खलिस्तान समर्थकांना भारतीय समाजाचे जोरदार प्रत्युत्तर!

    10-Jul-2023   
Total Views |
Indian society Strong respond to supporters of Khalistan

खलिस्तानवाद्यांची भारतीय दूतावासांवर हल्ले करण्याची धमकी लक्षात घेऊन दि. ८ जुलै रोजी टोरोंटोमधील भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज हाती घेऊन मोठ्या संख्येने तेथे जमले होते. उपस्थित भारतीयांकडून ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘लॉन्ग लिव्ह इंडिया’, ‘खलिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.

कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सक्रिय असलेल्या खलिस्तान समर्थकांनी अलीकडील काही दिवसांमध्ये भारतविरोधी पत्रकबाजी आणि निदर्शने करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालवला आहे. खलिस्तानचा समर्थक असलेला दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची गेल्या महिन्यामध्ये कॅनडामध्ये हत्या झाली होती. या हत्येमागे भारताचा हात असल्याचे समजून ‘सिख्ज फॉर जस्टीस’ ही बंदी घालण्यात आलेली संघटना आणि अन्य खलिस्तान समर्थक भारतविरोधी मोहीम चालवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. ८ जुलै रोजी कॅनडा आणि अन्य काही देशांमध्ये ‘किल इंडिया’ सभांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय दूतावासातील ज्येष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांवर हल्ले करण्याचे आवाहन या खलिस्तान समर्थकांनी केले होते. त्याच हेतूने मध्यंतरी अमेरिकेतील सॅनफ्रॅमान्सिको येथील भारतीय वकिलातीवर खलिस्तान समर्थकांनी हल्ला करून जाळपोळ केली होती. या खलिस्तानवाद्यांना संबंधित देशातील भारतीय सडेतोड उत्तर देऊ लागले आहेत. कॅनडामधील टोरोंटो शहरात खलिस्तानी समर्थकांनी जी निदर्शने आयोजित केली होती, त्यास तेथील भारतीयांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

खलिस्तानवाद्यांची भारतीय दूतावासांवर हल्ले करण्याची धमकी लक्षात घेऊन दि. ८ जुलै रोजी टोरोंटोमधील भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज हाती घेऊन मोठ्या संख्येने तेथे जमले होते. उपस्थित भारतीयांकडून ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘लॉन्ग लिव्ह इंडिया’, ‘खलिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. तसेच, त्यांच्या हातात ‘खलिस्तानी आर नॉट सीख्ज’, ‘कॅनडा स्टॉप सपोर्टिंग खलिस्तानी कॅनेडियन टेररिस्टस्,’असे लिहिलेले फलकही होते. वकिलातीसमोर जे भारतीय जमले होते, त्यातील सुनील अरोरा या व्यक्तीने सांगितले की, “खलिस्तानी समर्थकांना तोंड देण्यासाठी आम्ही भारतीय वकिलातीसमोर उभे ठाकले आहोत. हा खलिस्तानी मूर्खपणा थांबविण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही येथे आहोत. भारत आणि कॅनडा यांच्यातील ऐक्य दाखवून देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांची हत्या करू, अशी चुकीची माहिती ते देत आहेत. आम्ही त्याच्या विरुद्ध आहोत,” असेही त्या भारतीयाने सांगितले.

विद्याभूषण धार नावाच्या भारतीयाने सांगितले की, “कॅनडा हा शांतिप्रिय देश आहे. या खलिस्तानी समर्थकांची दखल घ्यावी, असे आम्ही कॅनडाच्या सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार म्हणजे नक्कीच विचार स्वातंत्र्य नाही.” खलिस्तान समर्थकांनी दि. ८ जुलै रोजी ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथील भारतीय दूतावासासमोर निदर्शने करण्याचे आवाहन केले होते. तसेच, भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांना ठार करण्यासंबंधीची पोर्स्ट्सही झळकविली होती. भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य असले तरी भारताविरुद्धच्या असे प्रकार संबंधित देशांनी खपवून घेता कामा नयेत. या प्रकरणी संबंधित देशांकडे भारताकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असली, तरी खलिस्तान समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई केल्याचे दिसून येत नाही.

कॅनडामध्ये शीख समाज मोठ्या संख्येने आहे. शीख समाजाची मतपेढी जपण्यासाठी खलिस्तानवाद्यांविरुद्ध त्या देशाकडून कारवाई केली जात नाही ना, या शंकेसही वाव आहे. राजनैतिक पातळीवर या खलिस्तानवाद्यांचा बंदोबस्त करण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहेतच. भारतविरोधी खलिस्तानवाद्यांनी आपले हातपाय इतरत्र पसरू नयेत. म्हणून भारताने त्वरित पावले टाकण्याची आवश्यकता आहे.

