‘आरटीओ’ पुणे येथे कार्यरत असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव ज्ञानदेव भोर हे ‘वन्यजीव छायाचित्रकार’ म्हणून राष्ट्रीयस्तरावर ओळख निर्माण करणारे छायाचित्रकारदेखील आहेत. हे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर वाचकांना सुखद आश्चर्याचा धक्का न बसेल तरच नवल!
अगदी ढोबळमनाने विचार केला, तर छायाचित्रण कलेचा शोध १७१७च्या सुमारास जोहान हेनरिक शुल्झने लावला म्हणण्यापेक्षा, प्रकाश आणि छाया यांच्यातील संवेदनशील खेळाचे प्रयोग करून ते ‘कॅप्चर’ करण्याचे प्रयोग केले आणि साधारण १८००च्या आसपास थॉमस वेजवूडने पहिल्यांदाच ‘इमेज कॅप्चर’ करून तिचे दस्तावेजीकरण केले. पुढे १८२६ मध्ये ‘नाईस्फोर नाईपीस’ने सर्वप्रथम कॅमेराने इमेज कॅप्चर करून ते निश्चित केले. पुढील शतकात कॅमेराने अनेक स्थित्यंतरे पाहिली. अनेक सुधारित बदल पाहिले. आता तर १९९०च्या दशकात संगणक आधारित ‘इलेक्ट्रॉनिक डिजिटल’ कॅमेर्यांच्या संदर्भात व्यावसायिक परिचय होऊन छायाचित्रात क्रांती घडवून आली. एकूणच ‘छायाचित्रण’ कला ही सर्वसामान्य जीवनमानातील एक अत्यंत जिव्हाळ्याची कला म्हणून जपली जाऊ लागली.
निसर्ग फोटोग्राफी, व्यक्ती म्हणजे माणसांसाठीची फोटोग्राफी आणि मानवनिर्मित फोटोग्राफी अशा मुख्यतः तीन प्रकारांत फोटोग्राफी अर्थात छायाचित्रण केले जाते. या मुख्य तीन प्रकारांमध्येही अनेक उपप्रकार असे आहेत की, त्या त्या प्रकारांनी विशेष कौशल्य प्राप्त करून ती ती फोटोग्राफी प्रचलित केली जाते. मग निसर्ग छायाचित्रण, वन्यजीव छायाचित्रण, स्थिर वस्तू छायाचित्रण, सूक्ष्म छायाचित्रण, पाण्याखालील छायाचित्रण ज्याला ‘अंडरवॉटर फोटोग्राफी’ म्हणतात. खगोल छायाचित्रण, एरियल फोटोग्राफी, वैज्ञानिक छायाचित्रण, हवामान छायाचित्रण, लोक छायाचित्रण ज्यात अनेक उपकार आहेत. जसे की, पोर्ट्रेट-फॅशन-वेडिंग-चाईल्ड-डाक्युमेंटरी-स्पोर्टस् अशा अनेक विषयांनी ज्ञात अशा प्रकारची छायाचित्रणे लोक छायाचित्रणात येतात. एव्हाना आपल्या ध्यानात आले असेल की, छायाचित्रण कला ही शेवट नसलेली कला आहे. या कलेच्या कक्षा अनंत आहेत. या कलेला अंत नाही.
आतातर प्रत्येक व्यक्ती ही छायाचित्रकार बनलेली आहे. ज्या व्यक्तीच्या हातातील मोबाईलमध्ये कॅमेरा आहे, ती त्या मोबाईलमुळे ‘कॅमेरामन’ झालेली पाहायला मिळते. प्रत्येकाकडे स्वतःचा ‘व्ह्यु-फाईंडर’ जागृत झालेला दिसतो. हे सारं जरी निरीक्षणात असलं तरी लेन्सचा कॅमेरा आणि मोबाईलचा कॅमेरा यांच्यात जंकफूड आणि सुग्रास जेवणासारखा फरक आहे. म्हणून लेन्स कॅमेरा धारक कॅमेरामॅन अर्थात छायाचित्रकार यांची दृष्टी ही वादातीतच असते. आजच्या लेखाचे मानकरी हे असे एक छायाचित्रकार आहेत की, एक संवेदनशील विभागाची परवाना देण्याची अधिकारी म्हणून जबाबदारीची ओळख जपतच, आवड जोपासत छायाचित्रण करायंच... अशी व्यक्तिमत्त्वे फार क्वचितच दिसतात.
‘आरटीओ’ पुणे येथे कार्यरत असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव ज्ञानदेव भोर हे ‘वन्यजीव छायाचित्रकार’ म्हणून राष्ट्रीयस्तरावर ओळख निर्माण करणारे छायाचित्रकारदेखील आहेत. हे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर वाचकांना सुखद आश्चर्याचा धक्का न बसेल तरच नवल! संजीव भोर यांचा नोकरीतील प्रवास फारच आगळावेगळा आहे. १९९५-१९९८ ला ते महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत होते. ‘एम.एफ.ए.एस’ विभागात १९९८-२००२ पर्यंत ते ‘असिस्टंट डायरेक्टर अकाऊंट्स’ या पदनामाने सेवेत राहिले. पुढे २००२ ते २०१५ या काळात त्यांनी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहन विभाग, महाराष्ट्र या पदनामाने पेण, पुणे, नाशिक तसेच मुंबई येथे सेवा बजावली. त्याचा अनुभव आणि त्यांची सेवा त्यांना पदोन्नतीपर्यंत घेऊन आली. २०१५ साली ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नतीवर लातूर आणि पुणे येथे कार्यरत राहिले. आता सध्या ते जून २०१९ पासून पुणे येथे ‘डेप्युटी आरटीओ’ म्हणून कार्यरत आहेत.
