खरुज : निदान आणि उपचार

    05-Jun-2023
Total Views |
scabies

सत्वर पाव ग मला
भवानी आई रोडका वाहिन तुला
नंणदेच कार्ट किरकिर करते
खरुज होऊ दे त्याला
खरुजचा उल्लेख संत एकनाथ महाराजांच्या भारुडातदेखील आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आजार. कारण, हा संसर्गजन्य आहे. व्यवस्थित उपाय न केल्यास ही खरुज कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये पसरण्याची शक्यता असते. शाळेतील एका मुलाला खरुज असल्यास त्याद्वारे ती वर्गातील सर्व मुलांमध्ये पसरु शकते. गलिच्छ वस्तीत राहणारी मुले, ग्रामीण भागातील मुले, म्युनिसिपल शाळेतील मुले यांच्यामध्ये खरुजचे प्रमाण अधिक आढळते. स्वच्छतेचा आभाव व व्यवस्थित उपचार न घेणे यामुळे हा आजार बराही होत नाही व त्याचा संसर्ग इतरांना होतो.

खरुज ही ‘सारकोपटीस स्केबाई’ या किड्यामुळे होते. या किड्याची मादी त्वचेच्या वरच्या थरांमध्ये छोटासा बोगदा बनविते व त्यात असंख्य अंडी निर्माण करते. यामुळे त्या भागात प्रचंड खाज सुटते. ही खाज रात्रीच्या सुमारास जास्त प्रमाणात असते. खाजविण्याने खरुजचे किडे हे शरीराच्या दुसर्‍या भागात स्थलांतरित होतात. खरुजची लागण ही बोटांची बेचके, काखेत, जांघेत, मनगटावर, मांड्यांवर व जननेंद्रियावर होते. या भागामध्ये प्रचंड खाज निर्माण होते. यातील काही जखमा पिकतात व त्यातून पू यायला लागतो. खरुजमुळे होणारी गुंतागुंत : अंगावर पित्त उठणे, जखमा पिकणे, एक्झीमा हे आजार उद्भवण्याची शक्यता असते. क्वचित प्रसंगी त्याचा परिणाम मुत्रपिंडावर होतो.

उपचार : आमच्या लहानपणी महानगरपालिकेतील दवाखान्यात निम्या रुग्णांना खरुजेचे औषध दिले जायचे. ‘सल्फर ऑईटमेंट’ हा तेलकट पेपरवर दिला जायचा. पुढे पुढे बाटलीत पांढरे औषध दिले जाऊ लागले. मेडिकल कॉलेजला असताना स्किन ओपीडीमध्ये ठिकठिकाणी फलक लावलेले असत. टेबल, खुर्चीला हात लावू नका. उद्देश हाच होता की खरुज पसरू नये. पुढे मालवणी येथे इंटर्नशिप करताना एक नवीन उपक्रम पाहण्यास मिळाला. मास स्केबीज ट्रिटमेंट - खरुजबाधित मुलांना पांढर्‍या औषधाचे लोशन असलेल्या टबमध्ये उभे केले जाई. यामुळे उपचार प्रभावीपणे होत असे आणि खरुज पसरण्याचे प्रमाण कमी होत असे.

खरुजचा उपचार करताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे. लावायला दिलेले औषध सर्व कुटुंबाने लावावे. आंघोळ झाल्यावर हे औषध सर्व अंगावर लावावे. काही मिनिटांतच हे औषध अंगावर सुकून जाते. घरातल्या सर्व व्यक्तींनी हे औषध तीन दिवस लावावे. त्यानंतर जरुर असल्यास हे औषध लावावे.

सध्या ‘गॅमा बेनझीन हेक्साक्लोराईड’ (स्कॅबोमा) हे उपलब्ध आहे व ते प्रभावी आहे. ‘बेन्झाइल बेन्झोएट लोशन’देखील उपलब्ध आहे. खरुज ओली असेल, तर (इनफेक्टेड स्केबीज) डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविक (अ‍ॅन्टिबायोटिक) घ्या. अंगाला जास्त खाज येत असल्यास ‘सेट्रिझीन’ची गोळी घ्यावी. वरवर आजार सोपा जरी वाटत असला तरी डॉक्टरांसाठी हा आजार बरा करणे, हे आव्हान असते. यासाठी रुग्णाचे व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य अपेक्षित आहे.

खरुजवर सध्या प्रभावी औषध उपलब्ध आहे. ‘बॅन्डी प्लस’ गोळी (अलबेंडाझॉल आणि आयवरमेट्रिन) ही अत्यंत प्रभावी आहे. पहिल्या, दुसर्‍या व दहाव्या दिवशी एक गोळी दिली जाते.

