पवारांची साथ सोडणं या पाच नेत्यांना परवडणारं नाही! कारण...
11-Jul-2023
Total Views |
शरद पवारांचे एकेकाळचे पीए असलेले दिलीप वळसे पाटील असो की, राजकारणात पवारांसोबत सावली सारखे राहणारे प्रफुल्ल पटेल. शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्यांची यादी मोठी आहे. पण काही नेते असेही आहेत. ज्यांनी अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच आपण अशाच ५ नेत्यांची माहिती घेणार आहोत. ज्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. काय आहे या नेत्यांच राजकारण शरद पवार यांच्याविषयी असलेली निष्ठा की आणखी काही! हेचं आपण या लेखातून पाहणार आहोत.
शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेणाऱ्यात पहिल नाव येतं, अमोल कोल्हेंच. अमोल कोल्हे अजित पवार यांच्या शपथविधीला हजर होते. पण १२ तासातच त्यांनी आपली भूमिका बदलली. आणि आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याची घोषणा केली. अमोल कोल्हेंच पक्षात म्हणावं तेवढ वजन नाही. पण अमोल कोल्हेंच नाव घराघरात घेतलं जातं. त्याला कारण आहे. त्यांची टिव्हीवर येणारी मालिका स्वराज्यरक्षक संभाजी. यांचं लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २०१९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या निवडणूकीत त्यांनी शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभवही केला. आणि थेट लोकसभेत प्रवेश केला. पण जाणकार सांगतात की मागच्या ४ वर्षात त्यांचा शिरुर मतदारसंघात पाहिजे तेवढा जम बसलेला नाहिये. त्यातच काही दिवसांपुर्वीच विलास लांडे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीने २०२४ च्या निवडणूकीत शिरुर मतदारसंघातून विलास लांडेंना उमेदवारी देण्यात यावी, अशा मागणीची पोस्टर्स शिरुर मतदारसंघात लावले. विलास लांडेंनी ही लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. या वादात शरद पवार यांनी अमोल कोल्हेंना पाठबळ दिलं तर अजित पवारांचा पाठिंबा विलास लांडे यांना होता असं बोललं जातंय. यावरुनच हे लक्षात येत की, अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सर्व काही सुरळीत नव्हतं. यानंतर दुसरा एक मुद्दा आहे तो युतीचा, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोठा गट भाजपा-शिवसेना युतीत सहभागी झाला आहे. त्यामुळे आता या तिन्ही पक्षांत जागा वाटप होणार. यात शिरुर मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. आढळराव पाटील हे सध्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे तेच २०२४ च्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. अशावेळी अजित पवार यांच्यासोबत जाऊनही अमोल कोल्हे यांना शिरुर मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळेच अमोल कोल्हेंनी शरद पवार यांच्यासोबत राहणच पसंत केलं.
अमोल कोल्हे यांच्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे, जयंत पाटलांच. जयंत पाटील हे २०१८ पासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. वय आणि राजकारणात प्रवेश करण्याचा निकष लावल्यास, अजित पवार आणि जयंत पाटील हे एकाच पिढीतील नेते आहेत. जयंत पाटील हे १९९० ला इस्लामपुर-वाळवा मतदारसंघाचे आमदार झाले. तर अजित पवार १९९१ ला पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून खासदार झाले होते. दोन्ही नेत्यांच्या राजकीय महत्वकांक्षा जगजाहीर आहेत. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील पक्षांतर्गत असलेला संघर्षही अनेकदा चव्हाट्यावर आलायं. पक्षांतर्गत राजकारणात जयंत पाटील कायम शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याच बाजूने उभे राहिले. पण तरीही त्यांना अजित पवारांची पक्षातील असलेली जागा मिळवता आली नाही. आज अजित पवार यांच्या बंडाने जयंत पाटलांना ती आयती संधी मिळाली. आज राष्ट्रवादीतील सर्वच मोठे नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आहेत. त्यामुळे जयंत पाटील सध्या शरद पवार गटाचे नंबर एकचे नेते बनले आहेत. पण आता शरद पवार यांनी जर सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय केलं तर जयंत पाटील पुन्हा मागे खेचले जातील यात शंका नाही.
