अमेरिकेत दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर

    12-Jul-2023
Total Views |
 
america
 
मुंबई : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी शिकागो परिसरात स्थायिक झालेल्या भारतीयांनी आषाढी एकादशी वारीचे आयोजन करून जणू पंढरपूर वारीचा अनुभव घेतला. महाराष्ट्र मंडळ शिकागो आपली संस्कृती, रूढी आणि परंपरा जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी अनेक उपक्रम आयोजित करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशीनिमित्त वारीचे आयोजन करण्याची संकल्पना मंडळाच्या विश्वस्त उल्का नगरकर यांनी मांडली. ती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अथणीकर आणि कार्यकारिणीच्या सदस्यांनी प्रत्यक्षात उतरवली. या वारीला स्थानिक लोकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शिकागोच्या अरोरा या उपनगरात एकादशीनिमित्त परेड आयोजित करण्यात आली होती. या परेडमध्ये महाराष्ट्र मंडळाने विठुरायाचा जयजयकार करीत आषाढी एकादशीनिमित्त वारीचे अतिशय उत्कृष्टप्रकारे सादरीकरण केले.
 
भाविकांनी बहुसंख्येने पारंपारिक वेशात टाळ, झांज, लेझीमच्या गजरात ध्वज पताकांसह सहभागी होत वारीचा आनंद लुटला. विठूनामाच्या गजरामुळे अवघे वातावरण विठ्ठलमय झाले होते. परेड जेथून जात होती त्या मार्गावर वारीला लोकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. वारकरी अखंडपणे नामजप करत किंवा आरत्या, अभंग व विठुरायाची भजनं गात चालत होते. स्त्रिया,पुरुष आणि मुले पारंपारिक पोशाख परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. पुरुषांनी खांद्यावर भगवी पताका, तर महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेतले होते. मुखी अखंड हरिनामाचा गजर सुरू होता. त्याला टाळ, झांज, लेझीमची साथ होती. सर्वांच्या अथक परिश्रमामुळे आणि उत्साहामुळे आषाढी वारीचा कार्यक्रम आनंददायी,नयनरम्य आणि यशस्वी झाला.