मुंबईत होणार अश्वमेथ महायज्ञ!

    04-Jun-2023
Total Views |
Ramesh Bais

मुंबई
: खारघर येथे २३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत होणाऱ्या ४८ व्या अश्वमेध महायज्ञानिमित्त भूमीपूजनाचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती मैदान, खारघर येथे संपन्न झाला. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अश्वमेध यज्ञ हे केवळ धार्मिक अनुष्ठान नाही, तर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक व अध्यात्मिक महत्त्व आहे. सर्व समाजाला एकत्र घेऊन यज्ञ करीत असल्यामुळे त्यातून मतभेद मिटून एकात्मतेची भावना वाढते, असे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले.

तसेच राज्यपाल म्हणाले, आज पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत आहेत. अश्यावेळी अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून समष्टी, सद्भावना व मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले. जागतिक हवामान बदलांचे परिणाम तीव्र होत असून अलिकडच्या काळात राज्याने वारंवार दुष्काळ व पूरस्थिती अनुभवली आहे असे सांगून पर्यावरण व विकास यामध्ये यांचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे, असे राज्यपालांनी सांगितले. विश्वकल्याणाच्या उद्देशाने अश्वमेध महायज्ञाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे अभिनंदनसुध्दा यावेळी केले.

यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे प्र-कुलगुरू चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संचालक मनुभाई पटेल, उद्योजक डॉ निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.