पुण्यातील दर्शना पवारचे हत्या प्रकरण असो किंवा सदाशिव पेठेत विद्यार्थिनीवर झालेला जीवघेणा कोयत्याचा हल्ला, यामुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यानिमित्ताने पुण्यात विशेषकरुन बाहेरच्या गावाशहरांतून शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेल्या तरुणींनी घ्यावयाची खबरदारी आणि पोलिसांची महिला सुरक्षेची जबाबदारी यांचा आढावा घेणारा हा लेख...
आठवडाभरात दोन घटनांनी पुणे आणि पर्यायाने महाराष्ट्र हादरला. दर्शना पवारचा तिच्या मित्राने राजगडाच्या पायथ्याशी केलेला खून आणि पुणे शहराच्या मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने झालेला प्राणघातक हल्ला. सुदैवाने काही धाडसी तरुणांनी हल्लेखोराला पकडले आणि तरुणीचे प्राण वाचले. दुर्दैवाने दर्शनाचा मात्र प्राण गेला. या दोन्ही घटनांमधील साम्य म्हणजे दोन्ही मुलींवर झालेला हल्ला त्यांच्या मित्रांनीच केलेला होता. दर्शना राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करीत वनाधिकारी बनली होती, तर दुसरी तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेते आहे. पुण्यामध्ये यापूर्वी गुन्हेगारी टोळ्यांमधील आपसातील भांडणातून भरवस्तीत झालेले खून पुणेकरांनी पाहिलेले आहेत. परंतु, पहिल्यांदाच एखाद्या विद्यार्थिनीवर झालेला प्राणघातक हल्ला बघण्यात आला. मुळात पुणे हे विद्येचे माहेरघर. ‘भारताचे ऑक्सफर्ड’ म्हणूनही ते ओळखले जाते. त्यामुळे बाहेरून शिकायला येणार्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. गावातील अनेक जुन्या वाड्यांचे रूपांतर नवीन होस्टेलमध्ये करण्यात आलेले आहे. या ठिकाणी क्लासेसची संख्यादेखील भरपूर आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी तसेच क्लासेससाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
मुळात हे सारे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले आहेत. पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्याने ते बुजलेले असतात. त्यांच्या मनावर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करायचा तणाव असतो. हॉस्टेलवर राहत असल्यामुळे ‘होमसिकनेस’ आलेला असतो. अशावेळी एकटेपणाच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी मित्र किंवा मैत्रिणीकडे आपोआपच ओढा वाढतो. आपण कितीही म्हणत असलो, तरीही आपण अजून लिंगभेदामधून बाहेर आलेलो नाहीत. त्यामुळे आपल्याला धड ‘जेंडरलेस’ होता येत नाही की, निखालस मैत्री होताना दिसत नाही. या मुलांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होते आणि प्रेमाचे रूपांतर ‘पझेसिव्हनेस’मध्ये होते. यातून वाद होतात आणि प्रकरणे हिंसक होताना दिसतात. हे टाळण्यासाठी संवाद असावायला हवा. तो पालकांशी शिक्षकांशी किंवा मित्रांशी सातत्याने चालणारा हवा. परंतु, संवादासाठी आवश्यक असतो, तो एकमेकांवरील विश्वास तो कुठेतरी कमी पडतो व प्रेमाची, मैत्रीची भावना द्वेषात रूपांतरित होते. खरंतर या व्यावसायिकपणाने चालविल्या जाणार्या क्लासेसमध्ये एखादी समुपदेशकाची जागादेखील असायला हवी. समुपदेशनाच्या माध्यमातून या क्लासेसमधील विद्यार्थ्यांना मानसिक धीर देता येईल. त्यांच्या मनावर आलेले दडपण कमी करता येईल. चाहूल लागलेल्या संकटाविषयी मार्गदर्शन करता येऊ शकते. पालक लांबच्या गावी असतात. आई-वडील काळजीत पडतील, आपल्याला परत बोलावतील या भीतीपोटी मुले अजिबात त्यांना कळवत नाहीत. या लहान वाटणार्या गोष्टींचेच पर्यावसन मोठ्या हिंसेत झालेले आपल्याला पाहायला मिळते.
कायद्याचे ज्ञान
आपण जी गोष्ट करतोय ती कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे काय? त्याला किती शिक्षा आहे? याची कल्पना मुलांना नसते. तसेच भविष्यात आपल्याला होणारा त्रास कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. त्याविषयी तक्रार देता येईल. हे मुलींना माहिती नसते. पोलीस चौकी किंवा पोलीस ठाण्यात बिनधास्त तक्रार दिली पाहिजे. त्यामुळे समोरच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. दुर्दैवाने एखाद्या चौकीत किंवा पोलीस ठाण्यात संवेदनाहीन पोलिसासोबत एखाद्याचा संबंध येतो आणि त्यामुळे नकारात्मक प्रतिमा तयार होते. त्यामुळे पोलिसांविषयी निष्कारण गैरसमज पसरतात. त्यामुळे लोक तेथे तक्रार देण्यास धजत नाहीत. त्यामुळे पोलिसांसमोरही विश्वासार्हता जपण्याचे आणि लोकांना दिलासा देण्याचे आव्हान आहे.
