कलासागरातील मुक्त प्रवासी...

    09-Jun-2023   
Total Views |
Article On Painter Sagar Vishnu Handore

चित्रं तर लहान मुलेही काढतात, त्यात काय विशेष? अशा गोष्टी बोलल्या गेल्या. परंतु, तरीही त्याने माघार घेतली नाही. जाणून घेऊया चित्रकार सागर विष्णू हांडोरे याच्याविषयी...

सागर विष्णू हांडोरे याचा जन्म नाशिकमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील शेतकरी आणि शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन. शांत स्वभावाच्या सागरचे दहावीपर्यंतचे शिक्षण देवळाली हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. शाळेत चित्रकलेचा तास असताना तो मन लावून चित्रकलेचे धडे घेत होता. त्याला त्यावेळी चित्रकला शिक्षक शेख सरांचेही मार्गदर्शन मिळत असे. पुढे सागर ‘एलिमेन्ट्री’ परीक्षा उत्तीर्ण झाला आणि नंतर ‘इंटरमिजिएट’ परीक्षाही तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. चित्रकलेची तशी आवड नसली तरीही चित्रे काढायला सागरला आवडत असे. त्यामुळे तो एक छंद म्हणून वेळ मिळेल तसा चित्रे काढत होता.
चित्रकलेला त्यावेळी तसे फारसे महत्त्व नव्हते. त्यामुळे चित्रकला क्षेत्रात जाण्याचा सागरचा विचारही नव्हता. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने एसव्हीकेटी महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला. इयत्ता बारावीनंतर सागरने पुढील शिक्षणाऐवजी ‘आयटीआय’ला ‘फिटर’साठी प्रवेश घेतला. या दोन वर्षांत चित्रकलेकडे सागरचे दुर्लक्ष झाले. पुढे कंपनीत नोकरी लागल्यामुळे शिफ्टची सवय नसल्याने त्याला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती.

कलेची आवड जोपासण्यासाठी त्याने नाशिकमधील कला महाविद्यालयांमध्ये जाऊन विचारपूस करण्यास सुरुवात केली. मित्रपरिवारानेही सागरला चित्रकलेचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. परंतु, बहिणीचे लग्न आणि त्यातही कॉलेजची फी भरणे शक्य नसल्याने त्याला प्रवेश घेता आला नाही. तेव्हा त्याने ‘डेन केबल नेटवर्क’मध्ये नोकरी केली. जवळपास चार वर्षं याठिकाणी नोकरी करून त्याने बर्‍यापैकी पैशांची बचत झाली. कुटुंबीयांनी संपूर्ण निर्णय सागरवर सोपवला. अखेर द्विधा मनस्थिती असलेल्या सागरने २०१६ साली के. के. वाघ फाईन आर्ट्स महाविद्यालयात ‘बीएफए’करिता प्रवेश घेतला. चार वर्षांच्या या अभ्यासक्रमात जुन्या-जाणत्या चित्रकारांचे त्याला मार्गदर्शन मिळाले. त्यातून कलेचा विकास कसा करावा, याची माहिती मिळाली. पूर्वी केवळ मुंबई आणि पुण्यापर्यंत मर्यादित असलेली वॉल पेंटिंगची क्रेझ हळूहळू नाशिकला आली. त्यामुळे सागरने चित्रकलेची कामे करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरही त्याने आपले लक्ष केंद्रित केले आणि त्याचा फायदा त्याला त्याच्या कामात झाला. सुरुवातीला छोटे पेन्सिल स्केच, पेटिंग आणि वॉल पेटिंगमध्ये सागरने चांगलाच जम बसवला.

चार वर्षांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्याने पुढे मराठवाडा विद्यापीठात ‘एमएफए’साठी प्रवेश घेतला. यादरम्यान कोरोना काळ असल्याने बराच कालावधी ऑनलाईन शिक्षणातच केला. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे सगळं काही ठप्प असल्याने त्याला स्वतःसाठी आणि विशेषतः चित्रकलेसाठी पुरेसा वेळ मिळाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागरला एका नामांकित शाळेत कला शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. सध्या तो विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देण्याबरोबरच स्वतः देखील चित्रकलेतील नवनवीन गोष्टी आत्मसात करत आहे. सागरचा ‘कम्पोझिशन’मध्ये चांगला हातखंडा असून यात तो पौराणिक अथवा भारतीय संस्कृतीवर आधारित एखादा प्रसंग अतिशय सहजरित्या रेखाटतो. थ्री-फिगर- सीता-राम-लक्ष्मण, अभिमन्यू - नवरस (वीररस), फ्रीडम - कालियामर्दन, भारतीय संस्कृती अशा त्याने रेखाटलेल्या अनेक कलाकृती अक्षरशः थक्क करून सोडतात. एका छायाचित्रातून जसे एक हजार शब्द सांगितले जाऊ शकतात, तसे या प्रकारच्या चित्रांतून संपूर्ण कथा किंवा गोष्ट मांडता येते.

सागर मंदिरांमध्ये देवी-देवतांची चित्रे काढण्यासह मूर्तींना रंगरंगोटीदेखील करतो. ओडिशा आणि हरियाणामध्येदेखील त्याने आपल्या चित्रकलेची जादू दाखवली आहे. चित्रकलेला आजही म्हणावे तितके महत्त्व दिले जात नाही. या कलेकडे आजही दुर्लक्ष केले जाते. परंतु, समाजाने चित्रकलेला प्रोत्साहन द्यायला हवे. मला पैशांची कोणतीही अपेक्षा नसते. परंतु, त्यांनी कौतुक केले हीदेखील माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असते. प्रवास केल्याने अनेक गोष्टी चित्रकलेत उतरवता येतात. निरीक्षण शक्ती त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे भरपूर प्रवास करण्याची इच्छा असल्याचे सागर सांगतो. कला वाढवली पाहिजे आणि कलेतून लोकांना संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे. चित्रकलेतून मला आनंद मिळतो आणि बर्‍यापैकी त्यातून अर्थार्जनही होते. कलेने उदरनिर्वाह करता येऊ शकतो. सहनशीलता, संयम आणि सराव चित्रकलेसाठी महत्त्वाचा असल्याचे तो सांगतो.

चित्रकलेऐवजी दुसरं काही करण्याचे सल्ले मिळाले. चित्र तर लहान मुलेही काढतात, त्यात काय विशेष? अशा गोष्टी बोलल्या गेल्या, तरीही सागरने माघार घेतली नाही. त्याने आपला आनंद खर्‍याअर्थाने शोधला आणि तो जगलासुद्धा! सचिन जाधव, बाळ नगरकर, शेख सर, गौतम सर, गोकुळ सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला मिळाले. पत्नी फॅशन डिझायनर असल्याने त्यांचेही सागरला सहकार्य मिळते. चित्रकार राजा रवी वर्मा यांची चित्रे सागरला विशेष आवडते.

भविष्यात एक स्टुडिओ उभारण्याचे त्याचे स्वप्न असून त्यात नाशिककरांना जास्तीत जास्त कलाविषयक गोष्टी दाखविण्याचा त्याचा मानस आहे. चित्रकलेच्या सागरात मुक्त विहार करणार्‍या सागर हांडोरे या अवलियाला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा

७०५८५८९७६७

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.