मुंबई : सीमा हैदरला पाकिस्तानात परत न पाठवल्यास २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करु अशी धमकी देण्यात आली आहे. गुरुवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज आला. याचा तपास गुन्हे शाखा करत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवर हा मेसेज आला होता.
उर्दूमध्ये लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे की, “सीमा हैदर परत न आल्यास भारत उद्ध्वस्त होईल. २६/११सारख्या दुसर्या (दहशतवादी) हल्ल्यासाठी स्वतःला तयार करा आणि त्यासाठी फक्त उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल. सीमा हैदर परत न आल्यास हिंदू महिलांकडून बदला घेण्याची धमकी याआधी पाकिस्तानच्या आदिवासी गटातील डकैत्यांनी दिली होती. बलुचिस्तानच्या झकरानी कुळातील या गटाने सीमाला परत न पाठवल्यास पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जाईल, असे म्हटले होते.
सीमा हैदरला ३ जुलै २०२३ रोजी नोएडा पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारतीय सीमेत प्रवेश केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. कोरोना महामारीच्या काळात पबजी गेम खेळत असताना नोएडामध्ये राहणाऱ्या सचिनशी तिचे बोलणे झाले. यानंतर मैत्री वाढत गेली आणि दोघेही प्रेमात पडले. सचिनच्या प्रेमापोटी सीमा हैदरने पाकिस्तानमध्ये बांधलेले घर विकून भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती आपल्या 4 मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली.