ऋतुमानानुसार आहारातील बदल हे अपरिहार्य. तेव्हा, सध्या पावसाळा सुरु झाल्यामुळे दैनंदिन आहारात काही घटकांचा समावेश आणि काही पदार्थ वर्ज्य करणे हे क्रमप्राप्तच. तेव्हा, आजच्या लेखातून पावसाळ्यातील आहार आणि जीवनशैली याविषयी माहिती करुन घेऊया...
पावसाळ्यात वातावरणात आमूलाग्र बदल होतात. सर्वांत प्रथम उन्हाळा कमी होतो, घाम येणे, तापणे कमी होते. पावसाबरोबर झाडे-पाने धुवून निघतात, रस्ते धुवून निघतात. वातावरणात गारवा व एकप्रकारचा तजेला येतो. याचा परिणाम शरीरावर होतो. जिथे गारवा, वारा वाढतो तिथे वाताची गती व जोर वाढतो. याचा परिणाम म्हणून शरीरात विविध वाताची लक्षणे उत्पन्न होतात. जसे पोट फुगणे, पोट डब्ब होेणे, अंग मोडून येणे, आंबणे, सांधे जखडणे, भूक कमी लागणे, कधी मंदावते व काहीसा आळशीपणा जाणवतो.
पावसाळ्यात चांगले पाणी व सांडपाणी एकत्र होण्याची शक्यता खूप अधिक असते व असे दूषित पाणी पिण्यात ही येऊ शकते व साचलेल्या पाण्यातून जाताना त्वचेशीदेखील त्याचा स्पर्श, संपर्क होऊ शकतो. बाह्य स्पर्शामुळे विविध प्रकारचे त्वचा विकार वाढतात. विविध प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग बळावतात आणि स्रावी प्रकारचे त्वक्र्ोग वाढतात. असे दूषित-गढूळ पाण्याचे सेवन जर केले, तर पोटाच्या तक्रारीदेखील सुरु होतात. उलट्या-जुलाब, आव इ. त्रासाने मनुष्य त्रस्त होतो. पावसाळ्यात भूक ही स्वाभाविकत: मंदावते. पाणी ओतल्याने जसा अग्नी विझतो किंवा सोसाट्याच्या वार्याने जसा दिवा विझतो, त्याचप्रमाणे आपला जठराग्नी, पाचकाग्नी पावसाळ्यात मंदावतो. यासाठी पचनशक्ती वर अधिक भार पडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. खूप तळलेले पदार्थ (भजी, वडे इ.) जरी तेलावर तरंगत असतील तरी ते पचायला हलके नाहीत, पण जडच आहेत. खूप मांसाहार, खूप पनीर-चीझ, मैदा (ब्रेड)चे पदार्थ ही पावसाळ्यात खाऊ नयेत, टाळावेत.
पावसाळ्यात तापमान कमी होते. तसेच कफाच्या ही तक्रारी सुरू होतात. वारंवार पावसात भिजणे, पावसात भिजून बराच काळ ओले राहणे, ओले-दमट कपडे परिधान करणे इ.ने शरीरातील दूषित कफ वाढतो. परिणामी, सर्दी-पडसं-खोकला दम लागणे, फ्लू इ. त्रास उद्भवतात. असे लक्षात येईल की, त्रासांची ‘ठरपसश’ पावसाळ्यात खूप जास्त आहे. याचे अजून एक कारण जे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे, ते म्हणजे आपली प्रतिकार क्षमता स्वाभाविकत: आपली प्रत्येकाची प्रतिकार क्षमता कमी असते (थंडी व उन्हाळ्याच्या तुलनेने) यामुळे ‘लहरपलश खपषशलींळेप’ जे डुग धरून बसलेले असतात, त्यांचा शरीरावर अधिक परिणाम होताना दिसतो. जसे दारं-खिडक्या सायंकाळी उघडी ठेवली की डास व विविध कीटक घरात अधिक प्रवेश करतात, तसेच शरीर कमकुवत आहे हे बघून विविध त्रास शरीरावर हल्ला करतात. म्हणून पावसाळ्यात ज्यांना निरोगी राहायचे आहे, त्यांनी अधिक सतर्क राहून काळजी घ्यावी.
