ओटीटी प्लॅटफॉर्मना अश्लिल आणि हिंसक सामग्रीचे पुनरावलोकन करावे लागणार
15-Jul-2023
Total Views | 53
नवी दिल्ली : ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या अश्लील आणि हिंसक सामग्रीचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश लवकरच दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म हे लोकप्रिय झाले असून भारतात नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, डिस्ने हॉटस्टार आणि अन्य बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म वापरात आहेत. यावर प्रसारित होणाऱ्या सामग्रीविषयी अनेकदा वाद निर्माण होत असतात. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे समजते.
प्राप्त माहितीनुसार, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या अश्लील आणि हिंसक सामग्रीचे स्वतंत्र पद्धतीने पुनरावलोकन करण्याची सुचना मंत्रालयाने केल्याचे समजते. त्यासाठी मंत्रालयात ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या प्रतिनिधींसोबत २० जून रोजी बैठक घेतली होती. यावेळी प्रतिनिधींना मंत्रालयाने अश्लील आणि हिंसक सामग्रीविषयी चिंता व्यक्त केली होती. अर्थात, त्याविषयी अद्याप एकमत झालेले नाही. मात्र, यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.