कर्नाटक सरकारच्या हिंदूविरोधी धोरणामुळे जैन साधूची हत्या

जैन साधू आचार्य कामकुमार नंदी यांच्या चिकोडी येथे झालेल्या नृशंस हत्येचा विश्व हिंदू परिषदेने तीव्र निषेध केला आहे. या हत्येस कर्नाटक सरकारची हिंदूविरोधी धोरणे कारणीभूत आहेत, असेही विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. दिगंबर पंथाच्या या जैन साधूंचे त्यांच्या आश्रमातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या देहाचे तुकडे केले होते. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या हिंदूविरोधी धोरणामुळे ही हत्या झाल्याचे विश्व हिंदू परिषदेचे महासचिव मिलिंद परांडे यांनी म्हटले आहे. जैन साधू आचार्य कामकुमार नंदी हे गेली १५ वर्षे आनंद पर्वतावर वास्तव्य करीत होते आणि स्थानिक जनतेला मार्गदर्शन करीत होते. कर्नाटक सरकार गोहत्येवर बंदी उठविणारा आणि धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याची भाषा बोलत असल्याचे लक्षात घेत राज्यात धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही शिरजोर झाले असल्याचे दिसून येत आहे. जैन साधूची हत्या करणार्‍या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणीही विश्व हिंदू परिषदेने केली आहे. कर्नाटक सरकारच्या हिंदूविरोधी धोरणांमुळे त्या राज्यात साधू आणि भारतीय समाज सुरक्षित नाही. मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य अतिरेक्यांना आणि इस्लामी जिहादींना आहे, असे मिलिंद परांडे यांनी म्हटले आहे. काँग्रेस सरकारने आपल्या हिंदूविरोधी मानसिकतेतून बाहेर पडावे आणि या अमानुष हत्येबद्दल माफी मागावी, अशी मागणीही परांडे यांनी केली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी या हत्येचा निषेध केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मानवतेचा, अहिंसेचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या एका जैन साधूची हत्या झाल्याच्या घटनेचा जैन आणि हिंदू समाजाकडून निषेध केला जात आहे.

किडनी देणार्‍या हिंदू महिलेवर ‘त्या’ मुस्लिमाकडून टीका

ज्याचे भले करण्यास जावे, त्यानेच केलेले उपकार विसरून त्याच्यावरच टीकेची झोड उठविण्याचा प्रकार केरळमध्ये नुकताच घडला आहे. एका हिंदू तरुणीने २०१२ मध्ये एका मुस्लीम रुग्णास आपली किडनी दिली होती. या हिंदू महिलेचे नाव लेखा नंबुद्री असे असून, ती अलप्पुझा जिल्ह्यातील रहिवासी आहे. एका रुग्णास किडनी हवी असल्याची जाहिरात या महिलेने २००९ मध्ये वाचली होती आणि आपली किडनी देण्याची तयारी त्या महिलेने दर्शविली. पत्तम्बी येथे राहणार्‍या शफी नावाच्या रुग्णास किडनीची अत्यंत आवश्यकता असल्याने त्यास आपली किडनी देण्याचे या महिलेने ठरविले. त्याप्रमाणे किडनी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या घटनेस दोन वर्षे उलटून गेल्यानंतर एका स्थानिक प्रकाशनाने ही सर्व ‘स्टोरी’ प्रसिद्ध करण्याची इच्छा त्या महिलेकडे व्यक्त केली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे एक उदाहरण म्हणून त्या प्रकाशनास ही घटना प्रसिद्ध करावयाची होती; पण माध्यमांच्या प्रसिद्धीझोतात येऊ नये, म्हणून प्रारंभी त्यास त्या महिलेने नकार दिला. पण, नंतर त्यास लेखा आणि तिचा नवरा साजन यांनी अनुमती दिली. किडनीदान केल्याची ही घटना प्रसिद्ध होताच, त्या महिलेवर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव झाला; पण त्यास जातीय रंग दिला गेल्याने ते दाम्पत्य अस्वस्थ झाले. ‘कम्युनल किडनी’ या शीर्षकाखाली ती ‘स्टोरी’ प्रसिद्ध करण्यात आली होती. घरची परिस्थिती चांगली नसताना आणि किडनी देण्यासाठी १५ लाखांची ऑफर असताना, त्या महिलेने संबंधित रुग्णास मोफत किडनी दिली. ही सर्व घटना प्रकाशात आल्यानंतर ज्या मुस्लीम व्यक्तीला ही किडनी देण्यात आली होती तो, आता माझ्या जातीबांधवांना मला हिंदूंची किडनी आहे हे माहीत होईल, असे म्हणतो म्हणजे अतीच झाले! हिंदू महिलेने केलेल्या उपकाराची फेड कशाप्रकारे केली गेली, हे या घटनेवरून दिसून येते.

‘बॅस्टिल डे’ परेड : भारतीय हवाई दल तुकडीचे नेतृत्व महिलेकडे!

फ्रान्समध्ये दि. १४ जुलै रोजी आयोजित करण्यात येणार्‍या ’बॅस्टिल डे’ परेडमध्ये भारतीय हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी या करणार आहेत. स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी या हेलिकॉप्टर पायलट असून त्या ‘एम १७’ प्रकारचे हेलिकॉप्टर चालवतात. या परेडमध्ये भारतीय भूदल, नौदल यांच्याही तुकड्या सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतीय सेना दलाच्या तिन्ही तुकड्या दि. ६ जुलै रोजी फ्रान्सला रवाना झाल्या. या परेडमध्ये भारतीय हवाई दलाची तीन ‘राफेल’ विमानेही भाग घेणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या ६८ सदस्यीय तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी या करणार आहेत, तर भूदल तुकडीचे नेतृत्व कॅप्टन अमन जगताप आणि नौदल तुकडीचे नेतृत्व कमोडर व्रत बघेल करणार आहेत. भारत आणि फ्रान्स या दोन देशांतील धोरणात्मक भागीदारीची २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सेना दलाच्या तुकड्या त्या परेडमध्ये सहभागी होत आहेत. १८८० सालापासून दरवर्षी दि. १४ जुलै रोजी पॅरिसमध्ये ’बॅस्टिल डे’ परेडचे आयोजन करण्यात येते. हा कार्यक्रम फ्रान्समध्ये अत्यंत लोकप्रिय असून, त्याचे दूरचित्रवाणीवरून थेट प्रक्षेपण करण्यात येते. दि. १४ जुलै १७८९ या दिवशी बॅस्टिलच्या कारागृहावर चढाई करण्यात आली होती. या घटनेत फ्रेंच राज्यक्रांतीची मुळे रूजली होती.

९८६९०२०७३२


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.