सर्वप्रथम बाहेरचे, उघड्यावरचे खाद्यपदार्थ टाळावे. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये नेहमी ताजेच अन्न मिळते, असे नाही. तेव्हा शिळं अन्न टाळण्यासाठी हॉटेलिंगचे प्रमाण कमी करावे. बाहेरून आल्यावर गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी व अंग कोरडे ठेवावे. ओले-दमट कपडे घालणे टाळावे. ज्यांना कफाची प्रवृत्ती आहे, त्यांनी फलाहार विशेषत: सकाळी १० वाजण्याच्या आधी आणि सायंकाळी ५ नंतर करू नये. जेवण झाल्यावर फलाहार टाळावा. छोट्या भुकेला (११ वाजता किंवा ५ वाजता) भूक असल्यास एखादे फळ (अख्खे किंवा ४ वाजता) भूक असल्यास एखादे फळ (अख्खे किंवा काप करून) खावेत. त्याला चाट मसाला लावू नये. फ्रुटी प्लेटस म्हणून विविध फळे एका वेळेस खाऊ नयेत. तसेच, एका वेळेस एकच फळ खावे व ते (खोलीचे तापमान)chance Infection' चे असावे फ्रीजमधले थंड फळ खाऊ नये. सीताफळ, केळ, चिंकू आणि पेरू याने कफाची अतिरेक वृद्धी शरीरात होते. त्यामुळे कफाचा ज्यांना त्रास होतो, त्यांनी ही फळे खाऊ नयेत, टाळावीत. पोटाच्या विविध तक्रारीसाठी ताजे व गरम जेवण जेवणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. पचनशक्ती मंदावली असली, तर भाजके अन्न अधिक खाण्यास सुरू करावे. जसे तांदूळ, जो भातासाठी वापरतो, तो भाजून मग पातेल्यामध्ये त्यात भात करावा, भाजणीचे थालीपीठ खावे. सरबते व थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी आणि सूप घ्यावीत. याने पोटाला आराम पडतो.
खाण्यातून पचायला जड असे पदार्थ टाळावेत. जसे साबुदाणा, रताळी, बटाटे, मैद्याचे पदार्थ, मिष्टान्न, चीज इ. उपवास केले तरी राजगिरा, शिंगाडा इ. चा वापर करावा. साबुदाणा, शेंगदाणे, दही टाळावे. वरील सांगितल्याप्रमाणे फळाचे नियम ही पाळावेत, कफ वाढू नये म्हणून गरम. तिखट-स्पायसी खाऊ नये. त्याने कफ कमी होईल, असे नाही, पण पित्ताचा उद्रेक मात्र नक्की होईल. म्हणून ’अति सर्वत्र वर्ज्ययेत’ हे ध्यानात ठेवावे. आल्याचा चहा, खमंग -चमचमीत जेवण अति होऊ देऊ नये. पचनशक्ती जर मंदावली असली, तर पाणीदेखील तापवून, आतून गरम प्यावे. थर्मसमध्ये भरून ठेवल्यास दिवसभर पाणी गरम राहू शकते. पण, पाणी गरम केल्यावर फ्रीजमध्ये ठेवून, गार करून पिऊ नये हे पचायला जड होते. तसेच एकदा गरम केले व थंड झालेले पाणी पुन्हा तापवू नये. त्यात गुणधर्म बदलतात.
पावसाळ्यात माती चिखलमय होते. अशा वेळेस विविध पावसाळी रानभाज्या उगवतात. या भाज्या बहुतांशी वेळेस कडू व तुरट असतात. या भाज्या केवळ पावसाळ्यात उपलब्ध होतात व त्या पोटासाठी चांगल्या असतात. त्यांचा आहारात नक्की समावेश करावा. पण, नेहमीच्या पालेभाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत. त्या टाळाव्यात. कडधान्यदेखील कमी प्रमाणात खाव्यात. मूग-मटकी पचायला खूप जड नसतात. त्यांचा वापर आठवड्यातून एक-दोन वेळेस चालेल. पण, छोले-वाटाणा-चवळी ही कडधान्य टाळावीत. ती वातूळही आहेत आणि पचायलाही त्रास होतो.
ज्यांची पचनशक्ती नाजूक आहे, त्यांनी रोजच्या आहारात काही बदल करावेत. जसे दिवसातून एकदा (दुपारच्या जेवणानंतर किंवा सायंकाळी) पाव चमचा ते एक चमचा ओवा चघळून खावा. पोटाच्या बारीकसारीक तक्रारी याने कमी होतील. भूक मंदावली असल्यास आल्याचा रस व लिंबाचा रस घ्यावा. खोकला असल्यास आल्याचा रस मधातून किंवा हळद मधातून चाटावी. पोट फुगणे, गुब्बारा धरणे असे होत असल्यास दोन लसणीच्या पाकळ्या तेलात तळून खाव्यात. वार्यावर जाताना कानात कापूस घालावा. रात्री झोपते वेळी तळव्यांना व पोट्यांना तेल चोळावे. ओवा, आलं-लसूण, जिरं हे अन्न पचायला मदत करतात. तेव्हा, आहारातून याचा समावेश करावा, विशेषतः पावसाळ्यात.
असे बदल केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती खूप मंदावत नाही व विविध तक्रारी ज्या उद्भवतात, त्यांची तीव्रता आटोक्यात ठेवण्यास मदत होते. औषधोपचार तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावे. बस्ती, अभ्यंग इ. पंचकर्म करण्यासाठी पावसाळा हा ऋतू अधिक उत्तम. तज्ज्ञ वैद्यांना विचारून त्यासाठी ते करून घ्यावे.
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९