‘अजमेर ९२’ चित्रपटाच्या प्रसारणापूर्वीच अजमेर दर्ग्यास झोंबल्या मिरच्या; प्रथम दर्गा समितीस चित्रपट दाखविण्याचा फतवा

    09-Jun-2023
Total Views | 276
Ajmer Sharif Dargah Committee On Ajmer 92

नवी दिल्ली
: नव्वदच्या दशकात देशातील सर्वांत भीषण बलात्कार कांडास मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या आणि अजमेर शरिफ दर्ग्याशी संबंधित लोकांचा बुरखा फाडणारा 'अजमेर ९२' हा चित्रपट प्रथम आम्हाला दाखवा, असा फतवा अजमेर शरिफ दर्गा समितीने काढला आहे. जमेर शरीफ दर्गा समितीचे म्हणणे आहे की, या चित्रपटातून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जर चित्रपटाने अजमेर शरीफ दर्गा आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला तर ते चित्रपटाच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करतील. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दर्गा समितीला दाखवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

इंडिया मुस्लिम फाउंडेशनचे प्रमुख शोएब जमाई यांनीही या चित्रपटाबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सय्यद गुलाम किबरिया आणि अजमेर दर्गा कमिटीचे सरचिटणीस सरवर चिश्ती यांच्यासह खादिम समितीच्या बैठकीनंतर 'अजमेर ९२' या चित्रपटाविषयी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. 'अजमेर ९२' हा चित्रपट एका गुन्हेगारी घटनेपुरता मर्यादित असल्यास आम्हाला कोणतीही समस्या नाही. मात्र, जर याद्वारे जाणीवपूर्वक षडयंत्र आखून अजमेर शरीफ दर्गा आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला तर चित्रपट निर्मात्यांवर कारवाई केली जाईल. त्याचवेळी देशात शांततापूर्ण आंदोलन केले जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

चित्रपटाविरोधात कट्टरतावादी मुस्लिम संघटना मुंबईच्या रझा अकादमी आणि जमियत उलामा हिंदनंतर खादिमांच्या संघटनेचे सचिव सय्यद सरवर चिश्ती यांनीही चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे काही मुस्लिम संघटनांनी हा चित्रपट ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच जाणीवपूर्वक बनविण्यात आल्याचा कांगावा केला आहे.

असे होते लैंगिक शोषणाचे प्रकरण

नव्वदच्या दशकात अजमेर शहरात घडलेल्या या बलात्कार कांडाने देशभरात खळबळ माजली होती. अजमेरमध्ये प्रभावशाली कुटुंबातील लोकांनी १०० हून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले. यातील अनेक मुलींवर सामूहिक बलात्कारही झाला होता. मुलींवर त्यांच्या मैत्रिणींना सोबत आणण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. तसे न केल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अश्लील छायाचित्रे दाखवण्याची धमकी देण्यात आली. अशाप्रकारे आरोपींनी एकामागून एक १०० हून अधिक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले होते.

वृत्तपत्रात खुलासा झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि तपास सुरू झाला. यादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. ही छायाचित्रे ज्या फोटोलॅबमध्ये धुतली जात असत, तेथील कर्मचाऱ्यांनीदेखील त्या मुलींना धमकावून त्यांच्यावर बलात्कार केले होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर अनेक मुलींनी आत्महत्या केल्या होत्या. या प्रकरणाचा एवढा भयानक परिणाम झाला होता की, त्या काळात अजमेर शहरातील मुलींशी लग्न करायलाही कोणी तयार होत नसे.

चिश्ती घराणे आणि काँग्रेस कनेक्शन

अजमेरच्या प्रसिद्ध चिश्ती घराण्यातील सदस्यांचाही या कांडामध्ये सहभाग होता. पोलिसांनी नफीस चिश्ती, फारुख चिश्ती आणि अन्वर चिश्ती यांच्यासह अन्य लोकांना आरोपी केले होते. फारुख चिश्ती हा त्यावेळी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता. यातील आठ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घोटाळ्यातील अनेक आरोपी अद्याप फरार असून, त्यांना आजतागायत पकडता आलेले नाही.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121