नवी दिल्ली : अलीकडेच इराणमधील महिला आंदोलनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. दरम्यान एका मौलानाने तर दावा केला आहे की, देशातील ७५,००० मशिदींपैकी ५०,००० मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. नुकतेच इराणमध्ये हिजाब आणि बुरख्याविरोधात लाखो महिला रस्त्यावर उतरल्या. आता मौलाना मोहम्मद अबोलगसीम दौलबी यांनी देशातील मशिदी बंद करण्यावर चिंता व्यक्त केली आहे. इराण हा इस्लामिक देश असताना हे सर्व घडत आहे.
ज्या मौलानाने ही माहिती दिली आहे ते इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे सरकार आणि देशातील मौलाना यांच्यात समन्वय साधण्याचे काम करतात. त्यांनी दि. ८ जुलै २०२३ रोजी सांगितले की , नमाज पठण करणाऱ्या उपासकांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे हे चिंताजनक आहे. त्यामुळे नमाज अदा करणाऱ्या आणि मशिदीचे सदस्यत्व घेणाऱ्यांची संख्या कमी होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
दौलबी हे तज्ज्ञांच्या समितीचे सदस्यही आहेत. ही समिती इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करते. ते म्हणाले की, इराणी समाजात धर्माबद्दलची आस्था कमी झाल्यामुळे मशिदी बंद केल्या जात आहेत. धार्मिक शिकवणींबद्दलच्या मिथकांचा प्रसार तसेच धर्माच्या नावाखाली लोकांना समृद्धीपासून वंचित करून गरीब बनवण्याला त्यांनी कारणीभूत ठरविले. धर्माच्या नावावरही लोकांचा अपमान केला जात असल्याचे ते म्हणाले.
तसेच इराणची राजवट क्रूर आहे आणि त्याच्या हुकूमशाहीचा आधार इस्लाम आहे, अशी भावना मोठ्या संख्येने लोकांमध्ये निर्माण झाली आहे. सप्टेंबर २०२२ नंतर झालेल्या देशव्यापी आंदोलनांचाही तोच परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणमधील सुमारे ६०% मशिदी बंद करण्यात आल्या आहेत कारण उपासक येत नाहीत.त्यामुळे जेव्हा एखाद्या धर्माच्या परिणामांची चर्चा केली जाते तेव्हा लोक त्या आधारावर धर्म सोडण्याचा किंवा सामील होण्याचा निर्णय घेतात.