पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशविदेशात भारताची प्रतिमा दिवसेंदिवस अधिक उज्वल होत असून, मोदी यांच्या नावाचा डंका सुरूच आहे. त्यामुळे विरोधक त्यातही डाव्या विचारसरणीच्या बोरुबहाद्दरांकडून ‘अंधभक्त’, ‘गोदी मीडिया’ अशा शब्दांत टीका-टिप्पणी केली जाते. मोदी यांच्या कर्तृत्वाचा करिष्मा केवळ भारतातच आहे, असे नाही आजवर त्यांनी ज्या-ज्या देशांना भेटी दिल्या तेथील नेते आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने मोदी यांचे स्वागत करत गुणगान गायले, ते पाहता त्यांनाही आपण ‘अंधभक्त’ म्हणाल काय? मोदी यांच्या अलीकडच्या दौर्यात तर परदेशातील राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे चरणस्पर्शकरत त्यांना सर्वोच्च सन्मानाने गौरविले. मग त्यांनाही आपण ‘मोदीभक्त’ किंवा ‘अंधभक्त’ म्हणाल काय? ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान त्यांना ‘बॉस’ म्हणून संबोधतात. अन्य देशांमधील नेते त्यांना जागतिक नेते, विश्वासू मित्र, दिलदार, कर्तृत्ववान अशा उपाध्यांनी गौरवितात. त्यांनाही ‘अंधभक्त’ म्हणावे काय? तसे नाही. मोदी यांचे कर्तृत्व या सर्वांच्या पलीकडे गेले असून त्यांनी जे काही कर्तृत्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कमावले आहे, त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचा गौरव वाढला असून जो सन्मान त्यांना मिळतो, तो वास्तविक भारताला मिळत असतो, असे खुद्द मोदी यांनी अनेकदा सांगितले आहे. तरीही मोदी विरोधकांनी नैराश्यातून ‘अंधभक्त’ आणि ‘गोदी मीडिया’ यांचा जप सुरूच ठेवला आहे. पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्यात ‘न्यूयॉर्क टाईम्स’सारख्या विश्वासार्ह दैनिकांनी त्यांच्या लोकप्रियतेवर रकानेच्या रकाने भरून लिखाण केले. तोही मग ‘गोदी मीडिया’चा प्रकार होता काय? मोदींच्या टीकाकारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ट्रक प्रवासापासून त्यांची भाषणे आणि वेशभूषा यांचे कौतुक करताना स्तुतिसुमने उधळताना कोणत्या प्रकारचा चश्मा लावला होता, याचे उत्तर त्यांच्या लिखाणातूनच मिळते. एक मात्र वास्तव आहे आणि ते म्हणजे राहुल गांधी यांचा इंग्लंड दौरा असो की अलीकडच्या काळातील अमेरिकेतील भ्रमंती त्याची फारशी दखल जागतिक माध्यमांनी घेतली नाही. जी काही दखल घेतली, ती गांधी घराण्याचे गुणगान गाणार्यांनीच घेतली आहे. त्यामुळे खरे ‘अंधभक्त’ कोण, हे स्पष्ट होते.
जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत सातत्याने क्रमांक एकवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही क्रमांक एकवरच असल्याचे शिक्कामोर्तब ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टीक्स’ या ट्विटर हँडलने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. मोदी यांना जगात क्रमांक एकचे नेते म्हणून ७६ टक्के रेटिंगसह पसंती देण्यात आली आहे. त्यांच्या जवळपास जगातील एकही नेता नाही, हे विशेष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर ८९.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जगातले सर्वांत लोकप्रिय नेते असा त्यांचा लौकिक कायम आहे. पंतप्रधान मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून संवाद साधत असल्यामुळे त्यांची लोकप्रियता इतक्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्मार्ट युगातील सोशल मीडियाच्या काळातही मोदी यांनी रेडिओसारख्या माध्यमातून संवाद साधत देशवासीयांशी असलेली नाळ घट्ट ठेवली आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. ‘मन की बात’चा प्रत्येक एपिसोड अन्य सर्वच भाषांतून भाषांतरित केल्यावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संख्येने ऐकला जातो. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टीक्स’नुसार पंतप्रधान मोदी यांना ७६ टक्के रेटिंग आहे, तर महासत्ता असल्याचा टेंभा मिरविणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या लोकप्रियतेचे रेटिंग केवळ ४० टक्के आहे. म्हणजेच मोदी यांच्यापेक्षा जवळपास निम्मे आहे. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची लोकप्रियता केवळ ३१ टक्केच आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२२ मध्येही अशाच पद्धतीचे सर्व्हेक्षण झाले होते, त्यावेळीदेखील पंतप्रधान मोदी ७५ टक्के रेटिंगसह क्रमांक एकवर होते. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने ही टक्केवारी सादर केली होती. देशात आणि विदेशातही पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचे निष्पन्न विविध सर्वेक्षणातून झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात कुणी कितीही उठाठेवी केल्या तरी त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी होणार नाही. त्यामुळेच त्यांच्यासोबत संवाद साधणे, त्यांची स्वाक्षरी घेणे, त्याचबरोबर त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी देशविदेशात अशी झुंबड उडते. मोदींच्या करिष्म्याचीच ही भुरळ आहे!