जयंत पाटील यांच्या नंतर तिसरा क्रमांक येतो तो म्हणजे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा. शरद पवार यांचे अतिशय विश्वासू समजल्या जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा कायमच अजित पवार यांच्यासोबत छत्तीसचा आकडा राहिलेलायं.अजित पवार यांनी भरसभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील पक्ष संघटना संपवल्याचा आरोप केला होता. तसेच जितेंद्र आव्हाडांनी आपल्याला अजित पवार यांनी पाठिंबा देण्यासंदर्भात विचारलं नाही असच मिडीयाला सांगितलं. जितेंद्र आव्हाडाचं राष्ट्रवादीतील महत्व शरद पवार यांच्या आशिर्वादामुळेच टिकून आहे. मुंब्रा मतदारसंघ सोडल्यास महाराष्ट्रातील कोणत्याही भागात त्यांचा जनाधार नाहिये. आज शरद पवारांनी आव्हाडांना विरोधी पक्षनेता बनवलं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मुंब्र्याच्या बाहेर त्यांच स्थान नाहिये.
यानंतर चौथ्या नंबरवर नाव येत ते. अनिल देशमुखांच. ईडीच्या भितीने आमचे सहकारी सरकारमध्ये सामील झाले असा आरोप शरद पवारांनी लावला होता. पण शरद पवारांच्या या आरोपांनुसार अनिल देशमुख सर्वात आधी या बंडात सहभागी झाले पाहिजे होते. पण ते झाले नाहित. त्यामुळे शरद पवार यांच्या ईडी आरोपांची हवा खुद्द अनिल देशमुखांनीच काढली. मग काय कारण आहे की अनिल देशमुख अजित पवार यांच्यासोबत सहभागी झाले नाहियेत. याला कारण आहे काटोल मतदारसंघाच स्थानिक राजकारण. अनिल देशमुख १९९५ ला पहिल्यांदा काटोल मतदारसंघाचे आमदार झाले होते. त्यानंतर ते २०१४ पर्यत या मतदारसंघाचे आमदार राहिले. पण २०१४ ला अनिल देशमुखांचा आशिष देशमुखांनी पराभव केला. हे दोघेही नात्याने काका-पुतणे आहेत. पण २०१९ येईपर्यत आशिष देशमुख काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली. यात आशिष देशमुखांचा पराभव झाला. पण तिकडे काटोल मतदारसंघात पुन्हा एकदा अनिल देशमुख आमदार झाले. पण आता पुन्हा एकदा आशिष देशमुखांची घरवापसी झाले आहे. आणि २०२४ च्या निवडणूकीत ते काटोल मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अनिल देशमुखांनी आपली उमेदवारी वाचवण्यासाठी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. असं वाटतंय.
यानंतर नंबर येतो राजेश टोपेंचा. राजकीय जाणकार सांगतात की, राजेश टोपे आणि अजित पवार यांच्यात घनिष्ठ संबंध होते. पण या संबंधात मीठाचा खडा पडला तो २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत. राजेश टोपेंचा घनसांवगी विधानसभा मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदार संघात येतो. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण २०१९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून राजेश विटेकरांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांना आपल्याच पक्षातील आमदार राजेश टोपेंची मदत मिळाली नाही. हे निकालातून स्पष्ट झालं होत. राजेश विटेकरांच्या पराभवाला टोपेंना जबाबदार धरण्यात आलं. आणि तेव्हापासूनच अजित पवार आणि राजेश टोपेंचे संबंध दुरावले. महाविकास आघाडीच्या काळातही त्यांना शेवटच्या क्षणी मंत्री करण्यात आलं. अजित पवार त्यांच्या प्रचाराला देखील आले नव्हते. यामुळेच राजेश टोपेंनी सध्यातरी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा पर्याय निवडला आहे. पण भविष्यात ते आपली भूमिका बदलू शकतात.