‘कल्पवृक्ष’ कन्येसाठी...

    13-Jul-2023   
Total Views |
Sharad Pawar

 
काय करावं? मागच्या पावसात छत्री असून आणि माझ्याच नव्हे, तर अख्ख्या व्यासपीठाच्या डोक्यावर छत्री धरणारे लोक सोबत असूनही मी मुद्दाम पावसात भिजलो. महाराष्ट्राच्या भोळ्या-भाबड्या जनतेला मस्त मूर्ख बनवले. काय मस्त सिनेशॉट होता. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या फोटोंमधल्या आणि सगळ्या इव्हेंटमधला हा ‘मास्टरपिस इव्हेंट,’ तर काय सांगतोय पाऊस पडतोय. आजही छत्री न घेता भिजू का? पण, माझ्या भिजण्याने लोक आता काही मतं देत नाहीत, असा आतला रिपोर्ट आहे. कारण, लोकांना कळले की, साधं भाजी आणायला जायचं, तरी लोक छत्री घेऊन जातात. मग ‘लव्हासा सिटी’ बांधणार्‍यांकडे छत्री नसेल? भाषणात माझी लेक म्हणाली की, “बाप आजारी पडल्यावर त्याला दवाखान्यात कोण नेते? तर लेक नेते.” मग आता काही लोकांना असही वाटू लागले की, एका एकरातून वांग्याची शेती करून कोटी रुपये कमावणारी ही लेक त्यावेळी बापाला एक छत्री घेऊन देऊ शकली नाही.जाऊ दे, तर मुद्दा असा की, अजित तिकडे गेला. त्याच्यासोबत खूप लेाक गेले. अजितने मला घरी बसून आशीर्वाद द्या, असे सांगितले. आता अजितला काय माहिती नाही? आशीर्वाद का फुकट मिळतो का? त्या उद्धव ठाकरेंना विचारा, त्यांना मुख्यमंत्रिपदाचा आशीर्वाद दिला आणि त्याची किंमत त्यांना काय द्यावी लागली? अजितने मला वय झालं, आराम करा, असेही सांगितले. बाबा रे, लेकीच्या बापाच कधी वय होतं का? माझ्या सुप्रियाचे बस्तान बसवायचे आहे. इकडे राज्यात अजितच्या समोर तिचे काय होणार?यावर काही लोक म्हणतात की, मी ’लोक माझे सांगाती’ लिहिले, आता ‘लोक माझे माझ्यासारखेच संधी बघून सोडून जाती’ हे लिहिण्याची वेळ माझ्यावर आली आहे. असू दे, लोकांना काय सध्या जास्तच कळायला लागले आहे. जरा धिराने घेईन म्हणतो, बघू जरा सावकाशीने लेक केंद्रात कशी जाईल, यासाठी काड्या, नाही नाही काम कराव लागेल.साडेतीन जिल्हे आणि त्यांचे राज्यशकट हाकताना माझ्या आयुष्याचा बहुसंख्य वेळ गेला. या सगळ्यातून काय मिळवले, असे विचारता का? नकाच विचारू. कारण, खरं सांगू का, हे जे काही चालले ते केवळ आणि केवळ ‘कल्पवृक्ष’ कन्येसाठी बरं का?


साहेब घराणेशाही संपवलीत!

साहेब, मी आणि आमचे वांद्य्राचे साहेब म्हणत होतो की, महाराष्ट्र आमचा आहे. आम्ही म्हणजे महाराष्ट्र. त्यावेळी कमळवाल्यांचा देवेंद्र म्हणाला की, “महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही!” त्यानंतर जे काही घडले ते पाहिले, तर न बोलताही कळते की, खरंच महाराष्ट्र म्हणजे आम्ही नाही! आता तर सुप्रियाताई साहेब म्हणाल्या की, “त्या म्हणजे महाराष्ट्र!” भोगा आता.तसेच, सुप्रियाताई साहेब नुकत्याच ताज्या भाषणात म्हणाल्या की, “बापाला बरं वाटलं नाही, तर मुलगी त्याला दवाखान्यात नेते.“ मी म्हणतो, मी तर तुम्हाला कुठेही नेईन. आठवा ना ते दिवस, मी तुमच्यासाठी खुर्चीही उचलली होती. तुम्हाला जे आवडेल तेच बोललो होते. तुमची ‘कार्बन कॉपी’ बनत, मुस्लिमांची तळीही उचलली. साहेब लक्षात आहे ना? नाही तर तो मुंब्रा तयार आहेच. काय बरं म्हणाला ‘तो’ की, “त्याच्या रक्तात तुम्ही आहात.” साहेब, तिकडे लक्ष देऊ नका. मी आहे ना? भरीसभर जयंतराव म्हणाले की, “साहेब म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण.” सगळ्यांनाच तुमचे खास व्हायचे आहे. मग मी काय करू? इथे मशालीमध्ये फक्त मी आणि माझी सुषमाताई उरणार की काय? ‘उडाले ते कावळे राहिले, ते मावळे’ असे म्हणूही शकत नाही. सकाळी सोबत असलेले दुपारी सोबत नाही आणि दुपारी सोबत असलेले संध्याकाळी दूर गेले, असे दिवस आलेत. लोक म्हणतात ‘जैसी करणी वैसी भरणी.’ साहेब, मी स्वप्न पाहिलेली. वांद्य्राचे साहेब आणि त्यांचे चिरंजीव तिकडे देशाचे राजकारण करतील. मग महाराष्ट्रात कोण तर मीच; पण आता सगळे चित्र बदलले. कधी स्वप्नात वाटले नव्हते, असे लोक सत्तेच्या चाव्या भराभर फिरवीत आहेत. आमचे वांद्य्राचे साहेब, तर त्या धक्क्यातून अजून सावरले नाहीत; पण तुम्ही काय करणार साहेब? तुमची पोस्ट तुम्ही कधी तरी खाली कराल ना? नाही भावी पंतप्रधानाची किंवा भावी राष्ट्रपतीचे पद नाही म्हणत. मला मुख्यमंत्री बनवायचा विचार करत आहात, अशी नेहमीप्रमाणे अफवा पसरवली तरी चालेल. तसेही तुम्हाला घराणेशाही चालत नाही. तुमची लाडकी लेक सुप्रिया पवार यांना नाही, तर सदानंद सुळे यांची पत्नी सुप्रिया सुळे यांना पक्षाचे नेतृत्व दिले. घराणेशाही संपवलीत. इतकं सत्य बोललो... आता तरी साहेब माझा विचाार कराल ना?



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.