‘बेबी फार्मिंग’चे नरक

    14-Jul-2023   
Total Views |
Article On Baby Farming human trafficking

कुक्कुटपालन किंवा ईद वगैरेसाठी बोकड पालन किंवा विक्रीसाठी मत्स्यपालन, हे पशुजीवी व्यवसाय जगभरात सुरू आहेत. जगभराचे देश या व्यवसायांसाठी त्यांच्या-त्यांच्या नागरिकांना प्रोत्साहन आणि सहकार्यही करत आहे. अर्थात पशू काय, पक्षी काय? त्याचे पालनपोषण करण्यामागे माणसाचा स्वार्थ आहेच. काय पाप, काय पुण्य या पार्श्वभूमीवरची यासंदर्भातली नीतीमत्ता तपासली तर?

हे आठवण्याचे कारण की, जगभरात फोफावलेली मानव तस्करी. माणसाला केवळ निर्जीव वस्तू सारखे वापरण्यासाठी जीवंत ठेवले जाते, असेही जगाच्या पाठीवर घडत आहे. लैंगिक शोषणासाठी बाल आणि महिलांची तस्करी होणे, त्यांना बंधक करणे या घटना, तर जगभरात घडतात. बाल कामगार किंवा महिला-पुरूष यांच्याकडून सक्तीने मजदुरी आणि इतर प्रकारची कष्टाची कामे करून घेणे, हेसुद्धा सुरू आहे. याच बरोबर नायजेरिया येथील आणखीन एक भंयकर प्रकारही आहे. उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे पशुपक्ष्यांचे पालन संवर्धन आणि त्यांची प्रजननवृद्धी वाढवण्यासाठी माणूस प्रयत्न करतो. त्यांची एक प्रकारे शेतीच करतो, असे म्हणू. मात्र, अशाप्रकारे बाळांचीही शेती केली जाते, असे म्हटले तर? सजीव अर्भकांची शेती?
 
होय, नायजेरियामध्ये ‘बेबी फार्मिंग’च्या नावाखाली हा उद्योग गेली, अनेक दशके सुरू आहे. इंडोनेशिया आणि युक्रेनमध्येही ‘बेबी फार्मिंग’च्या नावाने मुलींवर अत्याचार होत आहे. असो, बेकायदेशीररित्या का होईना; पण बाळांना जन्म घालून देण्याचा शेती व्यवसाय. ऐकायलाच किती घृणास्पद, तर नायजेरियामध्ये गेली अनेक वर्षे हा व्यवसाय होतो. नायजेरियामध्ये अनेक गुन्हेगार गट आहेत. त्यापैकी ‘बेबी फार्मिंग’ करणारेही आहेत. हे लोक १३ ते १७ वर्षांच्या मुलींना लक्ष करतात. कधी-कधी अपहरण करून कधी धाक दपटशाहाने, तर कधी नोकरी देण्याच्या आमिषाने फसवून दूर कुठेतरी अज्ञातस्थळी या मुलींना बंधक केले जाते. तिथे बंधक केल्यावर त्या मुलीला समजते की, तिच्यासारख्या १० ते २०-२५ मुली आधीच तिथे असतात. त्यांचा जगाशी कोणताही संपर्क राहणाार नाही, याची कडक व्यवस्था केलेली असते.

त्या मुली कुणाशीही संपर्क करू शकत नाहीत आणि पळून, तर अजिबात जाऊ शकत नाहीत. कशासाठी आणलेले असते या मुलींना? मजूर कामासाठी की, वेश्याव्यवसायासाठी? नाही तर या बंधक मुलींवर वारंवार बलात्कार करून त्यांना गर्भवती केले जाते. मुली गर्भवती असतानाही हे विकृत लोक त्यांच्यावर बलात्कार करतातच. या मुलींची इच्छा असो वा नसो या मुलींना एकच काम. ते म्हणजे त्यांनी बलात्कार सहन करायचा आणि मुलांना जन्म द्यायचा. बाळांना जन्म दिल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांची इच्छा असो नसो त्यांना पुन्हा-पुन्हा गरोदर राहावे लागते. बाळांना जन्म द्यावा लागतो. या बाळांचे काय होते? तर या मुलींना बंधक बनवाणारे जन्माला आल्या-आल्या बाळाची विक्री करतात. अनेक जोडप्यांना मूल होत नसते; पण दत्तक प्रक्रियेनुसार ते मूल दत्तक घेऊ शकत नाहीत किंवा एकल पालकाला मूल दत्तक घ्यायचे आहे; पण तो किंवा ती दत्तक घेऊ शकत नाही किंवा कुणाला मुलीच असतात, त्यांना मुलगा हवा असतो. मात्र, मुलगा दत्तक घेऊ शकत नाही. अशा लोकांना नवजात बाळ विकले जाते.

अर्थात, या बंधक मुलींना त्यांचे बाळ कुठे आहे, याची माहिती कधीही मिळत नाही. अक्षरशः यंत्रासारखे मुलांना जन्म देऊन या मुली एकतर कधीतरी मरतात, तरी किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त पावतात किंवा त्यांनी जननक्षमता संपते. त्यावेळी या मुलींना कू्ररपणे बाहेर फेकले जाते. भयंकर किती क्रूरता? माणुसकीला काळीमा फासणार्‍या या कारस्थानाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नायजेरियाचे प्रशासन कडक पावले उचलत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचे पडसाद उमटले आहेत. मात्र, तरीही आळा बसत नाही. कारण नायजेरियामध्ये गर्भपात करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अपहरण, फसवून बलात्कार केलेल्या मुलीं गरोदर राहिल्या, तर त्या गर्भपात करू शकत नाही. या बालिकांना मुलांना जबरदस्तीने जन्म द्यावा लागतो. या बाळांचे काय करायचे हा यक्षप्रश्न असतो. त्यामुळे त्या दुष्टचक्रात सापडतात. मुस्लीम आणि ख्रिस्तीबहुल असलेल्या नायजेरियामध्ये बालिकांवर होणारा हा अत्याचार! शब्दच नाहीत.

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.