लॉस एंजलिस : कमी वेतन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे उद्भवलेल्या धोक्यामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लेखक, कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञांनी संप पुकारला आहे. हा ६३ वर्षांतील सर्वात मोठा संप असल्याचे सांगितले जात आहे. तीन महिन्यांपूर्वी कमी वेतन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे उद्भवलेल्या धोक्यामुळे लेखकांनी काम बंद केले होते. आता त्यांच्या संपामध्ये हजारो चित्रपट आणि आणि मालिकांमधील कलाकारही सहभागी झाले आहेत.
वॉल्ट डिस्ने कंपनी आणि नेटफ्लिक्स स्टुडिओचे प्रतिनिधित्व करणार्या अलायन्स ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजनच्या निर्मात्याबरोबर कामगार युनियनचा नवा करार होई शकला नसल्यामुळे स्क्रीन अॅक्टर्स गिल्डने संपात सहभागी होण्याची घोषणा केली होती. हा संप गुरुवारी मध्यरात्री सुरू झाला असून स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड १,६०,००० हजार कलाकारांचे प्रतिनिधित्व करत आहे.
दरम्यान, या संपात सर्व कलाकार मंडळी सहभागी झाल्यामुळे अमेरिकेतील सर्व चित्रपट आणि स्क्रिप्टेड टेलिव्हिजन मालिकांची निर्मिती थांबली आहे. त्याशिवाय ज्यांचे स्वतंत्र प्रॉडक्शन आहेत आणि ज्यांचा युनियन लेबर करारामध्ये समावेश नाही त्यांचे मात्र काम सुरु आहे.
या संपामुळे ‘स्ट्रेंजर थिंग्ज’, ‘द हँडमेड्स टेल’ सारख्या लोकप्रिय मालिकांचे चित्रिकरण ठप्प झाले आहे. संप असाच सुरू राहिल्यास अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख आणि चित्रिकरण देखील पुढे ढकलले जाऊ शकते. स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड टॉम क्रूझ, अँजेलिना जोली आणि जॉनी डेप यांच्यासारख्या ए-लिस्ट स्टार्ससह १,६०,००० कलाकारांचे प्रतिनिधित्व करत असून मेरिल स्ट्रीप, बेन स्टिलर आणि कॉलिन फॅरेल यांच्यासह अनेक कलाकारांनी देखील या संपाला पाठिंबा दिला आहे.