकता खरोखर घातक असते. कारण, ती त्या व्यक्तीला स्वतःची जन्मभूत ताकद वापरू देत नाही. याला ‘विषारी सकारात्मकता’ म्हणून ओळखतात.

‘विषारी सकारात्मकता’ म्हणजे आनंदी राहण्याचा किंवा आनंदाचा पाठलाग करण्याचा मनावर आलेला अथक दबाव. परिस्थिती कोणतीही असो, ‘विषारी सकारात्मकता’ अनेकदा वेदनादायक संवेदनांच्या प्रतिसादात प्रकट होते व अवास्तव आशावादी निर्णय घेण्यास प्रोत्साहन देते. ब्लड प्रेशर, कॅन्सरसारख्या आजारात अशा ‘विषारी सकरात्मकते’च्या अधीन जाऊन लोकांनी औषधोपचार सोडून दिलेत. रोगासारख्या गोष्टी कठीण आहेत हे स्वीकारले, तरीही जेव्हा तुम्हाला आशा वाटते की गोष्टी बदलू शकतात, तेव्हा ती उपयुक्त सकारात्मकता आहे. याउलट, ‘विषारी सकारात्मकता’ तुम्हाला कोणत्याही नकारात्मक भावनांचा स्वीकार करण्यास मनाई करायला प्रोत्साहित करते तेव्हा ते तुमच्या आरोग्यासाठी कठीण असू शकते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने मानसिक किंवा शारीरिक आरोग्याच्या समस्यांसह सर्व किंवा बहुतेक समस्यांचे निराकरण होईल. केवळ ’चांगल्या’ किंवा ’आनंदी’ भावना अनुभवण्यात फायदा आहे, असा चुकीचा समज जनमानसात दिसून येतो. जेव्हा दु:ख, वेदना किंवा अगदी राग यासारख्या अप्रिय संवेदना उद्भवतात, तेव्हा या भावनांना नाकारत किंवा त्यांना ना अनुभवता पुढे जायचा प्रयत्न करताना विषारी सकारात्मकतेच्या कल्पनेत अडकलेल्या लोकांना आणखी अप्रिय संवेदना जाणवू शकतात.

केवळ सकारात्मक कंपनांनी स्वतःला वेढून घ्या, हा मंत्र विशेषत: तीव्र वैयक्तिक त्रासाच्या वेळी कठोर असू शकतो. जेव्हा लोक आर्थिक अडचणी, नोकरी गमावणे, आजारपण किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन यांसारख्या संवेदनशील परिस्थितींचा सामना करत आहेत, तेव्हा त्यांना उज्वल बाजूकडे पाहण्याची आवश्यकता आहे, असे सातत्याने सांगितले जाणे कधी कधी क्रूर वाटू शकते. काही प्रकरणांमध्ये, ‘विषारी सकारात्मकता’ अपमानास्पददेखील असू शकते. अपमानास्पद व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीच्या भावना आणि अनुभवांचे अवमूल्यन करण्यासाठी याचा वापर करू शकते. आपल्याबरोबर काहीतरी चूक घडते आहे व अशा स्थितीत आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप कठीण आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गंभीर आजाराच्या शोकांतिकेनंतर, काहीवेळा लोकांना हेच कळत नाही की त्याचा थेट परिणाम झालेल्या लोकांशी आपण काय बोलावे.

कठीण गोष्टींबद्दल संभाषण करण्यापेक्षा ‘विषारी सकारात्मकता’ सहज वाटू शकते. दुर्दैवाने, ‘विषारी सकारात्मकते’मुळे अनेकदा आपण इतरांना आधार देण्याऐवजी त्यांना पंगू बनवतो, एकटे पाडतो. जेव्हा आपण प्रामाणिकपणे स्वतःला विचारतो की, आपल्या आयुष्यातील कोणती व्यक्ती आपल्यासाठी सर्वांत जास्त महत्त्वाची आहे, तेव्हा आपल्याला असे जाणवते की ज्यांनी नुसता सल्ला, उपाय किंवा उपचार देण्याऐवजी, आपल्या वेदना समजून घेऊन आपल्याला प्रेमाची उब दिली, ती सुंदर मनाची माणसे खरंच आपली होती. ‘विषारी सकारात्मकते’कडे न हरवून जाता, कठीण परिस्थितीशी सामना करण्याचे आणि पुढे जाण्याचे निरोगी मार्ग आहेत, ते समजावून घेऊया पुढील लेखात. (क्रमश:)

डॉ. शुभांगी पारकर


अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121