‘चांद्रयान ३’चे यशस्वी प्रक्षेपण

चांद्रयान भारतीयांच्या आशा आणि स्वप्नांचे प्रतिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    14-Jul-2023
Total Views |
Indian Space programme Chandrayaan 3 Mission

नवी दिल्ली :
भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३चे मोहीम शुक्रवारीदुपारी २:३५ वाजता यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. चांद्रयान ३चे बूस्टर यशस्वीरित्या वेगळे झाले आणि अंतराळ कक्षेत प्रवेश केला. कमांड सेंटरमध्ये इस्रोचे माजी प्रमुख डॉ. सिवन आणि इस्रोचे विद्यमान प्रमुख एस. सोमनाथ यांच्यासह सर्व अवकाश शास्त्रज्ञ उपस्थित होते. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी चांद्रयान-३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात उपस्थित होते. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.

सुमारे ६१५ कोटी रुपये खर्चाचे चांद्रयान-३ लाँच केल्यानंतर इस्रोचे पहिले उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर लँडरचे सुरक्षित लँडिंग करणे आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावर २३ ऑगस्ट रोजी उतरवण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रक्षेपणानंतर, दोन्ही बूस्टर आकाशात ६२ किमीवर पोहोचल्यानंतर वेगळे झाले आणि रॉकेट ताशी ७,००० किमीपर्यंत पोहोचले. क्रायोजेनिक इंजिन सुरू झाल्यानंतर रॉकेटचा वेग ताशी 36,968 किलोमीटर असेल. प्रक्षेपणानंतर १६ मिनिटांनंतर ते पृथ्वीच्या कक्षेत स्थापित झाले. यानंतर ते हळूहळू चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. चांद्रयान-३ पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे ३.८४ लाख किलोमीटरचे अंतर ४० दिवसांत कापणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग हे या मोहिमेचे पहिले लक्ष्य आहे. दुसरे लक्ष्य म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर चालणे आणि तिसरे लक्ष्य रोव्हरकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे चंद्राची रहस्ये उलगडणे हे आहे.