शहरी भागात खरुजचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, शिक्षणाचा प्रभाव यामुळे खरुज कमी प्रमाणात दिसते. तरीही आज झोपडपट्टी विभागात, ग्रामीण विभागात, महानगरपालिकेच्या शाळेत याचे प्रमाण बर्‍यापैकी आहे. खरुजचे निर्मूलन करायचे असेल, तर एक व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल
.
खरुजवरील इतर पॅथीमधील उपचार

आर्युवेद आणि खरुज : आर्युवेदामध्ये अनेक चर्मरोगांचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. वात, कफ आणि पित्त या त्रिदोषातील समतोल बिघडल्याने आजारास सुरुवात होते. चर्मरोगांचे मुख्य सात प्रकार आहे. वातज, पित्तज व कफज असे पुन्हा त्याचे विभाग केले जातात व अचूक निदान केले जाते.

उपचार : खरुजच्या जखमेवर लावण्यासाठी त्रिफळा किंवा यष्टीमधू पेस्ट, क्रिम, लोशन या स्वरुपात उपलब्ध आहेत. रुग्णाच्या प्रकृतीप्रमाणे करंज तेल, चंदनाचा लेप, दशमूल तेल यांचादेखील वापर केला जातो.

इतर औषधे : ही औषधे शमन आणि शोधनचे काम करतात. ही औषधे गोळ्या किंवा चूर्ण या स्वरुपात उपलब्ध आहेत. रुग्णाच्या प्रकृतीप्रमाणे त्रिफळा चूर्ण, सूतशेखर वटी, यष्टिमध, चंद्रकला रस, कामदुधा रस, अविपत्तीकार चूर्ण, आरोग्यवर्धिनी वटी यापैकी एकाची निवड केली जाते.

पथ्य : ताजे गरम जेवण घ्यावे. बाहेरचे अन्नपदार्थ शक्यतो टाळावे, कपडे सूती व कॉटनचे असावे व ते स्वच्छ धुतलेले असावे.मानसिक स्वास्थ्य उत्तम असावे म्हणजे आजार आपल्यापासून लांब राहतात.

होमिओपॅथी आणि खरुज

जर्मन फिजिशियन डॉ. सॅम्युअल हॅनेमान हे होमियोपॅथी उपचार पद्धतीचे जनक आहेत. १९व्या शतकात त्यांनी या उपचार पद्धतीचा शोध लावला. आज जगभर या उपचार पद्धतीचा प्रसार झाला आहे. अ‍ॅलोपॅथीच्या उपचार पद्धतीपेक्षा ही उपचार पद्धती भिन्न असली तरी काही आजारांवर ती अत्यंत प्रभावी आहे. या उपचार पद्धतीत तीन मुख्य प्रकारची औषधे उपलब्ध असतात - १) अ‍ॅक्युट रेमेडी २) इंटरकरंट रेमेडी ३) कॉन्टिट्यूशनल रेमेडी. रुग्णाची व्यवस्थित ‘हिस्ट्री’ घेऊन ही औषधे ठरवली जातात.होमियोपॅथी उपचार पद्धतीवर विश्वास ठेवणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे.

खरुजसाठी ‘सल्फर २००’ हे औषध दिले जाते. याचबरोबर ‘इंटरकरंट’ आणि ‘कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी’चादेखील उपयोग केला जातो. आज रुग्ण होमियोपॅथीकडे वळताना दिसत आहे. अगदी कोरोना महामारीच्या काळात देखील काही रुग्ण होमियोपॅथी उपचार घेत होते. अ‍ॅलोपॅथीचे महागडे उपचार आणि महागड्या चाचण्या यास जबाबदार असाव्यात.

प्रतिबंधात्मक उपाय : इतर साथीच्या आजारासारखेच याचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
वैयक्तिक स्वच्छता- रोज अंघोळ करणे, नखे नियमित कापणे, केस धुणे, सार्वजनिक स्वच्छता पाळणे.
खरुज झाल्यास त्याचा वेळीच उपाय करावा म्हणजे त्याचा प्रसार इतरांमध्ये होणार नाही.

आरोग्यरक्षक : ग्रामीण भागातील शाळेत माध्यमिक शाळेत मुलांना प्रथमोपचार व स्वच्छतेचे नियम याचे प्रशिक्षण दिले जाते. वर्गासाठी आरोग्य रक्षक त्या मुलांमधून निवडला जातो. या आरोग्यरक्षकाने वर्गातील मुलांचे कपडे, केस, नखे, दात यांचे निरीक्षण नियमित करावे. काही दोष आढळल्यास शिक्षकांच्या निर्दशनास आणून द्यावे. या आरोग्य रक्षकांना प्रथमोपचाराचे जुजबी प्रशिक्षण दिले जाते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम ‘आरोग्य भारती’ ही संस्था गेली काही दशके निरंतर करताना दिसत आहे.

माझा देश खरुजमुक्त होवो ही सदिच्छा!


डॉ. मिलिंद शेजवळ