दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
03-Jun-2023
Total Views |
मुंबई : दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’तर्फे ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पूर्वसंध्येला, दि. ४ जून रोजी ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स - २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या एकूण १३ पुरस्कारार्थींना गौरविण्यात येणार आहे. रविवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख अतिथी म्हणून या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
जलप्रक्रिया तज्ज्ञ आणि ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक संदीप आसोलकर आणि राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे (भा.प्र.से) हे अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ‘एसएफसी एन्व्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज प्रा. लि.’ हे या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ व ‘मिशन लाईफ’ हे सहप्रायोजक आहेत. या सोहळ्यासाठी ‘टेलिव्हिजन पार्टनर - झी २४ तास’, ‘रेडिओ पार्टनर - रेडिओ सिटी ९१.१ एफएम’ आणि ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) हे ‘रिसर्च पार्टनर’ आहेत.
‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’, ‘एपीसीसीएफ वाईल्डलाईफ पश्चिम मुंबई’, ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स’चा उद्या सन्मान ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’, ‘महाराष्ट्र कांदळवन कक्ष’, ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडिया’, ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’, ‘सह्याद्री निसर्ग मित्र’, ‘महाराष्ट्र पक्षी मित्र’, ‘वाईल्डलाईफ इमेजेस अॅण्ड रिफ्लेकशन्स’, ‘इंडियन युथ बायोडायव्हर्सिटी नेटवर्क’ आणि ‘नॅचरलिस्ट फाऊंडेशन’ या सहयोगी संस्थांना सोबत घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे दरवर्षी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्ती आणि संस्थांच्या कामाचा सन्मान केला जातो आणि त्यांना प्रोत्साहन दिले जाते. यंदाच्या ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स - २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात नऊ श्रेण्यांतील पुरस्कारांची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये ‘बडींग नॅचरलिस्ट अवॉर्ड’, ‘कॉन्झरवेशन कॉन्ट्रीब्युटर अवॉर्ड’, ‘यंग रिसर्चर अवॉर्ड’, ‘कॉन्झरवेशन अॅक्टिव्हझम अवॉर्ड’, ‘हॅबिटॅट कॉन्झरवेशन अवॉर्ड’, ‘इकोटुरिझम ग्रुप अवॉर्ड’, ‘एक्सेपश्नल फॉरेस्ट स्टाफ अवॉर्ड’, ‘एथिकल नेचर ट्रेल अवॉर्ड’ आणि ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ असे नऊ पुरस्कार वितरित केले जाणार आहे.
‘बडींग नॅचरलिस्ट अवॉर्ड’ या श्रेणीतील पुरस्कार विभागून दिला असून त्यामध्ये बांदा येथील प्रवीण सातोसकर आणि सातार्यातील चिन्मय सावंत या दोन नॅचरलिस्टची निवड करण्यात आली आहे.
‘कॉन्झरवेशन कॉन्ट्रीब्युटर अवॉर्ड’ या श्रेणीतील पुरस्कार विभागून देण्यात येणार असून त्यामध्ये सिंधुदुर्गातील हेमंत ओगले आणि पुण्यातील संदीप नगरे या दोघांची निवड करण्यात आली आहे.
‘यंग रिसर्चर अवॉर्ड’ या श्रेणीतील पुरस्कार ही विभागून दिला गेला असून कोल्हापूरचे डॉ. पांडुरंग बागम, रत्नागिरीतील डॉ. विशाल भावे आणि मुंबईचे मृगांक प्रभू यांची निवड करण्यात आली आहे.
‘कॉन्झरवेशन ऍक्टिव्हझम अवॉर्ड’ या श्रेणीतील पुरस्कार हा संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणार्या संस्थेला दिला गेला आहे. या पुरस्कारासाठी सिंधुदुर्गातील ‘वनश्री फाऊंडेशन’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
‘हॅबिटॅट कॉन्झरवेशन अवॉर्ड’ या श्रेणीतील पुरस्कारासाठी नाशिकच्या ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्राची निवड करण्यात आली आहे, तर ‘इकोटुरिझम ग्रुप अवॉर्ड’ या श्रेणीतील पुरस्काराचे ‘सोनगाव कांदळवन निसर्ग पर्यटन’ हा इकोटुरिझम ग्रुप मानकरी ठरला आहे.
‘एक्सेपश्नल फॉरेस्ट स्टाफ अवॉर्ड’ या श्रेणीमध्ये गौताळा वन्यजीव अभयारण्याचे वनरक्षक रहीम गंभीर तडवी यांची निवड करण्यात आली आहे.
‘एथिकल नेचर ट्रेल अवॉर्ड’ या श्रेणीसाठी माय वे जर्नी ही संस्था मानकरी ठरली आहे, तर या पुरस्कारांमधील सर्वोच्च ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ अर्थात जीवनगौरव पुरस्कारासाठी पर्यावरणविषयक दीर्घकाळ लेखन आणि जनजागृतीमध्ये भरीव योगदान देणार्या डॉ. नंदिनी देशमुख मानकरी ठरल्या आहेत.
‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स - २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात ‘एक्सेपश्नल फॉरेस्ट स्टाफ’ वगळता पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवरांना प्रत्येकी ५१ हजार रुपये सहयोग निधी देण्यात येणार आहे, तर, जीवनगौरव पुरस्कारासाठी ६१ हजार रुपये इतका सहयोग निधी देण्यात येणार आहे.
नऊ श्रेण्यांत विभागलेले यंदाचे ‘स्पिसीज अॅण्ड हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड्स’च्या मानकर्यांना रविवार, दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. भायखळा येथील लोकशाहीर अन्नाभाऊ साठे सभागृहामध्ये हा समारंभ आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बातमीसोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करून नोंदणी करता येईल.