असा झाला राजांचा राज्याभिषेक सोहळा

    05-Jun-2023   
Total Views |

 
न अभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने।
विक्रमार्जित सत्त्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता॥
 
याचा अर्थ असा की जंगलाच्या राज्यावर ना अभिषेक होतो ना कोणते धार्मिक संस्कार होतात. आपल्या स्वबळावर, कर्तृत्वावर त्याला जंगलाचं राज्यपद मिळतं. पण म्हणून काही तो स्वयंघोषित राजा नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. म्हणून त्या राज्याभिषेकामुळे ते राजा झाले नाहीत. किंवा ते स्वयंघोषित राजेही झाले नाहीत. मग त्यांच्या राज्याभिषेकाची गरज खरंच होती का? तर हो! होती!
 
 
shivaji
 
संपूर्ण भारतवर्षाच्या इतिहासातील ही एक राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची घटना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला.
राज्याभिषेक ही संकल्पनाच नवी होती. त्यासाठी कोणत्याच पद्धती किंवा प्रथा लिखित स्वरूपात उपलब्ध नव्हत्या. कित्येक वर्षे मुसलमानी राजवटी आणि त्यांच्या आक्रमणातून पिचलेल्या जनतेला राजाच नव्हता. नाही म्हणायला पूर्वी संस्थाने होती, परंतु त्यांचे राज्यपद हे वारसा हक्काने चालून आलेले. नवा राजा घोषित व्हायचा, पण त्या राज्याभिषेकाला अर्थ नसायचा, राज्याच्या पोटी जन्मलेल्या किंवा राजाने दत्तक घेतलेल्या युवराजालाच राजा मानले जाई. मग हा राज्याभिषेक कसा झाला? कोणत्या संस्कारांच्या आधारे? पुराणे, धार्मिक ग्रंथ चाळले गेले. देशभरातून अभिषेकविधी करण्यासाठी ब्राह्मण भोजन बोलावले गेले.
 
सर्वांचे म्हणणे ऐकून, पुराणातील आधार घेऊन अनेक विधिपूर्वक राज्याभिषेक सोहळ्याची रचना करण्यात आली. रायगडावर लाखभर माणूस जमला. ४ महिने सर्व लोक गडावर राहू शकतील यासाठी प्रत्येकाच्या योग्यतेनुसार शामियाने, राहुट्या उभारल्या होत्या. यात देशोदेशीचे राजे, व्यापारी, इतर राज्यांतील अमीर- उमराव, ज्याजांचे विशेष प्रतिनिधी, वकील, नात्यातील माणसे असे अनेक लोक जमले होते. देवदर्शन, पूजा विधी उरकून १२ मे १६७४ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. रोज काही ना काही विधी, याग यज्ञ होतच होते. २८ मेला प्रायश्चित्त घेऊन जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली.
 
दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. त्यानंतर ६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावरछत्रपती शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले.गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
  
सिंहासन आणि अभिषेकाचे दालन विशेष सजवले होते. सिहासनाला सोनेरी पत्र्याने मढवले होते. दालनात ३२ शुभ शकुन सांगणारी चिन्हे विराजमान होती. संपूर्ण दालनाची सजावट रत्नजडित झालरींनी केली होती. सिंहासनाला एकूण ६ पायऱ्या होत्या. पाय ठेवायचे पटल सुवर्णाचे होते. अगदी प्राचीन काळापासून उच्चासनाचा हा प्रकार सर्वत्र रुढ आहे. प्राचीन आदिम जमातींत साधी लाकडी चारपायी बैठक सत्ता व अधिकार दर्शविण्यासाठी वापरली जाई. नंतरच्या काळातील अधिक प्रगत अशा संस्कृतींमध्ये अधिकारनिदर्शक उच्चासन वा बैठक ही सुबक, आकर्षक अशा निरनिराळ्या आकृतिबंधांमध्ये, विविध निर्मितिसाधने वापरुन, तसेच वैभवदर्शक अलंकरणात्मक सजावट करुन तयार केली जाऊ लागली. ज्या विधी वा समारंभांसाठी विशिष्ट उच्चासनांचे प्रयोजन असे, ती उद्दिष्टे विचारात घेऊन अशी सिंहासने वा उच्चासने तयार केली जाऊ लागली व त्यांची अलंकरणात्मक सजावटही केली जाऊ लागली.
 
भारतात प्राचीन काळापासून राजांसाठी सिंहासनांचा वापर होत असल्याचे उल्लेख आढळतात. प्राचीन काळी राज्यभिषेकप्रसंगी ‘आसंदी’ वापरत असल्याचे उल्लेख ऐतरेय , शतपथ इ. ब्राह्मणग्रंथांत आढळतात. सिंहासनाचा पूर्वावतार म्हणजे ‘आसंदी’ (मोळाच्या दोरीने विणलेली, लाकडी चार पायांची घडवंची). ती सिंहासनसदृश असावी, असे दिसते. वाल्मिकिरामायणात सिंहासनाचा उल्लेख ‘भद्रपीठ’ असाही केला आहे. वनवासानंतरच्या पट्टाभिषेकप्रसंगी वापरलेले भद्रपीठ रत्नमय होते, असा रामायणात उल्लेख आढळतो. महाराजांचे शाही सिंहासन सोन्याचे होते. त्याचे सुवर्णांकित आठ स्तंभ हिरे, माणके, पाचू, मोती आदी रत्नांनी अलंकृत होते. त्यावर सोन्याचे नक्षीदार छत्र असून त्यावरुन खाली रत्नांच्या माळा सोडल्या होत्या. मूळ बैठकीवरील व्याघ्रांबरावर मखमल आच्छादली होती. बैठकीच्या दोन्ही बाजूंस राजपददर्शक चिन्हांसोबत डावीकडे दोन कीर्तिमुखांच्या प्रतिमा कोरल्या होत्या. सिंहासनाच्या रचनाबंधात पारंपरिक हिंदू धार्मिक प्रतीके आणि मोगल वैभव यांचा सुरेख संगम झाला होता. मात्र पेशव्यांचे सिंहासन (मस्नद) साधे, उंच व भरतकाम केलेल्या हिरव्या मखमलीने आच्छादिलेल्या गादीचे होते. तीवर हिरव्या मखमलीचा अभ्रा घातलेला लोड व तशाच दोन उशा होत्या.
 
राज्याभिषेक वेळी आसमंत मंगल सुरसुमनांनी न्हाऊन निघाला होता, मंत्रोच्चर आणि सुगंधी फुलांचा परिमल दरवळत होता. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर,छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.