मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याने एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट दिले होते. मात्र, अलीकडे त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करण्यात कमी पडत आहे असे दिसून येत आहे. अक्षयचा ओएमजी २ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून त्याचा चित्रपटातील लूक समोर आला आहे. अक्षयने समाजमाध्यमावर प्रदर्शित केलेला त्याच्या या लुकमध्ये तो काळ्या टी-शर्टमध्ये त्रिपुंड, भस्म, जटा, रुद्राक्ष माळा यांसह दिसत आहे. अक्षय कुमारला शंकराच्या अवतारात पाहून लोकांनी लेगचच सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटातून तरी हिंदु धर्माचा अनादर केला जाऊ नये अशी तंबीच नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला आणि पर्यायाने दिग्दर्शकांना दिली आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाने करोडो हिंदु धर्मियांच्या भावनांचा अपमान केल्याने आता 'ओएमजी २' या चित्रपटातूनही त्याची पुनरावृत्ती होणार नाही ना अशी सल प्रेक्षकांना लागली असता त्यांनी अक्षयच्या या लूकवर कमेंट करत ती व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने अक्षयच्या या व्हिडिओवर कमेंट करत "हा चित्रपट हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणार नाही, अशी अपेक्षा आहे, " असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "यावेळी तरी सनातन आणि देवतांची खिल्ली उडवू नका...समजलं का?", अशी कमेंट केली आहे. "'ओएमजी' तर हिंदू धर्माच्या विरुद्ध होता. हा चित्रपट चांगला असेल अशी अपेक्षा करतो," असंही एकाने म्हटलं आहे. "मी मुस्लीम आहे, पण ओएमजी २ हा चित्रपट", असं म्हणत एका नेटकऱ्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. "देवाच्या नावावर यावेळी काहीही उलट सुलट दाखवून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या तर बॉलिवूडकरांची खैर नाही," असा इशारा नेटकऱ्यांनी कमेंटमधून दिला आहे.
दरम्यान, अभिनेते परेश रावल आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला ओएमजी हा चित्रपट २०१२ रोजी प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा हा पुढील भाग असणार आहे. ओएमजी चित्रपटाच्या पहिल्या भागात परेश रावल हे नास्तिक दाखवले होते आणि अक्षय कुमार मानवरुपी श्री कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. आता ओएमजी २ मध्ये शंकराच्या रुपात दिसणारा अक्षय कुमार प्रेक्षकांची मने जिंकणार का हे येणारा काळच ठरवेल. अमित राय यांनी ' ओएमजी २' चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्याही भूमिका आहेत.