देशभरात दरवर्षी गणेशोत्सवाची आवर्जून वाट पाहिली जाते. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा उत्सव असतो. या काळात हजारो कोटींची उलाढाल होत असते. गणेश मूर्ती तयार करणार्या कसबी हातांना यामुळे काम मिळते. परंतु, मागील काही वर्षांत मातीच्या गणेशमूर्तींपेक्षाही ’प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती तयार करण्याचे प्रमाण वाढले होते. यंदा महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता सकारात्मक पाऊल टाकले आहे. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून (पीओपी) बनविलेल्या गणेश मूर्तींवर बंदी असल्याने ’पीओपी’ची गणेश मूर्ती खरेदी करू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आलेले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक गणेशमूर्ती या जैवविघटनशील, पारंपरिक शाडू माती, चिकणमातीपासून तयार केलेल्या असाव्यात. अलीकडच्या काळात विविध रासायनिक रंगांचा वापर मूर्तींमध्ये होतो. त्याऐवजी आपण फक्त नैसर्गिकरित्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे) खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरित्या तयार होणार्या रंगाचा वापर केलेल्या मूर्त्या घेऊ शकतो. अलीकडील काळात अनेक शाळांमधून याबाबत जागृती केली जाते. पालकदेखील उत्साहाने मुलांकडून शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करून घेतात. आजही पारंपरिक पद्धतीने घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे धर्मप्रेमी नागरिक मातीपासूनच बनविलेल्या मूर्तींना प्राधान्य देतात. मुळातच हिंदू संस्कृती ही निसर्गपूजक संस्कृती आहे. सनातन संस्कृतीचा विकास हा निसर्गाशी जुळवून घेत आणि त्याला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता घडलेला आहे. एकेश्वरवादी धर्मांमध्ये धर्म चिकित्सा आणि धर्म सुधारणा याला अजिबातच वाव नाही. आपल्या हिंदू धर्माच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी सुधारणा हे एक वैशिष्ट्य आहे. आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आपल्या देवतांचे पावित्र्य राखण्यासाठी या उपक्रमात होईल, तेवढा सहभाग नोंदविणे आवश्यक वाटते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्यवाढीसाठी प्रचारक ही जगाला अचंबित करणारी व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्याला पूरक अशी विस्तारक म्हणून जाणार्या कार्यकर्त्यांची फळी त्यापाठोपाठ येतेच. भारतीय जनता पक्षानेदेखील सर्वदूर पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवत विस्तारक संकल्पना राबविली. नुकताच भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर देशभरात विस्तारक म्हणून गेलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम केले. या मोहिमेत महाराष्ट्रातील तब्बल २ हजार, ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्ष हा एक परिवार असल्याचे नेहमी शीर्षस्थ नेते सांगत असतात. या परिवारात असणार्या कोट्यवधी कार्यकर्त्यांची आजवरची समर्पण, त्याग, सेवा आणि संघर्षाची भूमिका वेळोवेळी अधोरेखित झालेली आहे. त्याच्या आधारावरच पक्षाची वाटचाल जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष होण्यापर्यंत झालेली आहे. राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आलेल्या विस्तारक अभियानावेळीही हे स्पष्टपणे दिसून आलं. आपलं घरदार सोडून केवळ पक्षाच्या विस्तारासाठी परराज्याच्या विविध भागात जाणे, स्थानिकांशी संवाद साधणे, पक्षाची ध्येय-धोरणे पोहोचवणे, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. पण, भाजप कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी निष्ठेने निभावली. हीच भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहे. आगामी २०२४च्या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘मोदीऽ९’ या अभियानांतर्गत कार्यकर्त्यांना १४ कलमी कार्यक्रमदेखील देण्यात आलेला आहे. नियोजन, ध्येयाप्रती असलेली स्पष्टता, परिश्रम व त्यागाची पार्श्वभूमी यांमुळे पक्षाला पुन्हा यश मिळेल, यात शंका नाही. अयोध्येचे प्रभू श्रीराम मंदिर, कलम ’३७०’ हटविले जाणे आणि ’समान नागरी कायदा’ अशी कोट्यवधी संघ स्वयंसेवक आणि हिंदूंनी पाहिलेली स्वप्ने एकामागे एक पूर्ण होत आहेत. आगामी काळातही हिंदूंच्या अस्मितेला अधिक तेज प्राप्त करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आपणही साथ द्यायला हवी.
लक्ष्मण मोरे