फ्रान्स दौरा ; एल्सी पॅलेसमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत, शिष्टमंडळ स्तरावर चर्चा

    15-Jul-2023
Total Views |
PM Narendra Modi France Tour Visited Elysee Palace

नवी दिल्ली :
पंतप्रधान मोदी दि. १४ जुलै रोजी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे अधिकृत निवासस्थान एल्सी पॅलेस येथे पोहोचले. मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजेट मॅक्रॉन यांनी मोदींचे येथे स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही फ्रान्सकडे नैसर्गिक भागीदार म्हणून पाहतो. आम्ही येथे आमचे युपीआय लाँच करत आहोत. मेक इन इंडिया आणि स्वावलंबी भारतामध्ये फ्रान्स हा महत्त्वाचा भागीदार आहे. संरक्षण क्षेत्रात सहकार्याची भरपूर क्षमता आहे. अंतराळ संस्थेमध्ये महत्त्वाचे करार झाले आहेत. मार्चमध्ये नवीन वाणिज्य दूतावास उघडला जाईल. फ्रेंच विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पॅरिससारख्या शहरात या प्रेमळ स्वागताबद्दल अध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार. येथे बॅस्टिल डे परेडमध्ये भारताच्या जल, जमीन आणि हवाई दलाचे पराक्रम दाखवण्यात आले. येत्या २५ वर्षांसाठी आम्ही ध्येय निश्चित करत आहोत. या काळात भारताने विकसित देश होण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी म्हटले आहे.

अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की, पॅरिसमध्ये भारतीय सैन्याच्या पंजाब रेजिमेंटने मार्चपास्ट करताना पाहणे ही अभिमानाची गोष्ट आहे. दोन्ही देशांतील तरुणांना एकमेकांच्या ठिकाणी शिक्षण आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी. आम्ही व्हिसाचे नियम सोपे करू, असेही त्यांनी नमूद केले.