राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा खरा शत्रू!; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

    05-Jun-2023
Total Views |
BJP Chandrasekhar Bawankule

नागपूर
: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ओबीसी समाजाची निवडणुकीपूर्वी आठवण आली आहे, राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर ही केवळ नौंटकी असून २०२४ च्या निवडणुकीपूर्वी खोटे प्रेम उतू येत आहे, असे सांगून बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे पुढे म्हणाले, भाजपाने देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान करून प्रथमच ओबीसी समाजाला न्याय दिला. त्यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा प्रदान केला. केंद्रात ओबीसी समाजाचे २७ मंत्री आहेत. महाराष्ट्रात प्रथमच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींचे मंत्रालय स्थापन करून राज्यातील ओबीसींना न्याय दिला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर इम्पेरिकल डेटाचे नियोजन करून ओबीसींना न्याय मिळवून दिल्याचे ते यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी सरकार असताना ओबीसींना न्याय मिळू शकत नाही या कारणावरून तत्कालीन ओबीसी आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे सरकार आले तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत इम्पिरिकल डेटासाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आता ढोंग करत आहे. भाजपवर खोटे आरोप करत आहेत.

ओबीसींसाठी काम करणारा खरा पक्ष भाजपाच

बावनकुळे म्हणाले, भाजपाने जिल्हा परिषद, आमदार, मंत्री, पालकमंत्री यासारखी पदे दिली, त्यावेळी अन्याय झाला नाही का? त्यानंतर पक्षाने मला महासचिव व आता प्रदेशाचे अध्यक्ष केले, भाजपाने माझ्यावर किंवा ओबीसींवर कधीही अन्याय केला नाही. याउलट, मविआ सरकारने महाज्योतीचे पैसे थांबविले, इम्पेरिकल डेटासाठी निधी नाकारला, हा ओबीसींवर अन्याय नाही का? ओबीसींसाठी काम करणारा खरा पक्ष भाजपाच आहे.

ओबीसी जनगणनेची संविधानात तरतूद नाही

बावनकुळे पुढे म्हणाले,  ओबीसींची जनगणना करण्याची तरतूद संविधानात नाही, बिहारमध्ये ओबीसींची जनगणना करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने असे करता येणार नाही असा निर्णय दिला. त्यासाठी संविधानात सुधारणा करावी लागणार आहे. युपीए सरकारच्या काळात जात निहाय जनगणना करण्यात केवळ महाराष्ट्रात लाखो चुका झाल्या होत्या असेही बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसेंकडून होणाऱ्या आरोपांना त्यांनी यावेळी उत्तर दिले, ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या तत्कालीन सरकारमध्ये फडणवीसांनी एकनाथ खडसेंना ७ खात्याचे मंत्रीपद दिले होते, असा दावा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे एकनाथ खडसेंनी आम्हाला शिकवू नये असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.