मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगांव येथे होणाऱ्या हिंदूंविरोधी घटना आणि हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज बुलंद करण्याचा निर्धार मालेगाव वासियांनी केला आहे. हिंदू अत्याचाराच्या विरोधात भाजप आमदार नितेश राणे आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान तथा समस्त हिंदू आघाडी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या विशेष उपस्थितीत रविवार, दि. २ जुलै रोजी मालेगावांत जन आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती आ. नितेश राणे यांनी दिली आहे. राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे.
आ. नितेश राणे म्हणाले की, 'रोज हिंदूंवर होणारे हल्ले, गोरक्षकांवर केला जाणारा अन्याय, प्राचीन गडकिल्ल्यांभोवती वाढत जाणारे अतिक्रमण या गोष्टी हिंदू समाजाने का सहन कराव्यात ? या सगळ्या अत्याचाराच्या विरोधात हिंदूंचा आवाज म्हणून रविवार, दि. २ जुलै रोजी मालेगांव येथील रामसेतू पुलाजवळ 'हिंदूंचा हिंदू जनआक्रोश' मोर्चा आम्ही काढणार असून त्यानंतर तिथे महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हिंदू म्हणून आपल्या सर्वांना एकत्रित यायचे असून मी येतोय, तुम्हीही या. आपण सगळे मिळून हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभागी होऊया,'' असे आवाहन भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे.