अयाजसोबत लग्नासाठी अनामिका बनली 'फातिमा'!

आई म्हणाली , नाव लपवून केला "लव्ह जिहाद"...

    03-Jun-2023
Total Views |
jabalpur-madhya-pradesh-anamika-ayaz-marriage-card-viral-family-allege-love-jihad
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. अनामिका दुबे नावाची हिंदू तरुणी फातिमा झाली. त्यामुळे फातिमाच्या व्हायरल लग्नपत्रिकेवर पोलिसांकडून कारवाईची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. दरम्यान मुलीच्या आईने वराने नाव बदलून आमची फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. व्हायरल होत असलेल्या लग्न पत्रिकेमध्ये लग्नाची तारीख ७ जून अशी नोंदवण्यात आली आहे. मात्र , अयाजला क्लीन चिट देताना पोलिसांनी दोन्ही कुटुंबांच्या इच्छेनुसारच लग्न झाल्याची माहिती दिली.

व्हायरल होत असलेल्या लग्न पत्रिकेनुसार , जबलपूरच्या आमखेरा भागातील एका मुलीचे मुस्लिम तरुणासोबतची लग्न पत्रिका सोशल मीडीयावर व्हायरल झाली आहे. अनामिका दुबे हे नाव कंसात दाखवून , या लग्न पत्रिकेत तिचे पहिले नाव उजमा फातिमा दाखवण्यात आले आहे. तसेच लग्न पत्रिकेत अयाजचे नाव वर म्हणून नमूद करण्यात आले असून त्याचे वडील रेल्वेत नोकरी करत असल्याचे सांगितले आहे. या लग्न पत्रिकेसोबत अनामिका आणि अयाजच्या लग्नाचे प्रमाणपत्रही व्हायरल झाले आहे. ३ साक्षीदारांच्या साक्षीने हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
 
ही लग्न पत्रिका आणि मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी निषेध नोंदवण्यास सुरुवात केला. दि. १ जून रोजी हिंदू संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आणि हे प्रकरण षडयंत्र असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली. मुलीचे धर्मांतर झाल्याचा आरोप करत हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले. दरम्यान, संस्थेशी संबंधित काही लोकांनी मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.

मुलीच्या आईने अयाजवर आपल्या मुलीसोबत 'लव्ह जिहाद'चा कट रचल्याचा आरोपही केला आहे. तसेच आपल्या मुलीला परत घरी पाठवण्याची मागणी केली आहे. अनामिकाच्या आईचा आरोप आहे की, अयाजने स्वतां:चे नाव खोटे सांगून त्यांच्याशी बोलणे केले.

मात्र, जबलपूर पोलिसांनी मुलीच्या आईचे आरोप फेटाळून लावले असून त्यांना सर्व काही अगोदरच माहीत असल्याची माहिती दिली आहे. जबलपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि मुलाचे सुमारे ८ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये लग्न करण्यासाठी दोघांनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. या कालावधीत दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाला संमती दिल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.