नवी दिल्ली : मंदिरांमध्ये पुजाऱ्यांची नियुक्ती करताना जात महत्त्वाची नसून संबंधिक व्यक्ती त्याच्या कर्मात म्हणजेच कामात किती सक्षम आहे, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आनंद व्यंकटेश यांनी निकालामध्ये महत्त्वाचे निरिक्षण नोंदविले आहे. ते म्हणाले, मंदिरांमध्ये पुजारी नेमण्यामध्ये जात महत्त्वाची नाही. त्यासाठी संबंधित व्यक्ती किती सक्षम आहे, हे पाहणे आवश्यक आहे. तो व्यक्ती त्याच्या कामात पारंगत असावा, प्रशिक्षित असावा आणि गरजेनुसार पूजा करण्यास सक्षम असावा. हे सर्व निकष जर कोणी पूर्ण करत असतील तर त्यात जातीची भूमिका राहणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयानेदेखील कोणत्याही जातीचा अथवा पंथाचा व्यक्ती पुजारी म्हणून नियुक्त करता येईल, असा निकाल दिल्याचा उल्लेख उच्च न्यायालयाने केला. पूजा करणे हा धर्माचा अविभाज्य भाग आहे, ती पूजा कोणत्या जातीचा अथवा पंथाच्या पुजाऱ्याने केली हा धर्माचा अविभाज्य भाग नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे पुनरुच्चार उच्च न्यायालयाने यावेळी केला आहे.
उच्च न्यायालयाने २०१८ सालच्या एका रिट याचिकेचा निकाल देताना हे निरिक्षण नोंदविले आहे. याचिकेत तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील श्री सुगवणेश्वर स्वामी मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्याने (ईओ) जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान दिले होते, ज्यामध्ये अर्चागर अथवा स्थानिगर म्हणजेच पुजारी पद भरण्यासाठी अर्ज मागवले होते. हे पदाचा वारसाहक्काने पुरोहितांना मिळावे, असा याचिकाकर्त्याने आग्रह धरला होता. याअधिसूचनेमुळे वर्षानुवर्षे रीतिरिवाजानुसार मंदिरात सेवा करण्याच्या त्यांच्या वंशानुगत अधिकारांचे उल्लंघन केले जात असल्याचेही त्यांनी याचिकेमध्ये म्हटले होते.