मुस्लीम लीग आणि काँग्रेसची गोंधळलेली भूमिका

    06-Jun-2023   
Total Views |
Muslim League And Congress

जिना यांची मुस्लीम लीग वेगळी होती आणि आताची वेगळी असल्याचे सांगून राहुल गांधी यांच्यासारखे नेते मुस्लीम लीगला सेक्युलर असल्याचे प्रमाणपत्र बहाल करतात, हे दुर्दैवाचे म्हणावे लागेल. पक्षीय स्वार्थासाठी एखाद्या नेत्याने किती खालची पातळी गाठावी, हे या उदाहरणावरून दिसून येते.

मुस्लीम लीगबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या अमेरिका दौर्‍यात अचानक साक्षात्कार झाला आणि तो पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, असे धडधडीत धादांत खोटे विधान त्यांनी केले. मुस्लीम लीग धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रमाणपत्र राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन येथे तेथील ‘नॅशनल प्रेस क्लब’च्या सदस्यांपुढे बोलताना केले. ज्या मुस्लीम लीगमुळे धार्मिक आधारावर देशाची फाळणी झाली, अखंड भारत खंडित झाला, त्या मुस्लीम लीगला ‘सेक्युलर’ असे प्रमाणपत्र देताना राहुल गांधी यांची जीभ कचरली कशी नाही? किमान आपले पणजोबा आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुस्लीम लीगबद्दल काय म्हटले होते ते तरी आपले ‘मोहब्बत की दुकान’ चालवताना लक्षात घ्यायचे.

राहुल गांधी यांना देशामध्ये असताना अशी विधाने कधी सुचत नाहीत. विदेश दौर्‍यावर गेले की, त्यांना अशा गोष्टी स्मरतात, किंबहुना अगदी ठरवूनच ते असे वक्तव्य करीत असतात, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. मुस्लीम लीग हा पक्ष कमालीचा जातीयवादी, अन्य धर्मीयांचा द्वेष करणारा असल्याचे सर्वविदित असताना ‘मोहब्बत की दुकान’ उघडून बसलेल्या राहुल गांधी यांना तो सेक्युलरच वाटणार. पण, मुस्लीम लीगबद्दल १९५८ मध्ये पंडित नेहरू काय म्हणाले होते, हे राहुल गांधी यांना कोणी सांगितले नसावे. “आपल्या केरळ दौर्‍यामध्ये, फाळणीच्या वेळच्या दुःखद आणि वेदनादायक प्रसंगांच्या शिवाय मुस्लीम लीग अन्य कशाचे प्रतिनिधित्व करीत आहे, हे मला माहीत नाही. केरळवगळता देशामध्ये मुस्लीम लीगचे झेंडे अन्य कोठे दिसत नाहीत. मुस्लीम लीग हा दंगली आणि दुष्ट भावनांचा पक्ष आहे,” असे जवाहरलाल नेहरू त्यावेळी म्हणाले होते. पण, राहुल गांधी यांना ते मान्य नसल्याचे त्यांच्या अमेरिकी दौर्‍यात दिसून आले.

एका अमेरिकी पत्रकाराने, आपण धर्मनिरपेक्षतेचा पाठपुरावा करता आणि भाजपच्या हिंदुत्वाचा विरोध करता, पण केरळमध्ये काँग्रेसने मुस्लीम लीगशी युती कशी काय केली, असा प्रश्न राहुल गांधी यांना प्रश्न विचारला असता, त्यावर “मुस्लीम लीग हा पूर्णपणे सेक्युलर पक्ष आहे. मला ज्या व्यक्तीने हा प्रश्न विचारला त्याने मुस्लीम लीगचा पूर्णपणे अभ्यास केला नसावा,” असे सांगण्यासही राहुल गांधी विसरले नाहीत, तर त्या उलट फाळणीच्या वेदनादायी घटनांना नेहरू यांनी मुस्लीम लीगला जबाबदार धरले होते.

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून, जिना यांचा मुस्लीम लीग हा पक्ष धर्मनिरपेक्ष कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न विचारला आहे. धार्मिक आधारावर देशाचे विभाजन करण्यास जो पक्ष जबाबदार ठरला, त्या पक्षास अजूनही भारतातील काही महाभाग सेक्युलर समजतात, तर केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी तर, राहुल गांधी यांची बौद्धिक कुवत ही अत्यंत मर्यादित असली तरी त्यांना माफी करता कामा नये, असे म्हटले आहे. ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’ याचा अर्थ हा पक्ष केवळ मुस्लिमांसाठी असून तो हिंदू किंवा ख्रिश्चन यांच्यासाठी आधीही नव्हता आणि पुढेही असणार नाही. दहशतवादाबाबत हा पक्ष पूर्णपणे मौन बाळगून आहे. केरळ ही ‘इसिस’ची प्रयोगशाळा झाली असून त्याबद्दल हे लोक एक शब्दही बोलत नाहीत, असेही केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी म्हटले आहे.

जिना यांची मुस्लीम लीग वेगळी होती आणि आताची वेगळी असल्याचे सांगून राहुल गांधी यांच्यासारखे नेते मुस्लीम लीगला सेक्युलर असल्याचे प्रमाणपत्र बहाल करतात, हे दुर्दैवाचे म्हणावे लागेल. पक्षीय स्वार्थासाठी एखाद्या नेत्याने किती खालची पातळी गाठावी, हे या उदाहरणावरून दिसून येते.

खलिस्तानवादी शेपूट अजून वळवळतेच!