इतकी प्रदीर्घ सेवा म्हणजे दोन तपांहून अधिक काळ सेवा बजावूनही त्यांनी तितक्याच कर्मठपणे, तितक्याच आवडीने आणि तितक्याच अभ्यासूपणे वन्यजीव छायाचित्रण कला जोपासली. इतकी की, दीर्घ सुट्टी मिळाली किंवा एखाद्या वेळेस शक्य झाल्यास रजा घेऊन त्यांनी कान्हा जंगल, ताडोबा जंगल किंवा गिर जंगल गाठले. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर ती गोष्ट साध्य करता येते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मित्रवर्य छायाचित्रकार संजीव भोर आहेत. मला वाचनात आल होतं जगप्रसिद्ध वाईल्ड अॅनिमल फोटोग्रॉफर अॅलन मॅकफॅडियन यांनी ‘किंगफिशर’ या पक्ष्याचं इतकं निरीक्षण केलं होतं की, त्या पक्ष्याचा उत्तमोत्तम क्षण मिळविण्यासाठी त्यांनी तब्बल सहा वर्षे मेहनत घेतली होती आणि एक नव्हे, दोन नव्हे, ७ लाख, २० हजार वेळा प्रयत्न करून अखेरीस परिपूर्ण ‘किंगफिशर’ पक्ष्याचा फोटो टिपला होता. ज्याला जागतिक स्तरावर उत्तमोत्तम फोटो म्हणून निवडले होते.
ते म्हणाले होते, कॅमेराचे शटर पुश करण्यापूर्वी आणि नंतर विषय कसा फॉलो करायचा ते प्रथम शिकलं पाहिजे. मला वाटतं, संजीव भोर या पद्धतीनेच छायाचित्रण करीत असतात. प्रतीक्षा ही वन्यजीव छायाचित्रकारांची पहिली पायरी असते. संजीव भोर यांनी टिपलेले अत्यंत दुर्मीळ क्षण काही सेकंदात पाहायला मिळतात. त्यासाठी त्यांनी किती प्रतीक्षा केलेली असेल त्या क्षणाची.... त्यांनी किती वाट पाहिली असेल? हे ते आणि त्यांचा कॅमेराच जाणो!! पण, त्यांची फोटोग्राफी पाहताना जो स्वर्गीय आनंद मिळतो तो शब्दातीत आहे. मला वाटतं, संजीव भोरसारख्या छायाचित्रकारांचा संयम हा फारच अफाट असावा. त्यांना ती गती मिळविण्यासाठी किती परिश्रम करावे लागले असतील देव जाणे! कॅमेराचा शटरस्फीड अॅपरचर, व्ह्यु-फाईंडरची क्लॅरिटी, कम्पोझिशन, हात आणि कॅमेरा स्थिर ठेवणे, ट्रायपॉडवरचं ध्यान आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तो समोरचा प्राणी वा पक्षी यांच्याशी एकरुप होणं अन् तेही जागरूक राहून, हे सारं सारं एका गियरमधून दुसर्या गियरमध्ये बदल करून वाहन गती घेण्याचा जो अचूकक्षण असतो, त्याहून अधिक अलर्ट राहून हे सारं साधावं लागतं.
फिल्डक्राफ्ट कौशल्य आणि प्राणी-पक्ष्यांच्या वर्तनाचे ज्ञान आवश्वक असणं, या दोन गोष्टी संजीव भोर यांना अवगत आहेत. त्यामुळे त्यांची फोटोग्राफी ही कलारसिक जगतात अन्ययसाधाराण स्थान मिळवू शकली. वन्यजीव छायाचित्रण आज फार महत्त्वाचे मानले जाते. नैसर्गिक अधिवासातील वन्यजीवांच्या विविध पुकारांचे दस्तावेजीकरण करण्याशी संबंधित आहे. या छायाचित्रणामुळे सर्वसामान्यांसह अनेकांना वन्यजीवनाबद्दल माहिती मिळते. तेथील वातावरणाचा अंदाज आणि अभ्यास करायला मदत होते. व्हिसेंट व्हॅन गॉगने आपल्या भावाला एका पत्रात म्हटले होते, “खूप चालत जा... निसर्गात फिर... निसर्गावर प्रेम कर, म्हणजे उत्कृष्ट कलाकृती बनविता येईल.” ही बाब छायाचित्रकारांनाही लागू आहे.
छायाचित्रकार आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर हे प्रयोगशील देशाटन, पर्यटन करणारे जागृत अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांच्या वन्यजीव छायाचित्रणांना राष्ट्रीय स्तरावरील ‘व्ह्युअर्स चॉईस अवॉर्ड’, ‘नेचर-वाईल्ड’ विभागातील उत्कृष्ट छायाचित्र लॉस एंजेलिस येथील ‘ल्युसी फाऊंडेशनचे प्रतिष्ठेचे अवॉर्ड, ‘इंटरनॅशनल अॅपर्चर अवॉर्ड, ऑस्ट्रेलिया’ अशी दर्जेदार आणि प्रतिष्ठेची अवॉर्ड्स मिळालेली आहेत. त्यांच्या कॅमेर्यासह वन्यजीवन प्रवासास मनापासून शुभेच्छा!