वाराणसीमध्ये होणार जगातील पहिले 'आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन'

प पु. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    12-Jul-2023
Total Views |
Rastriya Swayamsevak Sangh Inaugurates International Temple Exhibition

मुंबई
: भारताचे अध्यात्मिक केंद्र मानल्या जाणाऱ्या वाराणसीमधील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जगातील पहिले 'आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. २२-२४ जुलै २०२३ दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात चर्चासत्रे, सादरीकरणे, कार्यशाळा व मास्टर क्लासेसच्या माध्यमातून, मंदिर व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा व मार्गदर्शन सत्र होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन प पु. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. ते उपस्थितांना पाथेय देतील. या तीन दिवसीय सोहळ्यामध्ये ४५०हून अधिक प्रख्यात मंदिरांतील प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तब्बल २५ देशांतील हिंदू, शीख, बौद्ध व जैन धर्मांच्या भक्तीपर संस्था या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

मंदिरात येणाऱ्या भक्तांचा अनुभव व सुविधा अधिक सुकर करणे यावर या अधिवेशनात भर दिला जाणार आहे. हा कार्यक्रम मुख्यत्वे टेम्पल कनेक्टने (इंडिया) ने आयोहित केला आहे. हा सोहळा केवळ मंदिर व्यवस्थापनाला समर्पित असा जगातील पहिला कार्यक्रम आहे. मंदिर परिसंस्थेतील प्रशासन, व्यवस्थापन व कामकाजाची जोपासना आणि सक्षमीकरणावर या कार्यक्रमाचा भर असेल. हे अधिवेशन भाविक पर्यटन व तीर्थस्थळ परिसंस्थेमध्ये मूल्यवर्धन करणारे असल्याने भारत सरकारच्या ‘अतुल्य भारत’ उपक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्रालयाने याला पाठिंबा दिला आहे. तज्ज्ञांचे परिसंवाद, कार्यशाळा व विविध विषयांवरील मास्टर क्लासेसच्या माध्यमातून या ध्येयाची परिपूर्ती केली जाणार आहे. यांमध्ये मंदिराची सुरक्षितता, संरक्षण व टेहळणी, निधी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य तसेच सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या (एआय) नवीन युगातील तंत्रज्ञानांचा उपयोग आदी विषयांचा समावेश आहे. गर्दीचे तसेच रांगांचे व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आणि भक्तांच्या अनुभवांच्या आधारे पायाभूत सुविधांचा विकास या विषयांनाही कार्यक्रमादरम्यान घेण्यात येणार आहे.

टेम्पल कनेक्टचे गीरेश कुलकर्णी, महाराष्ट्र विधानपरिषद आमदार प्रसाद लाड (अध्यक्ष, इंटरनॅशनल टेम्पल्स कन्वेन्शन अँड एक्स्पो २०२३) आणि मेघा घोष यांच्या सहयोगाने ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. या तीन दिवसांच्या कार्यक्रमात अध्ययन व मंदिर व्यवस्थापनाची धुरा वाहणाऱ्या समविचारी आतिथींमध्ये कल्पना, शिक्षण व अमूल्य माहितीचे आदानप्रदान मुक्तपणे होणार आहे. जगभरातील मंदिर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांमध्ये सर्वोत्तम पद्धती प्रस्थापित करण्याच्या, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.