‘खाकी’तील देवदूत

    30-Jun-2023
Total Views |
Article On Police Sub Inspector Praveen Jadhav

धर्म, जात, पंथ, भाषा हे गौण मानून संकटात सापडलेल्या प्रत्येक गरजूसाठी धावून जाणार्‍या प्रजाहितदक्ष प्रवीण जाधव या खाकीतील देवदुताविषयी...

ठाणे पोलीस दलात शहर वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक असलेले प्रवीण जाधव उर्फ प्र. जा. यांची कर्तव्यदक्षता वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच त्यांना ‘प्रजाहितदक्ष’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ठाणे शहरातील पिंपळपाडा येथे १९७१ साली जन्मलेल्या प्रवीण यांचे वडील काळुराम जाधव हे ठाणे पोलीस दलात ‘ड्रिल ऑफिसर’ होते. घरात आई-वडील आणि तीन बहिणी असे सुखवस्तू कुटुंब असल्याने प्रवीण यांचे बालपण तसे सर्वसामान्य मुलाप्रमाणेच गेले. घरात सर्वांचेच लाडके असल्याने लहानपणी त्यांचे चांगलेच कोडकौतुक झाले. प्राथमिक शिक्षण नजीकच्याच शिशू ज्ञान मंदिरात पूर्ण केल्यानंतर त्यांच्या वडिलांची बदली खंडाळा येथे झाल्याने प्रवीण यांनी ‘एसएससी’ पर्यंतचे पुढील शिक्षण पुण्यातील आरटीपीएस शाळेत घेतले. त्यानंतर पुन्हा वडिलांची बदली ‘पोलीस प्रशिक्षण केंद्रा’त झाल्याने प्रवीण यांच्या शिक्षणात खंड पडला तो कायमचाच! लहानपणापासूनच धष्टपुष्ट शरीरयष्टी लाभल्याने आणि वडील एक उत्तम प्रशिक्षक असल्याने प्रवीण यांनीही पोलीस दलात रुजू होण्याचे ठरवले अन् दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील एक-दोन वर्षांतच पोलीस भरतीसाठी उभे राहून ते पोलीस सेवेत रुजूदेखील झाले.
 
शालेय जीवनात वडिलांच्या समाजसेवीवृत्तीचे पाईक बनलेल्या प्रवीण यांनीदेखील वडिलांप्रमाणेच समाजकार्य करून इतरांना मदत करण्याचे ठरवले. पोलीस सेवेत कार्यरत असल्याने त्यांनी आपल्या ’खाकी’ गणवेशाचा उपयोग ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद जपण्यासह प्रजाहितदक्ष बनून जनसेवेचा वसा घेतला. प्रवीण यांचे वडीलदेखील समाजातील गोरगरीब, बेरोजगार उमेदवारांच्या अडीअडचणीमध्ये धावून जात, तोच समाजसेवेचा वारसा, तीच प्रेरणा आपणास वडिलांकडून मिळाल्याचे प्रवीण सांगतात. गरजूंना मदतीचा हात द्यावा, हीच खरी माणुसकी असून, हेच मानवतेचे खरे लक्षण आहे. आजकाल हा गुण दुर्मीळ होत असला, तरी वेळप्रसंगी कसलाही मागचा पुढचा विचार न करता संकटात सापडलेल्या अनोळखी लोकांच्या मदतीसाठी प्रवीण नेहमीच धावून जातात. अनेकदा तर मदत करणार्‍याचे नावदेखील त्यांना ठाऊक नसते. मग ती मदत छोटी की मोठी, आर्थिक की मानसिक हे मुद्दे त्यांच्यासाठी गौण ठरतात. किंबहुना धर्म, जात, पंथ, भाषा असे सारे भेद विसरून प्रवीण जाधव प्रसंगी पदरमोड करून माणुसकीचा धर्म जोपासतात.

कोपरी वाहतूक उपविभागात पोलीस अंमलदार म्हणून दैनंदिन कर्तव्य बजावत असताना, प्रवाशांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल प्रवीण जाधव घेतात. वाहतूक नियमन करताना ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग बांधवांना लागेल ती मदत देतात. तसेच, रिक्षात एखाद्याचे सामान गहाळ झाल्यास तक्रारदाराला हेलपाटे मारावयास न लावता स्वतःच विशेष परिश्रम घेऊन वैविध्यपूर्णरित्या कौशल्याने सीसीटीव्ही फुटेज व जनसंपर्काच्या माध्यमातून गहाळ झालेल्या वस्तू हस्तगत करून तक्रारदारांना मिळवून देतात. आजवर त्यांनी लाखो रुपये किमतीचे विविध मॉडेलचे ४७ मोबाईल, दोन लॅपटॉप, सोनी कंपनीचे दोन महागडे कॅमेरे आणि अतिमहत्त्वाची कागदपत्रं व कपडेलत्ते असलेल्या नऊ बॅगा व पर्स प्रवाशांना सुखरूप मिळवून दिल्या आहेत. मुंबईतील एका सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्ताची लाखो रुपयांची हिर्‍यांची अंगठीदेखील प्रवीण यांनी आपल्या कौशल्यपूर्ण तपासाने मिळवून दिली.

एकदा तर ‘समतोल फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेला एक मुलगा हरवला होता. त्याचाही शोध घेऊन प्रवीण यांनी त्याला संस्थेच्या ताब्यात सुखरूप सोपवले. शिक्षिकेची शैक्षणिक प्रमाणपत्रे, चोरीस गेलेले नववधूचे कपडे, रस्त्यामध्ये सापडलेला वाहन परवाना, पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, एटीएम कार्ड व किरकोळ रक्कमा अनेकांना जाधव यांनीच मिळवून दिली आहेत. ठाणे स्थानकाबाहेर ’अतिथी देवो भव’ या उक्तीप्रमाणे बाहेरगावच्या तसेच परदेशातील नागरिकांच्या मदतीसाठीही प्रवीण नेहमीच सज्ज असतात.

ज्या समाजात आपण वावरतो, त्या समाजाचे आपणही काही तरी देणे लागतो, ही भावना कायम मनी कोरली गेल्याने प्रवीण जाधव हे आपले कर्तव्य सांभाळून समाजसेवा करीत असतात. ते राहत असलेल्या परिसरातील पिंपळपाडा मित्र मंडळ तसेच काही समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून रक्तदान व आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होतात. सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी त्याचप्रमाणे शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा उपक्रमांतही त्यांचे मोठे योगदान असल्याचे ते सांगतात. गरजूंच्या मदतीला सदैव तत्पर असल्याने आजवर अनेक पुरस्कार व सन्मानाचे धनी ठरलेल्या प्रवीण जाधव यांचा ठाणे पोलीस दलानेही नुकताच रोख पारितोषिक देऊन यथोचित सन्मान केला. आपल्या या कार्याची दखल भविष्यात शासनदरबारीही घेतली जावी, अशी आशा ते बाळगतात.

नवीन पिढीला संदेश देताना, “अन्याय सहन करू नका, कधीही कायद्याचे उल्लंघन करू नका, सर्वप्रथम आपल्या देशाचा विचार करा, त्यानंतरच आपला मार्ग निश्चित करा,” असा मित्रत्वाचा सल्ला ते देतात, अशा या प्रजाहितदक्ष पोलीस अधिकार्‍याला भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

९३२००८९१००

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.