विदेशी शक्तींच्या जोरावर भारतापासून फुटून निघून स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणार्‍या खलिस्तानवाद्यांचा ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ होऊन ३९ वर्षे झाली तरी अजून पुरता बिमोड झाला नसल्याचे खलिस्तानवादी देशामध्ये किंवा विदेशामध्ये जी विविध देशविरोधी कृत्ये करीत आहेत, त्यावरून दिसून येते. दि. ६ जून, १९८४ या दिवशी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून राहिलेल्या जर्नेलसिंह भिंद्रनवाले आणि त्यांच्यासमवेतच्या दहशतवाद्यांना तेथून हुसकवून लावण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ खाली कारवाई करून पवित्र सुवर्ण मंदिर अतिरेक्यांपासून मुक्त केले. पण, अजूनही खलिस्तान चळवळीचे समर्थक पंजाबमध्ये आणि अन्यत्र सक्रिय असल्याचेच दिसून येत आहे. मध्यंतरी राजधानी दिल्लीच्या सीमांवर जे शेतकरी आंदोलन झाले, त्यामध्ये काही खलिस्तानवादी समर्थक घुसल्याची चर्चा होती. त्यानंतर अलीकडे स्वतःला प्रति भिंद्रनवाले समजणार्‍या ‘वारीस दे पंजाब’ संघटनेचा प्रमुख असलेल्या अमृतपालसिंह याने राज्यात धुडगूस घातला होता. त्याला पकडण्यामध्ये जेवढी तत्परता दाखविणे आवश्यक होती, तेवढी पंजाबमधील ‘आप’ सरकारकडून दाखविली न गेल्याने तो कित्येक दिवस पोलिसांना सापडला नव्हता.

अमृतपालसिंह याला आता राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. पंजाबमधील फुटीर तत्वांविरूद्ध कारवाई केली जात असली तरी त्या तत्वांची शेपटी अजून वळवळत असल्याचे दिसून येत आहे. ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ घटनेस ३९ वर्षे झाल्याच्या निमित्ताने अमृतसरसह पंजाबमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला तरी अनेक ठिकाणी भिंद्रनवाले यांचे समर्थन करणारी पोस्टर्स झळकविण्यात आली. राजधानी नवी दिल्ली पण त्यास अपवाद नव्हती. पूर्व दिल्लीतील एका गुरूद्वाराबाहेर ५ जून रोजी खलिस्तानवादी पोस्टर्स झळकली होती. ‘१९८४ विसरू नका’, अशा आशयाची पोस्टर्स गुरूद्वाराच्या भिंतीवर लावण्यात आली होती. तसेच त्या पोस्टर्सवर भिंद्रनवाले, भाई अमरीकसिंह यांची छायाचित्रेही छापण्यात आली होती. खलिस्तानवादी चळवळ आता इतिहासजमा झाली असली तरी काही फुटीरतावादी या चळवळीस खतपाणी घालीत आहेत. हे वळवळणारे शेपूटही चिरडून टाकण्याची आवश्यकता आहे. दिल्ली आणि पंजाब या राज्यात आम आदमी पक्षांचे सरकार आल्यानंतर खलिस्तानवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. या दोन्ही सरकारांनी त्यांच्याविरूद्ध कठोर पावले टाकण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रहितास सर्वोच्च प्राधान्य देऊन या खलिस्तानवाद्यांचे उच्चाटन करायलाच हवे.

नवीन संसद भवनातील समुद्रमंथन शिल्प!

नवीन संसद भवनाचे दि. २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या नव्या संसद भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांची जशी भव्य शिल्पे आहेत तशीच आर्य चाणक्य यांचेही शिल्प आहे. यामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे ते देव-दानव यांच्या समुद्रमंथन दृश्याचे! नव्या संसद भवनात निर्माण केलेल्या या शिल्पांचे चित्रकार आहेत नरेश कुमावत. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात मी तयार केलेली शिल्पे असल्याचा जीवनभर पुरेल इतका आनंद मला झाला आहे, असे कुमावत यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. ७५ फूट लांब आणि नऊ फूट उंचीच्या भिंतीवर समुद्रमंथनाचे हे भव्य शिल्प साकारण्यात आले आहे. सर्व स्केचेस तयार करण्यात आल्यानंतर प्रथम मातीमध्ये समुद्रमंथनाचे शिल्प साकारण्यात आले. त्यानंतर शिल्पसक्तहीचे धातुकाम करण्यात आले. या शिल्पासाठी एकूण १२ तुकडे बनविण्यात आले आणि नंतर त्यांची संसद भवनात जोडणी करण्यात आली.

या समुद्रमंथन शिल्पाचे वजन एकूण १२ टन आहे. हे शिल्प साकारण्यासाठी आपण गेले आठ महिने रात्रंदिवस काम करीत होतो. हे भव्य शिल्प प्रत्यक्ष साकारले गेल्याने आपणास कृतकृत्य वाटत असल्याचे नरेश कुमावत यांनी म्हटले आहे. कुमावत यांनी जे स्मूदर मंथनाचे भव्य शिल्प साकारले आहे, ते कंबोडियातील अंगकोर वट मंदिरात जे शिल्प कोरण्यात आले आहे त्याच्याशी मिळतेजुळते आहे. नरेश कुमावत यांच्या तीन पिढ्या मूर्तीकलेच्या व्यवसायात आहेत. त्याचा स्टुडिओ मनेसर, गुरगाव येथे आहे. माझी अनेक शिल्पे जगात आहेत. पण, माझ्या या समुद्रमंथन शिल्पापुढे ती सर्व शिल्पे लहान वाटतात. समुद्रमंथनाचे शिल्प हीच आता माझी ओळख ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. संसद भवनात जे सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे धातू शिल्प आहे, ते २० फूट उंचीचे असून त्याचे वजन सहा टन आहे. तसेच, नव्या संसद भवनात नरेश कुमावत यांनी साकारलेले आर्यचाणक्याचे शिल्पही या भवनाचे आणखी एक आकर्षण आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.