आठवणीतले गोसावी सर

    11-Jul-2023
Total Views |
Article On Doctor Gosavi

रोजचा सूर्य एक नवीन नांदी घेऊन येत असतो.आजचा सूर्य मात्र एक वेगळीच भयानक क्लेशदायक व दुःखद अशी बातमी घेऊन आला. सकाळी सकाळीच डॉक्टर गोसावी सरांनी शेवटचा श्वास घेतला ही बातमी आली. या बातमीवर विश्वास ठेवण्यास मन तयारच होत नव्हते. बातमी खरी आहे याची खात्री पटली आणि सरांबरोबरच्या काही आठवणीने मन जागृत झाले.

सरांची आणि माझी पहिली भेट ‘एम.कॉम’ प्रवेशाच्या वेळी झालेली होती. मी त्यावेळेस पेठे विद्यालयात नोकरी करत होतो. प्रवेश घेण्यास उशीर झाला होता. कॉलेजच्या कार्यालयातून सांगितले प्रवेश संपलेत. बाबुराव चव्हाण यांनी गोसावी सरांना भेटायला सांगितले. सरांची आणि माझी वेळ जुळत नव्हती. बाबुरावांना हे समजल्यावर ते म्हणाले, ”शनिवारी सर दुपारी असतात त्या वेळेस सरांना भेटायला ये.“ सरांकडे गेलो सरांना ‘एम.कॉम’चा प्रवेश अर्ज दिला. सरांनी त्वरित त्यावर स्वाक्षरी केली व ‘जा प्रवेश घे’ असे सांगितले. मी आनंदात होतो, चला आपला प्रवेश झाला. कार्यालयात गेल्यावर समजले सरांनी त्यावर लिहिलं होतं ‘अवाळीं चझच’ मी प्रवेश झाला या आनंदात ते वाचलेच नव्हते. सरांनी प्रवेश ‘एमपीएम’ला दिलेला होता, आता काय असा प्रश्न पडला सरांना भेटायला गेलो व सांगितले सर मला ‘एम.कॉम’ला प्रवेश हवा ‘एमपीएम’ला नको.सर म्हणाले, ”तू तर मला नोकरी करतो सांगितले.” मी म्हणालो, ’सर, मी पेठे विद्यालयात नोकरी करतो.

मला ‘एमपीएम’चा काही उपयोग होणार नाही.’ यावर ते म्हणाले, “मी चौकशी करेन तू खरच नोकरी करतो का?” किती वर्ष झाली नोकरीला, मी सांगितलं तीन वर्ष. सरांनी विचारले, ‘स्कूल कोड सेवाशर्ती नियमावली वाचली आहे का?‘ मी हो म्हणाल्यावर सरांनी त्या अनुलक्षिक काही प्रश्न मला विचारले. त्याची मी उत्तरं दिल्यावर सर खूश झाले. सर म्हणाले, “तू खरच हे दोन्ही पुस्तक वाचलेले दिसत आहेत.” सरांनी ‘एम.कॉम’ला प्रवेश करून दिला. त्यांनी ‘एम.कॉम’ला प्रवेश केला. मात्र, देताना नीट अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायला पाहिजे व मलाही रिझल्ट सांगितला पाहिजे, असे आवर्जून सांगितले. मी ‘एम.कॉम’ झाल्यावर पुन्हा सरांना भेटायला गेलो. सरांना रिझल्ट दाखवला. मी महाविद्यालयात पहिल्या दहा विद्यार्थ्यांत होतो त्यामुळे सरांनी विशेष कौतुक केले.

मी ‘सहकार भारती’चे काम करत होतो. २०१४ साली ‘सहकार भारती’ महाराष्ट्र प्रदेशाचे अधिवेशन नाशिकला घेण्याचे निश्चित झाले. स्वागताध्यक्ष कोणाला करावे यावर बरीच नावं समोर आली. सर्वांत शेवटी गोसावी सरांचे नाव एकमताने ठरले. डॉ. गोविलकर सरांनी फोनवरून गोसावी सरांना तशी विचारणा केली. सरांनी होकार दिल्यावर ‘शरद तुम्हाला भेटायला येईल,’ असे सांगितले. दुसर्‍या दिवशी मी, डॉ. उदय जोशी, प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला, विष्णूजी बोबडे असे आम्ही सरांना भेटावयास गेलो. सर ठरलेल्या वेळेला तिथे हजर होते. आम्ही ‘सहकार भारती’चे साहित्य बरोबर घेऊन गेलो होतो ते सरांना दिले. पण, सरांकडे त्या अगोदरच सर्व माहिती तयार होती. सरांशी विस्तृत चर्चा झाली.

