यांची दया कधी येईल?

    28-Jun-2023   
Total Views |
Article On Usman Buda Murdered In Sokoto Nigeria

उस्मान बुडा याचा बाजारपेठेत कत्तलखाना होता. ईद येणार आहे. त्यानुसार बाजारपेठेत वर्दळ नेहमीपेक्षा जास्त होती. अशातच उस्मान याचे दुसर्‍या दुकानदाराशी चर्चा सुरू झाली. त्यातून वाद सुरू झाला. भांडण वाजलं. दुसर्‍या दुकानदाराने म्हटले, उस्मान याने मोहम्मद पैगंबरांविरोधात निंदात्मक विधान केले. ईशनिंदा केली. बाजारातले सगळे लोक एकत्र झाले. त्यांनी उस्मानला दगडाने ठेचून मारले. ही घटना रविवार, दि. २५ जून रोजी नायजेरियाच्या सोकोटो परिसरातली. मरणाराही मुस्लीम आणि मारणारेही मुस्लीमच! या घटनेने जगभरात संताप व्यक्त होत आहे. कारण, इथल्या बहुसंख्य राज्यांमध्ये शरिया कायदा लागू आहे. मुस्लिमांसाठी शरिया कायदा आणि गैरमुस्लिमांसाठीही शरिया व्यतिरिक्त कायदा आहे. मात्र, त्यासाठी गैरमुस्लीम व्यक्तीने न्यायालयात निवेदन द्यावे लागते. उस्मान बुडाची निर्घृण हत्या झाली. मात्र, त्याविरोधात स्थानिक आवाज उठवू शकतील की नाही, याबद्दल शंकाच आहे.

गेल्याच वर्षी एक घटना घडली होती. ती त्यावेळी विद्यापीठाच्या परिसरातच घडली. सॅम्युअल नावाची एका ख्रिस्ती विद्यार्थी होती. व्हॉट्सअ‍ॅपवर एका ग्रुपमध्ये तिचा संवाद सुरू होता. मात्र, संवाद सुरू असताना इस्लाम विषयावर संवाद सुरू झाला. तिने इस्लामविषयक तिचे मत मांडले. क्षणार्धात त्याच महाविद्यालयातले मुस्लीम विद्यार्थी तिला शोधत महाविद्यालयाच्या आवाराज आले. तिला क्रूरपणे मारहाण करू लागले. इतकेच नाही तर तिला जीवंत जाळलेही. तिचा गुन्हा हाच होता की, ती ख्रिस्ती होती आणि तिने मुस्लीम धर्म आणि पैगंबर यांच्याबद्दल समोरच्या मुस्लीम विद्यार्थ्यांना न रूचणारे बोलली होती. भयंकर... त्या विद्यार्थिनीला माहितीही नसेल की, ज्यांच्यासोबत महाविद्यालयात तिने यापूर्वी गप्पागोष्टी केल्या असतील, तारूण्यसुलभ संवाद केला असेल, पुढच्या भवितव्याबद्दलही चर्चा केली असेल, त्याच ग्रुपमध्ये भावनेच्या भरात किंवा सहजच काही तरी बोलल्यावर तिला ईशनिंदेचे धनी व्हावे लागेल आणि तिच्याच महाविद्यालयातले सहविद्यार्थी तिचा खून करतील, तिला जीवंत जाळतील.

या घटनेचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. हे निर्घृण कृत्य करणार्‍या जमावातील काहींना पोलिसांनी अटक केली. मात्र, काही तासांतच नायजेरियाच्या रस्त्यांवर हजारो लोक उतरले. त्यांची मागणी होती की, त्या ख्रिस्ती मुलीला जाळणार्‍या त्या दोन विद्यार्थ्यांची सुटका करावी. त्यांनी जे काही केले, ते धर्माचेच काम होते. नायजेरियामधील कट्टरपंथी संघटनांनी आणि स्थानिक मुस्लिमांनीही त्या गुन्हेगारांना सोडावे यासाठी आंदोलन पुकारले आणि नायजेरियाच्या सरकारला कर्फ्यू लावावा लागला. यावर कडी करणारी घटना त्यानंतर लगेचच घडली. सॅम्युअलला मारहाण होतानाचा मारणार्‍यांनी व्हिडिओही काढला होता. नायजेरियातीलच र्‍होडा नावाच्या ४५ वर्षीय ख्रिस्ती महिलेने जी पाच मुलांची माता होती, तिने हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला. तिने या घटनेचा संताप व्यक्त केला. तिने व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला आणि मुस्लीम कट्टरपंथीयांनी तिच्याकडे मोर्चा वळवला. ईशनिंदा करणार्‍या सॅम्युअलच्या मृत्यूबद्दल सहानुभूती वाटते म्हणजे तिचेही ईशनिंदेला समर्थन आहे. तिलाही ईशनिंदा केली, म्हणून सजा व्हायला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे. त्यामुळे र्‍होडाला पोलिसांनी तत्काळ अटक केली. सहा महिने तिला विनाजामीन आणि कुणाच्याही संपर्कात न राहता तुरुंगात टाकण्याची कारवाई केली गेली. तिलाही सजा दिली गेली. त्यामुळे ईशनिंदा प्रकरणावरून खून झाला, तर त्याबद्दल मत व्यक्त करायलाही उत्तर नायजेरियामधील लोक घाबरतात.

नायजेरियामध्ये नेहमीच ईशनिंदेखाली कुणीना कुणी शिक्षेस पात्र ठरत असते. २०२० साली याहाया शरीफ अमिनू नावाच्या सुफी गायकालाही ईशनिंदेसाठी अटक झाली. त्याने काय ईशनिंदा केली, तर सुफी संतांचे श्रेष्ठत्व गायले. दुसरे कुणी श्रेष्ठ कसे असू शकते, असे म्हणत त्याच्यावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल झाला. त्याला न्यायालयाने फाशीची सजा सुनावली आणि त्याआधी स्थानिक लोकांनी या सुफी गायकाचे घर जाळले होते. ‘ऑफ द ह्युमॅनिस्ट असोसिएशन ऑफ नायजेरिया‘चा अध्यक्ष मुबारक बाला यालाही ईशनिंदेसाठी २४ वर्षांची सजा सुनावली गेली. तो उत्तम अ‍ॅथेलिट. सततच दहशतवादाच्या छायेत असलेला नायजेरिया. या देशातल्या लोकांना कायमच ईशनिंदा कायद्याच्या दडपणाखाली जगावे लागतेे. ते ज्या कोणत्या ईश्वराला मानतात, त्यांना यांची दया कधी येईल?

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.