अखिलेश यादवांना मोठा धक्का! आमदाराने दिला राजीनामा
15-Jul-2023
Total Views |
लखनऊ : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक एकत्र येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र आता विरोधी पक्षामध्ये पक्ष सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता समाजवादी पक्षाचे आमदार आणि महत्त्वाचे नेते दारासिंह चौहान यांनी पक्षाला मोठा धक्का देत राजीनामा दिला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप सोडला आणि सपामध्ये प्रवेश केला होता.
दारासिंह चौहान हे उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी दि. १५ जुलै रोजी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष सतीश महान यांच्याकडे पाठवला, जो स्वीकारण्यात आला. दारासिंह चौहान हे ओबीसी वर्गाचे मोठे नेते आहेत. याशिवाय समाजातील जातीय समीकरणांवरही त्यांची पकड आहे.
इतकेच नाही तर मऊ, गाझीपूर, आझमगड, देवरिया आणि बलियासह अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. दारासिंह यांची राजकीय पकड आणि आगामी लोकसभा निवडणुका पाहता त्यांचा राजीनामा हा अखिलेश यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दारासिंह यांनी बसपामधून राजकीय प्रवास सुरू केला. १९९६ ते २००० पर्यंत ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. एवढेच नाही तर २००९ मध्ये त्यांनी बसपाच्या तिकिटावर घोसी येथून लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
२०१७ मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना योगी सरकारमध्ये वन आणि पर्यावरण मंत्री करण्यात आले. मात्र, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पाठ फिरवली आणि सपामध्ये प्रवेश केला. यानंतर घोसी सपाच्या तिकिटावर विधानसभेतून आमदार झाले. आता पुन्हा एकदा त्यांनी पक्ष सोडला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाची अटकळ बांधली जात आहे. यासोबतच ते भाजपच्या तिकीटावर घोसी विधानसभा किंवा गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असेही बोलले जात आहे.
गाझीपूरमधून बसपा खासदार असलेल्या अफजल अन्सारीला एमपी-एमएलए न्यायालयाने गँगस्टर कायद्यांतर्गत ४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. नियमानुसार २ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास खासदारकी किंवा आमदारकी निघून जाते. अशा स्थितीत गाझीपूरची जागा गेल्या ३ महिन्यांपासून रिक्त आहे. या जागेवरून पोटनिवडणूक होणार की सार्वत्रिक निवडणुकीत दारासिंह चौहान यांचा प्रवेश होणार, अशी चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, दारासिंह यांच्या राजीनाम्यानंतर घोसी विधानसभा जागाही रिक्त झाली आहे. अशा परिस्थितीत ते त्यांच्या पूर्वीच्या जागेवरूनही निवडणूक लढवू शकतात.