अमरनाथ यात्रा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

सुरक्षेसह तयारीचा घेतला आढावा

    09-Jun-2023
Total Views |
Union Home Minister Amit Shah

नवी दिल्ली
: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ६२ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या तयारीबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सुरक्षाव्यवस्थेचा अतिशय बारकाईने आढावा घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या या बैठकीस जम्मू – काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका, नॉर्दन कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) उपेंद्र द्विवेदी आणि सीआरपीएफचे महासंचालक एस. एल. थाओसेन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

श्रीनगरमध्ये जी २० पर्यटन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे यशस्वी आयोजन केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने आगामी अमरनाथ यात्रेच्या व्यवस्थेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यात्रा सुरळीत व्हावी, यासाठी प्रशासनासह भारतीय सैन्य, पोलिस आणि सीआरपीएफदेखील सज्ज झाले आहेत. या तीर्थयात्रेत व्यत्यय आणण्यासाठी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून संभाव्य प्रयत्नांची माहिती गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झाली असून त्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगण्यात आले आहे.

दक्षिण काश्मीरच्या हिमालय पर्वतरांगांमध्ये ३ हजार ८८० मीटर मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ या पवित्र तीर्थक्षेत्राची वार्षिक यात्रा १ जुलैपासून सुरू होणार असून ती ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या यात्रेदरम्यान दहशतवादी संघटनांसह फुटीरतावाद्यांच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.