सरांशी बोलून निघाल्यावर बिर्लाजींनी सरांना सांगितले, ”शरदचा तुमच्या नावाला खूप आग्रह होता.“ सर म्हणाले, “विद्यार्थी हेच आमचे असेट आहेत.” सर ’सहकार भारती’ प्रदेश अधिवेशनात स्वागताध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. त्यावेळेस वेळोवेळी सरांची भेट झाली. प्रत्येक वेळेस सरांनी काहीतरी नवीन मार्गदर्शन आम्हाला केले. सरांचा ’सहकार भारती‘शी त्यावेळेला आलेला प्रथमच संबंध होता. परंतु, सर ’सहकार भारती‘चे कार्यकर्तेच आहे, अशा अविर्भावात सरांचे वागणे होते. सरांचे त्या काळात मोलाचे असे मार्गदर्शन झाले व सरांकडून नवनवीन गोष्टी शिकावयास मिळाल्या.

मुक्त विद्यापीठाकरिता ‘आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर एक ‘पुस्तक लिहिले होते. सदर पुस्तक प्रकाशित झाल्यावर प्राचार्य डॉ. सर मो.स.गोसावी सरांना दाखवण्याकरिता गेलो होतो. सरांनी पुस्तकाची पानं फक्त चाळली. त्यानंतर सरांनी आर्थिक व्यवस्थापनावर माझ्याबरोबर चर्चा केली. मला काही इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात, हे विचारले. उदाहरणार्थ रेकॉर्ड. मी सरांना सांगितलं दप्तर. सर असे मला का विचारत आहेत ते कळेना. नंतर सरांनी सांगितले, ’आपण ज्या भाषेत पुस्तक लिहितो तीच भाषा पुस्तकात आली पाहिजे. रेकॉर्डला दप्तर हा शब्द जर तुला माहिती आहे, तर पुस्तकात लिहिताना तसा उल्लेख का केला नाही.’ त्यानंतर सरांनी मराठी भाषा त्याचा शब्दसंग्रह त्याची उत्पत्ती अशी सखोल माहिती सांगितली. माझे पुस्तक मराठीत होते आणि त्या संपूर्ण पुस्तकात तीन शब्द मी इंग्रजीत लिहिले होते.

सरांनी पुस्तक चाळताना नेमके तेच शब्द हेरले आणि मला लेखन करताना काय काय काळजी घ्यावी, अशा बारीकसारीक सूचना केल्या.कॉलेज सोडून सुमारे ४० वर्ष झाले. पण, सरांकडे गेलो, तर सर त्याच उत्साहाने मार्गदर्शन करीत असत. मी माझे लेखन त्यांना वाचायला द्यायचो. सर मला टाळू शकत होते. चांगले लिहिले किंवा थातूरमातूर लिहिले असे सांगून विषय संपवू शकत होते. पण सर नेहमी माझे लेखन काळजीपूर्वक वाचत, योग्य ते बदल सुचवत. कोणत्या पद्धतीने लिहिले असते तर आणखीन वाचनीय झाले असते हे सुद्धा सांगत. लेखक म्हणून सरांचं ते मार्गदर्शन खूप उपयुक्त होते. अशा मार्गदर्शक शिक्षकाने आज शेवटचा श्वास घेऊन इहलोकीची यात्रा संपवून अनंताचे प्रवासास निघालेत. सरांचा तोही प्रवास असाच देदीप्यमान राहील. सर आता देह रुपाने समोर जरी नसले तरी त्यांनी केलेले मार्गदर्शन कायम स्मरणात राहून त्यावरच वाटचाल चालू राहील.

शरद जाधव 
९४२२७६१६९९