पोलिसिंग
पूर्वी पोलिसांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा दबदबा असे. पोलीस प्रत्यक्ष चौकीत उपस्थित नसले, तरी त्यांची भीती असायची. आता ‘पोलिसिंग’ म्हणजे पोलिसांनी प्रत्यक्ष दिशेनेच होय. त्यांचे अस्तित्व जाणवत राहिले, तरच लोकांवर धाक राहतो. पूर्वीच्या काळी कायद्याच्या चौकटीत राहून गुंड, समाजकंटक यांचा जाहीर कार्यक्रम पोलिसांकडून होत असे. आता तसे करताना कोणी पोलीस दिसत नाहीत. अर्थातच मानवी हक्क संघटना, माध्यमांमध्ये होणारी वाईट प्रसिद्धी याला घाबरून पोलीस तसे धारिष्ट दाखवत नाहीत. परंतु, कायद्याचा सन्मान राखून लोकांमध्ये जरब बसेल, अशी वागणूक समाजकंटकांना गुन्हेगारांना पोलिसांनी द्यायला हवी. पोलिसांचा उद्देश शुद्ध असेल, तर वरिष्ठांनीसुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. तसेच, माध्यमांनीदेखील त्यांना साथ द्यायला पाहिजे. अनेक राजकीय पक्ष अशा प्रकारच्या गुन्हेगारांना सोडवण्यासाठी मदत करतात. पोलिसांवर विविध प्रकारे दबाव आणतात. त्याचे पर्यावसन गुन्हेगारांची गुन्हेगारी वृत्ती वाढण्यात होतो. राजकारण्यांनी हा मोह टाळावयास हवा.
लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या खूप कमी पडते आहे. त्यामुळे पोलिसांची गस्त, पोलीस चौक्यांमधील पोलिसांची उपस्थिती, याबद्दलची स्थिती शोचनीय आहे. रस्त्यावर उतरून पायी गस्त घालणे, शाळा-महाविद्यालये तसेच क्लासेस आणि मोक्याच्या जागांवर विनाकारण घुटमळणारी टाळकी, विनाकारण फिरणारे समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती, मुले यांना वेळीच तेथून हाकलले पाहिजे. वेळप्रसंगी कायद्याचा दंडुका दाखवायला हवा. तेव्हाच त्यांना आपल्यावर पोलिसांचे लक्ष आहे, याची जाणीव होत राहील. कोणत्यातरी भाईचा वाढदिवस असतो. परिसरात ओरडत फिरणारे, एकसारखा हॉर्न वाजवत मोकाट समूहाने फिरणारे, मोटारसायकलस्वार यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशा गोष्टींना जर वेळेस पाय बंद घातला गेला, तर पोलिसांचा दरारा निर्माण होऊन पुढे होणारा अनर्थ टाळता येईल.
जवळपास ९५ ते ९८ टक्के पुणेकरांची मानसिकता ही कायद्याला मान देणार्या शांतताप्रिय नागरिकांची आहे. परंतु, अशा प्रकारांमुळे ते धास्तावतात. त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. पोलिसांनी पोलिसांचेच काम करायला लावले पाहिजे. वरिष्ठांनी सारख्या बैठका घेणे, एनजीओबद्दल कार्यक्रम करायला लावणे, यामुळे त्यांना ‘पोलिसिंग’ करायला वेळ मिळत नाही. पोलिसांनी लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने काम करायला पाहिजे. जनतेत किती मिसळावे याचे भानही ठेवले जाणे आवश्यक आहे, अन्यथा अतिपरिचयात अवज्ञा असा प्रकार घडतो. पोलिसांचा आदरयुक्त दरारा निर्माण होण्याची आवश्यकता आहे, नाहीतर पोलिसांचा खरोखरीच ‘मामा’ होण्यास वेळ लागणार नाही. पुण्यात घडलेला प्रकार वाईटच आहे. परंतु, परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. मुला-मुलींशी संवाद साधणे आवश्यक आहे. आपल्यावर होणार्या अन्यायाची माहिती पालक, शिक्षक, मित्र, पोलीस यांना देण्याबाबतचा विश्वासही निर्माण करावा लागेल.
राजेंद्र भामरे
(लेखक साहाय्यक पोलीस आयुक्त (निवृत्त) आहेत.)