पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान

    14-Jul-2023
Total Views |
France Highest Civilian Honor To PM Narendra Modi

नवी दिल्ली : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेच्या वतीने फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांचे आभार मानले. पॅरिसमधील एलिसी पॅलेस येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून बॅस्टिल डे परेडला सन्माननीय अतिथी म्हणून हजेरी लावली. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त, लष्करी बँडच्या नेतृत्वाखाली २४१ सदस्य त्रि-सेवा भारतीय सशस्त्र दलाच्या तुकडीनेही परेडमध्ये भाग घेतला. राजपुताना रायफल्स रेजिमेंटसह पंजाब रेजिमेंटने भारतीय सैन्य दलाचे नेतृत्व केले. हाशिमारा येथील १०१ स्क्वॉड्रनमधील भारतीय हवाई दलाच्या राफेल जेटने परेडदरम्यान फ्लाय पास्टमध्ये सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथे दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ला सीन म्युझिकेल येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारत आणि फ्रान्स यांच्यातील बहुआयामी धोरणात्मक भागीदारीला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात सांगितले. फ्रान्समधील मार्सेली येथे नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. भारत-फ्रान्स भागीदारीचा मजबूत पाया असलेल्या फ्रान्समधील भारतीय समुदायाच्या योगदानावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी रोजी फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांची भेट घेतली. आर्थिक आणि व्यापार, ऊर्जा, पर्यावरण, शिक्षण, वाहने, रेल्वे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, संग्रहालयशास्त्र आणि दोन्ही देशातील जनतेचा परस्परांशी संवाद यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. भारत आणि फ्रान्स यांच्यातील बहुआयामी सहकार्य अधिक बळकट करण्याचा दोन्ही बाजूंनी पुनरुच्चार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या सिनेटचे अध्यक्ष गरलार्ड लारचर यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारत आणि फ्रान्स यांच्यातील भागीदारीचा भक्कम पाया असलेल्या लोकशाही, स्वातंत्र्य आणि समता या समान मूल्यांचे महत्व अधोरेखित केले. भारताच्या जी २० परिषदेच्या अध्यक्षतेचे प्राधान्यक्रम, तंत्रज्ञानाचा वापर करताना लोकशाही मूल्यांचा अंगीकार आणि दोन वरिष्ठ सभागृहांमधील सहकार्य अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. याव्यतिरिक्त परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील विचारविनिमय झाला.